Archive for the ‘झम्प्याचे उद्योग व उद्योजग’ Category


इतर तिघे भाऊ अभ्यासात हुशार पण याचा आणि अभ्यासाचा मात्र छत्तीसचा आकडा. ते सर्व भाऊ शिकायचे इग्रंजी माध्यमात तर हा होता तामिळ माध्यमात. सदा अभ्यासात मागे राहिल्याने न्यूनगंडही सोबतीला.  पण त्याच्या आवडीनिवडी काहीतरी वेगळ्याच होत्या. पाचवीत वगैरे असेल तो आणि त्याच्याकडे होती ५०० कबुतरे, भरपूर मासे आणि अनेक प्रकारचे पक्षी. आणि त्याचबरोबर आणखीही एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे धंद्याची समज. त्या वयातही तो स्वतःची पॉकेट मनी त्याच्या छोट्याशा प्राण्यांच्या धंद्यातूनच कमवायचा.

त्याच्या वडलांचे नाव होते चिन्नी कृष्णन. ते एक शेतीतज्ञ होते. त्याचबरोबर त्यांचा ओषाधांचाही व्यवसाय होता. ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रत्यत्न करीत असत. नवीन कल्पना,नवीन शोध हाच त्याचा ध्यास होता. अशीच एक त्यांना सुचलेली कल्पना म्हणजे पाऊचची(sachet). त्याकाळी टाल्कम पावडर फक्त डब्यातून विकली जायची. त्यांनी ती पाऊचमधून विकायला सुरवात केली. १००/५०/२० ग्रामच्या पाऊच मधून..अशाच प्रकारे ते मीठही विकायचे. त्यांचे म्हणणे एकच होते की माझे उत्पादन (प्रोडक्ट) हे सामान्यातल्या सामान्यापर्यंत पोहचायला हवे. हमालापासून ते रिक्षावाल्यापर्यंत सगळ्यांना परवडले पाहिजे. पाऊचमधून वस्तू विकणे हेच त्यांचे ध्येय होते. भविष्यात वस्तू अशाच विकल्या जातील असेही ते म्हणायचे. पाऊचसारख्या अनेक इनोवेटिव कल्पना त्यांनी राबविल्या पण तरीसुद्धा ते जास्त यशस्वी होऊ शकले नाहीत. कारण एकच…विक्रीची कला त्यांना कधी जमलीच नाही. याच आघाडीवर त्यांनी मार खाल्ला. कोणतेही उत्पादन बनविण्यापेक्षाही ते विकले जाण्यावर त्या वस्तूचे महत्व टिकते हे त्यांच्या लक्षात आले नाही. पण हीच गोष्ट त्यांच्या त्याच मुलाने व्यवस्थीत समजून घेतली व यशस्वीपणे वापरली जो सर्वात अपयशी वं ढ समजला गेला होता.

त्या मुलाचे नाव आहे  सी.के.रंगनाथन. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा व्यवसाय आपोआपोआपच भावांच्या हातात गेला. त्यांनी वेलवेट नावाचा एक शाम्पू तयार केलेला. सी.के. ही त्यांच्याबरोबर काम करू लागला होता. तो शाम्पूचे उत्पादन ज्या युनिटमध्ये व्हायचे तिथेच काम करायचा. पण थोड्याच दिवसात त्याचे व भावाचे काही जमेना. म्हणून एक दिवस त्याने त्यांना रामराम ठोकला.

नुसताच घराला वं व्यवसायाला रामराम नाही ठोकला तर आपल्या घरेलू व्यवसायावरील सगळ्या हक्कांवरही पाणी सोडले. आणि हाच निर्णय त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. खिशात बचत केलेले फक्त १५००० रुपये आणि शून्यातून काहीतरी उभे करायची प्रचंड मोठी जिद्द. ह्या दोन भांडवलावर(?) तो आता काहीतरी करणार होता. काय ते त्याचे त्यालाही माहित नव्हते कारण आत्तापर्यंत फक्त दोनच गोष्टी त्याने केल्या होत्या एक म्हणजे प्राणी पाळणे वं दुसरे म्हणजे शाम्पू बनविणे. खूप विचारांती त्याने दुसरा मार्ग अवलंबिला. २५० रु.महिना जागा भाडे, फॅक्टरी ३०० रु.भाडे, शाम्पू पॅकिंग मशीन ३००० रु. ह्या गुंतवणुकीवर त्याचा धंदा सुरु झाला.

