Archive for सप्टेंबर, 2010


पोळा (बेंदूर)


आपल्या कृषीप्रधान भारत देशात बैलांना फार महत्व आहे. पोळा हा बैलांचा सण आहे. श्रावण अमावास्येला पोळा साजरा केला जातो. बैल म्हणजे श्रम म्हणजेच कष्ट. अशा कष्ट करणाऱ्याची पूजा म्हणजेच जो दुसऱ्यासाठी  श्रम घेतो अशा श्रमदेवतेची पूजा करण्याचा हा दिवस होय. या दिवशी फक्त बैलांचीच नव्हे तर शेतीसाठी लागणाऱ्या नांगर, विळी, कोयता, खोर इत्यादी साधनांचीदेखील पूजा केली जाते. सजीवाबरोबर निर्जीवामध्येदेखील ईश्वर बघण्याची, त्याची पूजा करण्याची आपल्या संस्कृतीची परंपरा आगळीच म्हणावी लागेल.

‘शेतकऱ्याचा बैल आणि गरिबाची बायको आजारी पडू नये’ अशी एक ग्रामीण म्हण आहे. यावरूनच शेतकऱ्यासाठी बैल किती महत्वाचा व अनिवार्य आहे हे समजेल. बैलाचे शेतकऱ्यावरती अनंत उपकार असतात व हे तो आयुष्यभर फेडू शकत नाही म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा अत्यंत आत्मियतेने साजरा केला जातो.

पोळ्याच्या दिवशी बैलांना न्हाऊ घालतात. पंचारती ओवाळतात. पुरणपोळ्यांचा नैवद्य दाखवितात. शिंगाना हिंगूळ वं बेगड लावतात. गळ्यात सुंदर माळा वं पायात घुंगरूदेखील बांधतात. संपूर्ण शरीरावर सुंदर नक्षीकाम करतात. पाठीवर रंगीबेरंगी झुल टाकतात. एखाद्या नव्या नवरीच्यावर त्याचा शृंगार करतात. आपले हे अनोखे रूप बघून बैलदेखील उत्साहाने खुलतात. एवढे सगळे करून झाल्यावर त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढतात. आपला बैल हा प्रत्येक शेतकऱ्याचा अभिमान असतो. आपल्या सख्या भावाप्रमाणे बैलावर प्रेम केले जाते.

गावाच्या वेशीवर मारुतीचे मंदीर असते. मारुती हे बुद्धी वं चपळतेचे दैवत असल्याने हे दोन्ही गुण आपल्या बैलात यावेत, त्यांना कोणाचीही दुष्ट बाधा होवू नये म्हणून बैलांना देवळात नेण्याची प्रथा आहे.

आपल्या उपकारकर्त्याला इतक्या पूज्य भावाने, कृतज्ञतेने, उत्साहाने मिरवायची, गावात फिरवायची प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. ह्या दिवसाची बैलाबरोबर शेतकरीही आनंदाने वाट बघत असतो.

श्रमाला मोल नाही. श्रमकरी हा देवासमान असतो हाच संदेश आपल्याला पोळा या सणातून मिळतो म्हणून आपण श्रमाला कधीही कमी लेखू नये. केलेले श्रम हे कधीही वाया जात नाहीत हे सतत लक्षात ठेवावे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

मातृदिन (पिठोरी अमावस्या) रक्षाबंधन

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere


खरतर कालच हा लेख पोस्ट करायचा होता पण काही कारणांमुळे राहिला. तरी आज पोस्ट करत आहे.

मातृदिन (पिठोरी अमावस्या)


ज्या संस्कृतीत गुरुची पूजा होते. प्राण्यांची पूजा होते इतकेच काय पण निर्जीव वस्तूंचीदेखील पूजा होते ती संस्कृती मातेला कशी विसरेल. अशा या मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या होय.

श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा जीला अपत्यसुख लाभत नाही, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात. हे व्रत पूजाप्रधान असून चौसष्ठ योगिनी या  त्याच्या देवता आहेत.

श्रावण अमावास्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्रमंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना करावी, त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्तीदेवतेच्या मूर्ती स्थापाव्यात. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ सुपाऱ्या मांडून योगिनींचे आवाहन करावे. या  चौसष्ठ योगिनी म्हणजे उपजीवेकेसाठी उपयुक्त चौसष्ठ कलाच आहेत. त्याचीच ही प्रतिके आहेत. त्यांचीच पूजा करावी. व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात.

अशी ही स्त्रीला पुत्रवती बनविणारी अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. श्रावण वद्य अमावास्येलाच  ‘दर्भग्रहणी अमावस्या’ म्हणतात.

