झम्प्याचे उद्योग व उद्योजग


माहीत आहे तुम्हाला आवडणार नाही तरीही एवढेच सांगतो की मराठी माणसाबाबत खूप जुनेपुराने व घिसेपिटे असे पण एक खरे वाक्य आहे. “मराठी माणसाला उद्योगधंदा करता येत नाही.”  आणी यावर नाईलाजास्तव झम्प्याचा लाजीरवाणा  विश्वासपण आहे. कदाचीत तुम्हाला हे पटणार नाही. परंतू आजपुरते तरी झम्प्यासाठी हेच सत्य आहे…उद्याचे माहीत नाही. कारण प्रत्येक मनुष्य वा समाज हा सतत इव्हॉल्व होतच  असतो. त्यामुळे आज जे आहे ते उद्या असेलच याची काहीही खात्री देता येत नाही.

कालचे चित्र तर भयंकरच होते. पण आजचेही काही फार चांगले नाही. त्यामुळे उद्याचीही बोंबच वाटते. हां काही आशेचे किरण अधेमधे चमकत असतात्. पण त्यांचे रुपांतर एका मोठ्या प्रकाशझोतात व्हायला अजून किती प्रकाशवर्षे जावी लागतील कोण जाणे? याला जबाददार कोण? तर आपणच. कारण?  कारण आहे आपली वृत्ती. अत्र्यांच्या भाषेत सागांयचे झाले तर मराठी माणसाला दोनच गोष्टी येतात. एक म्हणजे हातात माळ घेवून पंढरीची वाट धरायची म्हणजेच माळकरी व्हायचे किंवा हातात तलवार घेवून धारकरी व्हायचे. १००% खरे आहे. आणी अत्रे हे काही आपल्या मनाचे नव्हते सांगत तर शेकडो हजारो वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहासदेखिल हेच सांगत आलाय. बघानं जे मावळे महाराजांबरोबर प्राणांची बाजी लावून लढायचे तेच मावळे आषाढात खांद्यावर पताका घेवून विठ्ठ्लाकडे धावायचे. विठ्ठल अजून आहे व त्यांच्या वार्‍यापण अजून चालूच आहेत पण महाराज राहीले नसल्याने त्यांच्या नावांवर काढलेल्या अनेक शाखांवर अजूनही कितीतरी वीर मावळे छातीचा कोट करून पुढील आदेशाची वाट बघत लढण्यासाठी(?) उभे आहेत. अजूनही फक्त ह्याच दोन गोष्टींची इतकी तहान मराठी माणसाला का आहे. आपल्या किती पिढ्या यातच खपणार आहेत? आपण कधी जागे होणार आहोत की नाही? बदलणार आहोत की नाही?

कधी कधी झम्प्याच्या मनात विचार येतो की महाराज जर आजच्या काळात जन्माला आले असते तर त्यांनी काय केले असते?  टॅक्सीवाल्या आणि दूधवाल्या भैयांच्या मागे हात धुवुन लागले असते? की  ‘महागाई वाढली. बंद बंद १००% महाराष्ट्र बंद’ असे ओरड्त वा बॅनर लावत सुटले असते? का न्याय मिळवण्यासाठी रयतेचेच नुकसान (बस जाळणे, ट्रेन फोडणे, रस्ते अडवने) करत सुटले असते. इतक्या खालच्या पातळीला  उतरले असते महाराज? नाही ना? मग महाराजांनी काय हो केले असते. हे सगळे नाही करायचे तर मग करायला उरले तरी काय? उत्तर आहे. बरेच काही. अजुन बरेच काही उरले आहे करण्याजोगे..

त्यांनी तेच केले असते जे त्यांनी ३५० वर्षांपूर्वी केलेले होते. अगदी त्याच पद्धतीने ते लढले असते आणि अगदी तसेच जिंकलेही असते… त्यांनी खूप आधीपासून म्हणजे लहानपणापासूनच आपल्या आजुबाजुच्या परिस्थीतीचा, आपल्या कमजोरीचा, आपल्या बलस्थानांचा, आपल्या खर्‍या शत्रूचा व मित्रांचाही आणी  अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टींचा/घटनांचा अभ्यास सुरु केला असता.( ह्या काळात ते आले तर घोड्यावरूनच  फिरतील असे चित्रपटात दाखविने ह्याइतका त्यांच्या द्रष्ट्यापणाचा दुसरा अपमान नसेल.) महाराजांना आपण द्रष्टे म्हणतो. द्रष्टा म्हणजेच भविष्याचा वेध घेवू शकणारा. आजच्या काळात ते जन्म घेतील तर त्यांच्या सर्वप्रथम हे लक्षात येईल की आजची हत्यारे बदलेली आहेत. त्यांनी सहज हेरले असते की आज शिक्षण हेच सर्वात मोठे हत्यार आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मावळ्यांना सर्वप्रथम शिक्षण देऊन लढाईसाठी तयार केले असते. मग त्यांनी आपले बॅटलफिल्ड म्हणजे रणभूमी नक्की केली असती. काय आहे आजची रणभूमी? काही कल्पना मावळ्यांनो? अहो आजची युद्धे कुठे खेळली जातात? काश्मीरच्या खोऱ्यात की अफगाणिस्तानच्या वाळवंटात? नाही हो. ती खेळली जातात बाजारपेठेत्..म्हणजे आठवड्याच्या बाजारात नव्हे हो..तर जागतीक बाजारात्..आणी इथेच महाराजपण सर्वशक्तीनिशी घुसले असते आपल्या क्वालिफाईड मावळ्यांना बरोबर घेऊन…सुरवातीला गमिनी काव्याने व वेळ आल्यानंतर उघड्पणे. त्यांनी आपले खरे शत्रू  व मित्र कोण हे बरोबर ओळखले असते त्यासाठी त्यांनी अगदी सरळ साधासोपा नियम वापरला असता, जो  इथल्या माझ्या रयतेला फसवून, लुबाडून इथली संपत्ती लुटत आहे तो शत्रू व जो इथे कष्ट करून घाम गाळून प्रामाणिकपणे संपत्ती निर्माण करीत आहे तो मित्र. आणि झम्प्याला खात्री आहे ह्या लढाईत महाराजांनी मित्रच जास्त कमावले असते.

टेक्निकली महाराष्ट्र आता स्वतंत्र आहे. पण अजूनही दिल्ली दरबारी त्याला एखाद्या वसाहती राज्यासारखा सलाम ठोकावा लागतो. त्याची कारणे महाराजांनी समजून घेतली असता त्यांच्या लक्षात आले असते सध्या महाराष्ट्राला न्यूनगंडाने ग्रासले आहे. तेव्हा पुनश्च एकदा त्यांना आपली अर्धी ताकत महाराष्ट्राचे रक्त पेटविण्यात घालवावी लागली असती. व सतत आपल्याला आठवण करून द्यावी लागली असती की…उठा  गड्यांनो उठा. तुम्ही आता स्वतंत्र आहात. कोणाशीही लढण्याची आता गरज उरली नाही. आपली शक्ती व्यर्थ दवडू नका. प्रगती करा…आता तरी प्रगती करा. इतकी प्रगती करा की तुमच्या नुसत्या प्रगतीने समोरच्याच्या छातीत धडकी भरली पाहीजे. मग दिल्लीच काय तर जगातल्या कोणत्याही दरबारात सलाम तर सोडाच , हजेरीही द्यावी लागणार नाही. त्याउलट महाराजांनी (आता) मुंबईतच (काळाचा व बाजारापेठेचा महीमा) स्वत:चा दरबार भरवायला सुरवात केली असती जशी ३५० वर्षांपूर्वी रायगडावर सुरु केलेली. ह्यासाठी त्यांनी आता तलवार वापरली नसती. तेंव्हा जसे सुरक्षिततेच्या आणी राज्यकारभाराच्या दृष्टीने त्यांनी किल्ले उभारले वा जिंकले तसेच आणी अगदी तसेच त्यांनी आत्ताचे किल्ले म्हणजेच उद्योगधदे उभे केले असते. नुसते उभे केले नसते तर त्यांचे एक मोठे नेट्वर्कच तयार केले असते. आणी ह्याच नेट्वर्कच्या माध्यमातून राज्यात त्यांनी रोजगार, वीज, पाणी, रस्ते यासारख्या अनेक योजना अतिशय मुत्सद्दीपणे व मोठ्या धाडसाने राबविल्या असत्या. त्याकाळी स्वराज्याच्या स्थापनेत किल्ल्यांनी जी भूमिका निभावली तीच भूमिका आता उद्योगधंद्याना निभवावी लागणार हे समजायला त्यांना किंचीतसाही वेळ लागला नसता. एकदा उद्योगधंदे कोसळले की अमेरिकेसारखे महाशक्तीशाली राष्ट्र देखील कसे हतबल होते हे सारे जग पहातच आहे. तेंव्हा महाराजांनी आपली सर्व ताकत उद्योगधंद्यांच्या मागे उभी केली असती.

