प्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…


इतर तिघे भाऊ अभ्यासात हुशार पण याचा आणि अभ्यासाचा मात्र छत्तीसचा आकडा. ते सर्व भाऊ शिकायचे इग्रंजी माध्यमात तर हा होता तामिळ माध्यमात. सदा अभ्यासात मागे राहिल्याने न्यूनगंडही सोबतीला.  पण त्याच्या आवडीनिवडी काहीतरी वेगळ्याच होत्या. पाचवीत वगैरे असेल तो आणि त्याच्याकडे होती ५०० कबुतरे, भरपूर मासे आणि अनेक प्रकारचे पक्षी. आणि त्याचबरोबर आणखीही एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे धंद्याची समज. त्या वयातही तो स्वतःची पॉकेट मनी त्याच्या छोट्याशा प्राण्यांच्या धंद्यातूनच कमवायचा.

त्याच्या वडलांचे नाव होते चिन्नी कृष्णन. ते एक शेतीतज्ञ होते. त्याचबरोबर त्यांचा ओषाधांचाही व्यवसाय होता. ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रत्यत्न करीत असत. नवीन कल्पना,नवीन शोध हाच त्याचा ध्यास होता. अशीच एक त्यांना सुचलेली कल्पना म्हणजे पाऊचची(sachet). त्याकाळी टाल्कम पावडर फक्त डब्यातून विकली जायची. त्यांनी ती पाऊचमधून विकायला सुरवात केली. १००/५०/२० ग्रामच्या पाऊच मधून..अशाच प्रकारे ते मीठही विकायचे. त्यांचे म्हणणे एकच होते की माझे उत्पादन (प्रोडक्ट) हे सामान्यातल्या सामान्यापर्यंत पोहचायला हवे. हमालापासून ते रिक्षावाल्यापर्यंत सगळ्यांना परवडले पाहिजे. पाऊचमधून वस्तू विकणे हेच त्यांचे ध्येय होते. भविष्यात वस्तू अशाच विकल्या जातील असेही ते म्हणायचे. पाऊचसारख्या अनेक इनोवेटिव कल्पना त्यांनी राबविल्या पण तरीसुद्धा ते जास्त यशस्वी होऊ शकले नाहीत. कारण एकच…विक्रीची कला त्यांना कधी जमलीच नाही. याच आघाडीवर त्यांनी मार खाल्ला. कोणतेही उत्पादन बनविण्यापेक्षाही ते विकले जाण्यावर त्या वस्तूचे महत्व टिकते हे त्यांच्या लक्षात आले नाही. पण हीच गोष्ट त्यांच्या त्याच मुलाने व्यवस्थीत समजून घेतली व यशस्वीपणे वापरली जो सर्वात अपयशी वं ढ समजला गेला होता.

त्या मुलाचे नाव आहे  सी.के.रंगनाथन. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा व्यवसाय आपोआपोआपच भावांच्या हातात गेला. त्यांनी वेलवेट नावाचा एक शाम्पू तयार केलेला. सी.के. ही त्यांच्याबरोबर काम करू लागला होता. तो शाम्पूचे उत्पादन ज्या युनिटमध्ये व्हायचे तिथेच काम करायचा. पण थोड्याच दिवसात त्याचे व भावाचे काही जमेना. म्हणून एक दिवस त्याने त्यांना रामराम ठोकला.

नुसताच घराला वं व्यवसायाला रामराम नाही ठोकला तर आपल्या घरेलू व्यवसायावरील सगळ्या हक्कांवरही पाणी सोडले. आणि हाच निर्णय त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. खिशात बचत केलेले फक्त १५००० रुपये आणि शून्यातून काहीतरी उभे करायची प्रचंड मोठी जिद्द. ह्या दोन भांडवलावर(?) तो आता काहीतरी करणार होता. काय ते त्याचे त्यालाही माहित नव्हते कारण आत्तापर्यंत फक्त दोनच गोष्टी त्याने केल्या होत्या एक म्हणजे प्राणी पाळणे वं दुसरे म्हणजे शाम्पू बनविणे. खूप विचारांती त्याने दुसरा मार्ग अवलंबिला. २५० रु.महिना जागा भाडे, फॅक्टरी ३०० रु.भाडे, शाम्पू पॅकिंग मशीन ३००० रु. ह्या गुंतवणुकीवर त्याचा धंदा सुरु झाला.