आपल्या संस्कृतीत मातेला फार महत्व आहे, तिचा मोठा गौरव केला आहे. आई ही केवळ मुलांचीच नव्हे तर त्यांच्या संस्कारांचीही जननी आहे. आई ह्या दोन अक्षरी छोटयाशा शब्दात विश्वाला गवसणी घालण्याचे अतूट सामर्थ्य आहे. वात्सल्य वं त्यागाची मूर्ती म्हणजे आई होय. अशी ही आई एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही. म्हणूनच तिला ‘माऊली’ असे आदराने म्हणले जाते.

समाजात स्त्रियांचे महत्व समजण्यासाठी घरोघरी भाऊबीज, रक्षाबंधनाप्रमाणे  मातृदिन साजरा झाला पाहिजे. जी माता आपल्या मायेने, त्यागाने, ममत्वाने मुलांची, घरादाराची सेवा करते तिच्याविषयी योग्य ती जाणीव समाजाला होऊन तिच्याप्रती आदर व्यक्त झालाच पाहिजे.

जर आपण नागपंचमी थाटात साजरी करू शकतो तर आपल्याला जन्म देणाऱ्या जननीच्या त्यागाचा, सेवेचा, समर्पणाचा, ओदार्याचा मातृदिन उत्साहात साजरा करून तिच्या चरणी कोटी कोटी प्रणाम अर्पूया हाच मातृदिनाचा खरा संदेश आहे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

नागपंचमी पोळा (बेंदूर)

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere


गोकुळाष्टमी ( श्रीकृष्ण जयंती)


आपल्या हिंदू संस्कृतीचे भाग्य किती थोर आहे बघा ज्या संस्कृतीत मर्यादापुरुषोत्तम राम जन्मला त्याच संस्कृतीत श्रीकृष्णासारखा पूर्णपुरुषोत्तम युगपुरुषही जन्माला आला. वैयक्तिक नैतिकता म्हणजे काय ते आपण रामाकडून शिकावे तर सामाजिक एकात्मता म्हणजे काय हे श्रीकृष्णाकडून.

श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना कंसाच्या बंदिशाळेत,गोकुळात झाला  म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी म्हणतात. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात हा जन्मदिवस साजरा करतात. या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी एकत्र करून कालाविणे म्हणजेच “काला” होय. यालाच दहीकाला असे म्हणतात. या दिवशी दहीकाला करून खाण्याचा प्रघात आहे. श्रीकृष्णाचा हा आवडता खाद्यपदार्थ होता.

श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला असूनदेखील गरीब, दिनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये रमला, बागडला. या मुलांना दूध-दही मिळत नसे तेंव्हा श्रीकृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत वा उच्च नीच असा भेदभाव केला नाही. त्याला अर्जुनाबद्दल जितके प्रेम होते तेवढेच सुदाम्याबद्दल आपलेपण होते.ह्यामधूनच समाजाशी एकरूप होण्याचे त्याचे आचरण दिसून येते.

भाविक मंडळी अष्टमीला उपवास करतात व नवमीला सोडतात. या दिवशी सर्व लहान थोर मानवी साखळी काढून रस्त्याने मिरवणूक काढतात. तेंव्हा घराघरातून लोक घागरी भरून त्यांच्यावर पाणी ओततात. ठिकठीकाणी चौकाचौकात बांधलेली दहीहंडी मानवी मनोरा रचून शाररीक कौशल्याने ती फोडतात ह्या सणातून आपल्याला खेळाचे, शाररीक कौशल्याचे म्हणजेच आरोग्याचे महत्व पटते. समाजात एकोपा राहण्यासाठी, प्रेम वाढविण्यासाठी असे खेळ खूप मोलाची भूमिका निभावतात. श्रीकृष्ण तर दहीहंडी, विटीदांडू, मल्लकुस्ती अशा खेळांचा आद्यपुरस्कर्ता होता. ह्या सर्व भारतीय खेळांचा प्रसार श्रीकृष्णामुळे सर्वसामान्यांपर्यंत झाला.

श्रीकृष्णाने कर्माचे महत्व गीतेद्वारे सांगून आपल्या कर्तव्यात कधीही कसूर करू नये हा संदेश समाजाला दिला. श्रीकृष्णाचे संपूर्ण आयुष्य हे  समाजासाठी एक आदर्श होऊन राहिले आहे. त्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रात खेळ, समाज, तत्वज्ञान, नैतिकता,कर्तव्य एक आदर्श  निर्माण केला आहे. जो आपल्याला एका दीपस्तंभासारखा दिशा दाखवत राहील.

श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करीत रहावे. फळाची किंवा कोणत्याही लाभाची अपेक्षा ठेवू नये. आसक्तिरहित कर्मच श्रेष्ठ ठरते. अशा या प्रयत्नवादी, ध्येयवादी पुरुषोत्तमाने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा निश्चय करणे हाच गोकुळाष्टमीचा संदेश आहे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

नागपंचमी रक्षाबंधन

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere