‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसरा हा मोठा सण मानला जातो. नवरात्र संपले की दशमीला दसरा उजाडतो. आश्विन महिन्यातील शुद्ध दशमीस हा सण साजरा करतात. दसरा हा सर्व कार्यांना शुभ मानला जातो. या दिवशी नवे कार्य करण्याची प्रथा आहे. दसऱ्याला विजयादशमी असेदेखील म्हणतात.

विजयादशमीला  सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजीतापूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. या दिवशी वह्या, पुस्तके, ग्रंथ, पोथ्या, यंत्रे, शस्त्र, हत्यारे, वाद्ये, उपकरणे यांची पूजा करतात. नंतर ईशान्येला जाऊन शनी किंवा आपट्याच्या वृक्षांची पूजा करतात व त्यांची पाने तोडून (फांद्या नव्हे) आपल्या जवळच्या लोकांना वाटतात. या दिवशी जुनी भांडणे, तंटे विसरून चांगल्या विचारांचे आदानप्रदान करावे ही उदात्त भावना ही पाने वाटण्यामागे आहे. 

आपला भारत हा कृषीप्रधान देश असल्याने दसरा हा सुद्धा कृषीलोकोत्सवच आहे. पावसाळ्यात पेरणी केलेल्या शेतातील पहिले पीक याच दिवशी घरात आणावयाची प्रथा आहे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालील स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी या धान्याचे अंकुर उपटून देवीला वाहतात. ही प्रथाच आपल्या संस्कृतीवर शेतीचा किती प्रभाव आहे ह्याचेच द्योतक आहे. दसऱ्याला भाताच्या लांब्या घरोघरी प्रवेशद्वारावर तोरण म्हणून लावतात. हे देखील आपल्या कृषिप्रधान संस्कृतीचेच द्योतक आहे. 

दसरा हा विजयाचा सण आहे तो विजयोत्सव आहे. शौर्याचे पराक्रमाचे प्रतिक आहे. म्हणूनच क्षत्रिय मराठे वीर विजयादशमीच्याच मुहूर्तावर लढाईस निघत. ह्यालाच सीमोल्लंघन म्हणत व हा दिवस वाजत गाजत मोठ्या उत्साहाने साजरा करत.


हल्लीच्या युगात अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, द्वेषभावना, अज्ञान इत्यादी शत्रूंवर स्वारी करण्यासाठी  सदसद्विवेकबुद्धी, सदाचार, विज्ञान, प्रेम इत्यादी शस्त्रांना आजच्या दिवशी स्मरण करून पूजले पाहिजे व त्यांना रोजच्या रोज आचरणात आणले पाहिजे हेच खऱ्या अर्थाने दसऱ्याचे सीमोल्लंघन ठरेल.

————————————————————————————————————————————————— 

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

गणेश चतुर्थी हरतालिका

—————————————————————————————————————————————————

 

प्रतिक्रिया
  1. nikhil म्हणतो आहे:

    सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
    सोनेरी किरणाचा सोनेरी दिवस
    सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
    सोन्यासारख्या लोकांना
    आपणास आणि आपल्या कुटुंबीयास
    दसरयाच्या हार्दिक शुभेच्छा

  2. sachin म्हणतो आहे:

    sssssssssssssssssssssss

यावर आपले मत नोंदवा