शाम्पूचे नाव वडिलांच्या नावाच्या आद्याक्षरावरून चिक (Chinni Krishnan… CHIK) असे ठेवण्यात आले. धंद्यात पाय रोवायला वर्षभराचा काळ गेला. हा कालावधी खूप काही शिकण्यातच गेला आणि त्याच्याच बळावर दुसऱ्या वर्षीपासून हळूहळू फायदा काय तो दिसायला लागला.  धंदा वाढत होता आणि त्यासाठी आता मोठ्या गुंतवणुकीची पर्यायाने भांडवलाची गरज होती. गहाण ठेवायला काहीही तारण नसल्याने कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नसे. शेवटी तीन वर्षानंतर एका बँकेने कर्ज मंजूर केले. त्याला कारणही तसेच घडले कर्जासाठी दिलेली कागदपत्रे तपासताना बँक मॅनेजरच्या हे लक्षात आले की जरी तारण नसले तरी एक गोष्ट मात्र ह्यांच्याकडे आहे ती म्हणजे गेल्या तीन वर्षाचे इन्कमटॅक्स भरलेले पेपर्स. त्याकाळी कोणतेही असे छोटे युनिट इतके व्यवस्थितपणे इन्कमटॅक्स भरत नसे…ही एकच जमेची गोष्ट ध्यानात घेऊन २५००० रु.चे कर्ज मंजूर झाले…त्याचेच पुढे जाऊन ४ लाख पुन्हा पुढे १५ लाख असे चक्र चालूच राहिले. आणि इथून पुढे चिक( CHIK) शाम्पूला मागे वळून बघायला वेळ मिळालाच नाही. त्यांची वाटचाल दक्षिण भारतातील नंबर एककडे सुरु झाली.

पाच कोणतेही रिकामे पाऊच आणा व एक चिक शाम्पूचे पाऊच घेऊन जा. पाच चिक शाम्पू विकत घ्या सहावा मोफत मिळावा.. अशा एक न अनेक स्कीम्स राबवून विक्री ३५००० रु. महीन्यावरून १२ लाख रु. महिन्यावर गेली. त्यानंतर चिकचे चमेली वं गुलाब असे दोन नवीन सुगंधी शाम्पू बाजारात आले ज्यामुळे महिना विक्री रु. ३० लाखापर्यंत गेली. आणि जेंव्हा जाहिरातीसाठी अभिनेत्री अमलाला करारबद्ध करण्यात आले तेंव्हा तर कहरच झाला गुलाब चिक शाम्पूची विक्री महिना १ करोड रुपयापर्यंत पोचली…जे वडिलांना जमले नव्हते करायला ते त्यांच्या मुलाने करून दाखविले. चिक शाम्पू फक्त नऊ वर्षात दक्षिण भारतातला नंबर एकचा शाम्प्पू झाला.

सध्या ग्रामीण बाजारपेठ शहरी बाजारापेठेपेक्षा दुप्पट वेगाने वाढते आहे. हे सी.के.नी वेळीच ओळखले वं आपले संपूर्ण लक्ष ग्रामीण भारताकडे वळविले. गावागावात त्यांनी आपल्या शाम्पूची प्रात्यक्षिके दाखवायला सुरवात केली. शाम्पू कसा वापरायचा हे देखील शिकविले. त्यासाठी एका मुलाचे शाम्प्पूने डोके धुणे त्याच्या केसांचा सुगंध,स्पर्श इतरांना देणे. असे नाना विविध मार्ग वापरले. त्याचाही होयचा तोच परिणाम झाला विक्री आणखीन ४ पटीने वाढली.