३५० वर्षांपूर्वी पारतंत्र्याच्या अतीशय जिकीरीच्या वातावरणात, पुरेशी साधन वा सामुग्री हाती नसताना सुद्धा फक्त एक ध्येय, एक निर्धार, मोजके मावळे व अनेक दर्‍याखोर्‍यांच्या मदतीने त्यांनी जे सुराज्य स्थापण केले ते त्यांना आता स्वातंत्र्याच्या सुलभ वातावरणात, जागतीक दर्जाची आधुनिक टेक्नॉलॉजी हाती असताना व सर्वात महत्त्वाचे म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे प्रेम व विश्वास बरोबर असताना करायला फारसा वेळ लागला नसता. बरोबर ना मित्रांनो?

हां अनेक मराठी राजकारणीच हात धुवुन त्यांच्या मागे लागले असते पण झम्प्याला नाही वाटत त्यांनी इतका काही फरक पडला असता. स्वतःच्या स्वच्छ चारित्र्यावर आणी पक्क्या निर्धारावर महाराजांना ह्या आजच्या नालायक राजकारण्यांना अस्मान दाखवायला फारसे  कष्ट पडले नसते.

असो…झम्प्या स्वप्नरंजन आणी कल्पनाविलास पुरे झाला. आता जरा जागे होवुया.

लाँग स्टोरी शॉर्ट्….म्हणजेच मोराल ऑफ द स्टोरी ही आहे की आज जर पुनःश्च एकदा असा काहीही पराक्रम करून दाखवायचा असेल तर महाराजांसारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला देखिल तलवार सोडून सर्वप्रथम उद्योजक व्हावे लागेल. तेसुदधा साधासुधा नव्हे तर झपाटलेला…तरच आणी तरच काहीतरी करण्यासाठी रसद मिळेल. उमेद येईल.हिम्मत बनेल. (नुसते बॅनर लावून वा विविध चॅनेन्सवर माथेभडकू भाषणे ठोकून काहीही होत नाही हे संपूर्ण महराष्ट्राने गेली कित्येक वर्षे नुसते पाहीलेच नाही तर भोगलेही आहे. आतातरी जागे व्हा.)  म्हणूनच झम्प्या आज तुम्हाला घसा ताणून, ( इथे की बोर्डवंर गेले दोन तास थयाथया बोटे नाचवून) कळकळून विनंती करतो की प्लीज प्लीज नोकरीच्या सोप्या नादाला भुलू नका. आयुष्यात खरंच काही करायचे असेल, स्वाभीमानाने जगायचे असेल, महाराजांच्या लाडक्या महाराष्ट्रात आपलेच सुराज्य स्थापन करायचे असेल तर एकच आणी एकच मार्ग धरा. उद्योजक बना. मोठी स्वप्ने बघा. सुरवात वाटल्यास छोट्याने करा. अगदी काहीही करा पण स्वतःच्या हिमतीवर करा. दुसर्‍याच्या आदेशाने नाचणारे माकड होवू नका. पडा, धडपडा, कायमचे अधू व्हा किंवा अगदी मरा…उत्तम….पण उद्योजक बना. नसेल बनता येत तरी अथक प्रयत्न चालू ठेवा. झक मारत यश तुमच्यापुढे गुढगे टेकेल. हार मानू नका. रक्त गरम ठेवा (त्यासाठी इथे तुम्हाला नियमितपणे खुराक उपलब्ध करून दिला जाईल.) काहीही बनवा वा काहीही विका.(लोकांना बनवू नका,स्वत:ला विकू नका.) तशीच वेळ आली तर उपाशी मरा (लढता लढता मराच्या चालीवर) पण उद्योग करता करता मरा. इथून पुढे महाराष्ट्राचे भवितव्य फक्त आणी फक्त मराठी उद्योजगांच्या हाती आहे व राहील. साहित्यिक, राजकारणी असल्या इतर कोणत्याही जातीच्या नव्हे तर उद्योजग ह्याच जातीच्या हाती आता ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. तेंव्हा आपली हत्यारे सतत पाजरत रहा म्हणजेच शिका आणी सतत शिकत रहा तरच मोठे मोठे उद्योग करू शकाल. नाहीतर वडापावची गाडी व डबेवाले ह्या उद्योगांच्या (मराठी मोनोपॉली बिजीनेस) पुढे  जावू शकणार नाही. आताच्या हायफाय टेक्नॉलॉजीच्या काळात काळाशी सुसंगत असा उद्योग शोधा वा शिका वा तयार करा.  जगाच्या डोळ्यात डोळे फाडून बघायला शिका. काळाच्या पुढे झेप घ्यायला शिका. शिक्षणाची अगदीच बोंब असेल तरीही घाबरू नका धीरूभाई अंबानीपासून हेन्री  फोर्डपर्यंत अनेक जगजेत्ते तुमच्या मदतीला हजर होतील. फक्त त्यांच्या इतक्याच निर्धाराची व कष्टाची तयारी ठेवा.