शाम्पूचे नाव वडिलांच्या नावाच्या आद्याक्षरावरून चिक (Chinni Krishnan… CHIK) असे ठेवण्यात आले. धंद्यात पाय रोवायला वर्षभराचा काळ गेला. हा कालावधी खूप काही शिकण्यातच गेला आणि त्याच्याच बळावर दुसऱ्या वर्षीपासून हळूहळू फायदा काय तो दिसायला लागला.  धंदा वाढत होता आणि त्यासाठी आता मोठ्या गुंतवणुकीची पर्यायाने भांडवलाची गरज होती. गहाण ठेवायला काहीही तारण नसल्याने कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नसे. शेवटी तीन वर्षानंतर एका बँकेने कर्ज मंजूर केले. त्याला कारणही तसेच घडले कर्जासाठी दिलेली कागदपत्रे तपासताना बँक मॅनेजरच्या हे लक्षात आले की जरी तारण नसले तरी एक गोष्ट मात्र ह्यांच्याकडे आहे ती म्हणजे गेल्या तीन वर्षाचे इन्कमटॅक्स भरलेले पेपर्स. त्याकाळी कोणतेही असे छोटे युनिट इतके व्यवस्थितपणे इन्कमटॅक्स भरत नसे…ही एकच जमेची गोष्ट ध्यानात घेऊन २५००० रु.चे कर्ज मंजूर झाले…त्याचेच पुढे जाऊन ४ लाख पुन्हा पुढे १५ लाख असे चक्र चालूच राहिले. आणि इथून पुढे चिक( CHIK) शाम्पूला मागे वळून बघायला वेळ मिळालाच नाही. त्यांची वाटचाल दक्षिण भारतातील नंबर एककडे सुरु झाली.

पाच कोणतेही रिकामे पाऊच आणा व एक चिक शाम्पूचे पाऊच घेऊन जा. पाच चिक शाम्पू विकत घ्या सहावा मोफत मिळावा.. अशा एक न अनेक स्कीम्स राबवून विक्री ३५००० रु. महीन्यावरून १२ लाख रु. महिन्यावर गेली. त्यानंतर चिकचे चमेली वं गुलाब असे दोन नवीन सुगंधी शाम्पू बाजारात आले ज्यामुळे महिना विक्री रु. ३० लाखापर्यंत गेली. आणि जेंव्हा जाहिरातीसाठी अभिनेत्री अमलाला करारबद्ध करण्यात आले तेंव्हा तर कहरच झाला गुलाब चिक शाम्पूची विक्री महिना १ करोड रुपयापर्यंत पोचली…जे वडिलांना जमले नव्हते करायला ते त्यांच्या मुलाने करून दाखविले. चिक शाम्पू फक्त नऊ वर्षात दक्षिण भारतातला नंबर एकचा शाम्प्पू झाला.

सध्या ग्रामीण बाजारपेठ शहरी बाजारापेठेपेक्षा दुप्पट वेगाने वाढते आहे. हे सी.के.नी वेळीच ओळखले वं आपले संपूर्ण लक्ष ग्रामीण भारताकडे वळविले. गावागावात त्यांनी आपल्या शाम्पूची प्रात्यक्षिके दाखवायला सुरवात केली. शाम्पू कसा वापरायचा हे देखील शिकविले. त्यासाठी एका मुलाचे शाम्प्पूने डोके धुणे त्याच्या केसांचा सुगंध,स्पर्श इतरांना देणे. असे नाना विविध मार्ग वापरले. त्याचाही होयचा तोच परिणाम झाला विक्री आणखीन ४ पटीने वाढली.

अशा प्रकारे ७ वर्षाचा काळ लोटला. आता शाम्पूशिवाय आणखीही काही प्रोडक्टस असावेत असा रास्त विचार करावयास सुरवात झाली. आणि त्यांचे लक्ष त्यावेळेस शॉ वॉलेसने काढलेल्या हर्बल पावडरकडे गेले. पण योग्य विक्रीकौशल्याभावी त्यांना ते विकता आले नव्हते. याच संधीचा लाभ उठवत सी.के.नी मीरा हर्बल पावडर बाजारात आणली. तिसऱ्याच महिन्यात पहिला नंबर व सहाव्या महिन्यात बाजारपेठेचा ९५ टक्के हिस्सा असे अभूतपूर्व यश मिळविले..उरलेला ५ टक्के हिस्साच काय तो शॉ वॉलेसकडे राहिला.

आता त्यांनी आपला मोर्चा सौंदर्य प्रसाधानांकडे वळवायचे ठरविले. पण त्यासाठी एक योग्य नाव पाहिजे होते म्हणून आपल्याच कर्मचारी वर्गात त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली. नवीन नाव सुचविण्याची. एका कर्मचार्‍याने नाव सुचविले केविनकेअर (CavinKare) ज्यात C आणी K हे कॅपिटल लेटर्स असतील. हे नाव निवडले गेले त्याचे एक कारण म्हणजे ह्यात सी.के. च्या वडिलांच्या नावांची आद्यक्षरे होती.(व त्यांच्या स्वतःच्या पण) वं दुसरे कारण होते तामिळमध्ये केविनचा अर्थ होतो सौंदर्य,ग्रेस.

नाव नक्की झाल्यावर त्यांनी पहिले उत्पादन काढले ते म्हणजे परफ्युम. (मराठीत बहुतेक अत्तर म्हणतात याला) त्याचे नाव होते स्पीन्झ. कदाचित तुम्हीही स्पीन्झ वापरले असेल. दहा रुपयाच्या पॅक मध्ये ते लाँच करण्यात आले. ज्याचा सरळ सरळ उद्देश निन्म मध्यमवर्गीयांना परफ्युम वापरावयास उत्तेजीत करणे हा होता वं जो प्रमाणाच्या बाहेर यशस्वीही झाला. असेच त्यांनी हळू हळू एक एक वेगळे प्रोडक्टस् काढायला सुरवात केली ज्याचे मुख्य उद्दिष्ट होते समाजातील खालच्या स्तरातील लोकांना उच्च प्रतीचे उत्पादन स्वस्तात उपलब्ध करून देणे.

तर अशा या अवघड प्रवासात ,गळेकापू स्पर्धा असलेल्या क्षेत्रात , जिथे लोकांच्या आवडीनिवडी रोज बदलत असतात तिथे इतकी वर्षे आतरराष्ट्रीय कंपन्यांना तोंड देत त्याच दर्जाची कंपनी शून्यातून उभी करून यशस्वीपणे चालवायची हे एक खूप मोठे वं सर्व भारतीयांना अभिमान वाटेल असे काम सी.के.रंगनाथन गेली कित्येक वर्षे मोठ्या जबाबदारीने करीत आहेत.

मित्रांनो आपण नेहमी भांडवल नाही, शिक्षण नाही, ओळख नाही अशा सबबी सांगून स्वत:ची फसवणूक करत असतो. पण जर तुम्हाला खरोखरच काही करायची तीव्र इच्छा असेल तर मार्ग आपोआप तयार होतात हेच सी.के.रंगनाथन यांनी खिशात फक्त १५००० रुपये असताना ५०० करोड रुपये उलाढाल असलेली कंपनी निर्माण करून आपल्याला दाखवून दिले नाही काय? (त्यांचे पुढील लक्ष्य येत्या तीन वर्षात कंपनीची उलाढाल १५०० करोड रुपयांपर्यंत नेणे हे आहे.)

मित्रांनो वरील लेख मी सी.के.रंगनाथन यांच्या ज्या मुलाखतीवरून लिहिला आहे ती मुलाखत जर तुम्हाला वाचायची असेल तर लींक येथे देत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s