
‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसरा हा मोठा सण मानला जातो. नवरात्र संपले की दशमीला दसरा उजाडतो. आश्विन महिन्यातील शुद्ध दशमीस हा सण साजरा करतात. दसरा हा सर्व कार्यांना शुभ मानला जातो. या दिवशी नवे कार्य करण्याची प्रथा आहे. दसऱ्याला विजयादशमी असेदेखील म्हणतात.
विजयादशमीला सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजीतापूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. या दिवशी वह्या, पुस्तके, ग्रंथ, पोथ्या, यंत्रे, शस्त्र, हत्यारे, वाद्ये, उपकरणे यांची पूजा करतात. नंतर ईशान्येला जाऊन शनी किंवा आपट्याच्या वृक्षांची पूजा करतात व त्यांची पाने तोडून (फांद्या नव्हे) आपल्या जवळच्या लोकांना वाटतात. या दिवशी जुनी भांडणे, तंटे विसरून चांगल्या विचारांचे आदानप्रदान करावे ही उदात्त भावना ही पाने वाटण्यामागे आहे.
दसरा हा विजयाचा सण आहे तो विजयोत्सव आहे. शौर्याचे पराक्रमाचे प्रतिक आहे. म्हणूनच क्षत्रिय मराठे वीर विजयादशमीच्याच मुहूर्तावर लढाईस निघत. ह्यालाच सीमोल्लंघन म्हणत व हा दिवस वाजत गाजत मोठ्या उत्साहाने साजरा करत.
हल्लीच्या युगात अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, द्वेषभावना, अज्ञान इत्यादी शत्रूंवर स्वारी करण्यासाठी सदसद्विवेकबुद्धी, सदाचार, विज्ञान, प्रेम इत्यादी शस्त्रांना आजच्या दिवशी स्मरण करून पूजले पाहिजे व त्यांना रोजच्या रोज आचरणात आणले पाहिजे हेच खऱ्या अर्थाने दसऱ्याचे सीमोल्लंघन ठरेल.
खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.
—————————————————————————————————————————————————





भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या तिथीला सर्व पितरांना श्राद्ध घालतात. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. असा हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला कुळाचार आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक विधींची परंपरा आहे. हा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष वा श्राद्धपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या तर्पणाचा पक्ष. तर्पण करावयाचे म्हणजे श्रद्धेने, मनोभावाने तृप्त करावयाचे.