गुजराती, मारवाड्यांशी मैत्री करा. धंदा आणी फक्त धंदा रक्तात कसा मुरवायचा हे त्यांच्याबरोबर राहून,शिकून स्वत:त पण मुरवा. (आपल्या रक्तात कथा, कविता, नाटके असले साहित्य व त्याग आणी अध्यात्म मुबलक मुरलेले आहे. त्यांची काळजी सोडा.) आपल्या भाषेवर मनापासून प्रेम करा आणी मोठ्या प्रेमाने तीचा वापर करा. भाषेला फक्त संवादाचे साधन समजण्याची चूक करू नका. ती तुमच्या व आपल्या सर्वांच्या प्रगतीचे म्हणजेच उत्क्रांतीचे एक मौल्यवान हत्यार आहे. तिचा खूप जपून प्रेमाने व आदराने वापर करा. तरच इतर समाजपण तीचा मान ठेवतील. अनेक ठिकाणी हिंडा, फिरा, भरकटा, हरवा. जग तसे फार मोठे नाहीए. (आठवा महाराज त्याकाळात फक्त घोड्यावर आग्र्याला म्हणजेच परदेशात गेलेले. विचार करा!) एकाच जागेवर सडू नका. संकुचित होवू नका. हातापायांचा पुरेपूर उपयोग करा ते वापरण्यासाठीच तिथे आहेत हे विसरू नका. कान, नाक, डोळे इतकेच काय मेंदूपण उघडा..हे अवयव मह्त्वाचे आहेत त्यांना गंज लागू देवू नका. काहीही न करण्यासाठी कोणतीही सबब शोधू नका. व करण्यासाठी कोणतेही कारण चालते हेही विसरू नका. भांडवल नाही म्हणून शेपटी ढुंगणात घालू नका..उठा कर्ज काढा. नसेल मिळत तर जगाकडे भिक मागा. तुमच्यात हिम्मत व हिकमत असेल तर पैसे धापा टाकत मागे येतील. मागे वळून न बघता पुढे चालत रहा. पैसे हे एखाद्या नखरेल स्त्रीसारखे असतात. त्यांना प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देवू नका. नाहीतर इथेच भुलाल,फसाल व संपाल.. धंद्याचा प्राअयमरी मोटीव्ह पैसा बनवू नका. प्रामाणिक रहा, चांगले उत्पादन व तत्पर सेवा असे सोपे मंत्र पाळा.

आपल्या उद्योगधंद्याला आपली बायको/आईबाबा/मुले/खेळ/चित्रपट वा इतर काहीही समजा व त्यावर तितकेच प्रेम करा. त्यात डुंबुन जा. सर्व पर्याय धुंडाळा, धंदा मोठा कसा होईल ह्याचा ध्यास घ्या. ह्या प्रोसेसमध्ये जीवाभावाचे एकेक माणूस जोडा. म्हणजे यशाला तुमचा पत्ता शोधायला लवकर मदत होईल. थोड्या आणी लवकर मिळालेल्या यशाने गाफिल राहू नका नाहीतर ससा आणी कासव गोष्टीतल्या सशासारखे पस्तावायची वेळ यायला फार काळ थांबावे लागणार नाही. सतत सावध रहा. तुमचा सर्वात मोठा शत्रू फक्त तुम्हीच आहात हे विसरू नका. तुमच्या धंद्याचे तुमच्याइतके नुकसान दुसरा कोणीही करू शकणार नाही हे समजून घ्या.(खास मराठी माणसासाठी अनुभवाचे बोल) यशाची चव चाखत असताना इतर सोबत्यांना त्यांच्या हक्काची किंबहुना थोडी जास्तच किमत द्या. म्हणजे उद्या विपरीत काळासाठी वेगळी गुंतवणुक करावी लागणार नाही.

लोकामध्ये मिसळा आपले अनुभव शेअर करा. लागेल तिथे अवश्य मदत करा. पण कोणावरही विसंबून राहू नका. सहकाराचा जुना मंत्र कायम काम करतो त्याचा वापर करा. मोठ्यांची चरित्रे वाचा. अभ्यासा. अगदी नक्कल सहीसही नक्कल करा. अजिबात हरकत नाही. टी व्ही हे प्रकरण तुमचा वेळ, पैसा व तुम्ही यांच्या मुळावर उठलेले आहे. स्वतःला व मुलांना यापासून वाचवा. वेळेबरोबर सदा पुढे पळणाऱ्या उपयोगी मित्रांची संगत धरा. कामचोर व नकारात्मक मित्रांपासून शक्य तितके दूर पळा.

झम्प्याकडे लिहिण्यासारखे अजून भरपूर आहे वं वेळ आल्यावर तो लिहीणार सुद्धा पण तूर्तासतरी थांबतो. व आशा करतो एवढे वाचून तुमचे रक्त उसळेल व तुम्ही कायमचे धंद्याला लागाल. बाकी तुमच्यामध्ये पेटलेल्या आगीला जेंव्हा वेळोवेळी ईंधन वा सरपणाची गरज लागेल तेंव्हा तेंव्हा इथे येवून झम्प्याला भेट द्या. मुबलक प्रमाणात रसद पुरवण्यात येईल. बदल्यात अपेक्षा एकच असेल..

हा वणवा तुम्ही तुमच्या आजुबाजुलापण पेटवावा व एक दिवस उभा महाराष्ट्र उद्योगधंद्याच्या शिखरावर दिसावा.

ता. क.- इतके वाचूनही तुम्ही उद्योगधंद्याला सुरवात करणार नसाल तर “झम्प्याचे उद्योग व उद्योजग” या पानांवर पुन्हा आपले तोंड दाखवायला चुकुनही येवू नका. ही पानं तुमच्यासाठी नाही आणी तुम्ही या पानांसाठी नाही. आपले भेकड आणी गुलामीला वाहिलेले तन व मन गुंतवण्यासाठी या अदभुत जगात बरेच काही उद्योग इतरांनी चालू केलेले आहेत तीथे जावून तुमच्या  वेळेची फोडणी द्या. चला निघा…

प्रतिक्रिया
 1. sanjeevani patil म्हणतो आहे:

  thanx zampya!!!!!
  tuzi lekhani nakkich vaya nai janar…….!!!!

 2. Kanchan Karai म्हणतो आहे:

  मित्रा, तुझा आयडी. मिळेल का? तुला ईमेल करायचं आहे.
  हा माझा आयडी. – mogaraafulalaa@gmail.com

 3. विजय आसबे म्हणतो आहे:

  झम्प्या !आभारी आहे मित्रा…खुप छान लेख.

  (मी उद्योजक होणारच.)

 4. amit b karpe म्हणतो आहे:

  tooooooo… good mitra

  me same tuzya sarkhach vichaar karto

 5. Ankita more म्हणतो आहे:

  dada u r gr8. love u for this

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s