अशा प्रकारे ७ वर्षाचा काळ लोटला. आता शाम्पूशिवाय आणखीही काही प्रोडक्टस असावेत असा रास्त विचार करावयास सुरवात झाली. आणि त्यांचे लक्ष त्यावेळेस शॉ वॉलेसने काढलेल्या हर्बल पावडरकडे गेले. पण योग्य विक्रीकौशल्याभावी त्यांना ते विकता आले नव्हते. याच संधीचा लाभ उठवत सी.के.नी मीरा हर्बल पावडर बाजारात आणली. तिसऱ्याच महिन्यात पहिला नंबर व सहाव्या महिन्यात बाजारपेठेचा ९५ टक्के हिस्सा असे अभूतपूर्व यश मिळविले..उरलेला ५ टक्के हिस्साच काय तो शॉ वॉलेसकडे राहिला.

आता त्यांनी आपला मोर्चा सौंदर्य प्रसाधानांकडे वळवायचे ठरविले. पण त्यासाठी एक योग्य नाव पाहिजे होते म्हणून आपल्याच कर्मचारी वर्गात त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली. नवीन नाव सुचविण्याची. एका कर्मचार्‍याने नाव सुचविले केविनकेअर (CavinKare) ज्यात C आणी K हे कॅपिटल लेटर्स असतील. हे नाव निवडले गेले त्याचे एक कारण म्हणजे ह्यात सी.के. च्या वडिलांच्या नावांची आद्यक्षरे होती.(व त्यांच्या स्वतःच्या पण) वं दुसरे कारण होते तामिळमध्ये केविनचा अर्थ होतो सौंदर्य,ग्रेस.

नाव नक्की झाल्यावर त्यांनी पहिले उत्पादन काढले ते म्हणजे परफ्युम. (मराठीत बहुतेक अत्तर म्हणतात याला) त्याचे नाव होते स्पीन्झ. कदाचित तुम्हीही स्पीन्झ वापरले असेल. दहा रुपयाच्या पॅक मध्ये ते लाँच करण्यात आले. ज्याचा सरळ सरळ उद्देश निन्म मध्यमवर्गीयांना परफ्युम वापरावयास उत्तेजीत करणे हा होता वं जो प्रमाणाच्या बाहेर यशस्वीही झाला. असेच त्यांनी हळू हळू एक एक वेगळे प्रोडक्टस् काढायला सुरवात केली ज्याचे मुख्य उद्दिष्ट होते समाजातील खालच्या स्तरातील लोकांना उच्च प्रतीचे उत्पादन स्वस्तात उपलब्ध करून देणे.

तर अशा या अवघड प्रवासात ,गळेकापू स्पर्धा असलेल्या क्षेत्रात , जिथे लोकांच्या आवडीनिवडी रोज बदलत असतात तिथे इतकी वर्षे आतरराष्ट्रीय कंपन्यांना तोंड देत त्याच दर्जाची कंपनी शून्यातून उभी करून यशस्वीपणे चालवायची हे एक खूप मोठे वं सर्व भारतीयांना अभिमान वाटेल असे काम सी.के.रंगनाथन गेली कित्येक वर्षे मोठ्या जबाबदारीने करीत आहेत.

मित्रांनो आपण नेहमी भांडवल नाही, शिक्षण नाही, ओळख नाही अशा सबबी सांगून स्वत:ची फसवणूक करत असतो. पण जर तुम्हाला खरोखरच काही करायची तीव्र इच्छा असेल तर मार्ग आपोआप तयार होतात हेच सी.के.रंगनाथन यांनी खिशात फक्त १५००० रुपये असताना ५०० करोड रुपये उलाढाल असलेली कंपनी निर्माण करून आपल्याला दाखवून दिले नाही काय? (त्यांचे पुढील लक्ष्य येत्या तीन वर्षात कंपनीची उलाढाल १५०० करोड रुपयांपर्यंत नेणे हे आहे.)

मित्रांनो वरील लेख मी सी.के.रंगनाथन यांच्या ज्या मुलाखतीवरून लिहिला आहे ती मुलाखत जर तुम्हाला वाचायची असेल तर लींक येथे देत आहे.

Share on Facebook

Share

Yahoo Buzz Yahoo Buzz

Google Buzz Google Buzz

Add this anywhere Add this anywhere


इंटरनेटचे लहान मुलांवर दुष्परिणाम ह्यावर एक फार मोठा ग्रंथ सहज तयार होईल. या विषयावर अनेक तास चर्चाही करता येईल. पण या जगात अशीही काही लहान मुले आहेत ज्यांनी या माध्यमाचा एक व्यवसाय म्हणून विधायक उपयोग केला आणि आता ते भावी पिढीचे एक नवीनच प्रकारचे आदर्श बनले आहेत.

वयाच्या सोळाव्या वर्षी तुम्ही काय करत होता? किंवा तुम्हाला जर असे विचारले तुम्ही वयाच्या सोळाव्या वर्षी किती कमवत होता? तर एकतर तुम्ही उत्तर द्याल वयाच्या सोळाव्या वर्षी आम्ही शिकत होतो किंवा जर काही कमवत होतो तर ती रक्कम नक्कीच सांगण्याइतकी विशेष नाही.(काही सन्माननीय अपवादही असतील इथे) तर आज मी तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहे ज्याने वयाच्या १६ व्या वर्षी स्वतःच्या कमाइने १ बिलिअन डॉलर्स कमविले आहेत…..व अजूनही तो कमवतोच आहे.

त्या मुलाचे नाव आहे ख्रिस्टीन ओवेन्स.(Christian Owens) तो एक ब्रिटीश नागरिक आहे. त्याचा आदर्श आहे अ‍ॅपल कंपनीचा CVO स्टीव्ह जॉब्स. त्याच्याच विचारांची अक्षरशः नक्कल करून तो हे करत आहे. who dares wins  म्हणजे जो साहस करेल तोच जिंकेल. या स्टीव्हच्या विचारावर त्याला पूर्ण विश्वास आहे. ख्रिस्टीन ७ वर्षाचा असताना त्याला त्याचा पहिला कॉम्पुटर मिळाला. त्यानंतर तीनच वर्षानी त्याला मॅक (अ‍ॅपलचा कॉम्पुटर) मिळाला. ज्यावर त्याने वेब डीजायनिंग शिकायला सुरवात केली आणि त्यानंतर बरोबर चार वर्षांनी म्हणजे वयाच्या १४ व्या वर्षी त्याने त्याची पहिली कंपनी सुरु केली. तिचे नाव ठेवले Mac Bundle Box. ही एक साधी वेबसाईट होती. जिच्यावर तो अ‍ॅपलची अ‍ॅप्लीकेशन्स कमी किमतीत विकत असे. ह्या वेबसाईट्ची कल्पना पण त्याने दुसऱ्या एका अशीच सर्विस देणाऱ्या MacHeist या वेबसाईटवरून सहीसही उचलली होती. कन्सेप्ट तशी खूप साधी होती. घाऊक रेटमध्ये अ‍ॅप्लीकेशन्स विकत घ्यायची व डिस्काउंट रेटमध्ये ठराविक वेळेत विकायची. उदाहरणार्थ तो काही अ‍ॅप्लीकेशन्सचे एकत्र बंडल बनवायचा. त्यांची बाजारातील एकत्रीत किमत जर ४०० डॉलर्स होत असेल तर तो ते बंडल चक्क  ५० डॉलर्सला विकायचा. म्हणजे एक दशांश किमतीत. वर शिवाय जर ग्रुपने खरेदी केली तर आणखी एक अ‍ॅप्लीकेशन्स बोनस म्हनून द्यायचा… ह्या अशा स्कीममूळे झाले काय की त्याची तोंडी जाहिरात खूप झाली…ग्रुपच्या ग्रुप खरेदीसाठी यायला लागले. त्याचा खप लाखोंने वाढला. वेबसाईट सुरु झाल्यापासूनच्या पहिल्या दोन महिन्यातच त्याच्या खात्यावर एक लाख डॉलर्स जमा झाले.

तरी सुद्धा हा पठ्या काही समाधानी नव्हता. त्याची भूक मोठी होती. त्याला हे असे अ‍ॅप्लीकेशन्स विकण्यात एवढा रस राहिला नव्हता. त्याने आता मोठी झेप घ्यायचे ठरविले. व त्या झेपेला नाव दिले Branchr. हीसुद्धा एक नक्कलच होती. गुगलच्या या जमान्यात पे पर क्लिकचा फंडा त्याने वापरला. महिन्याला १७५० वेबसाईटवर ३०० मिलिअन जाहिराती झळकायला लागल्या. वेबसाईट सुरु केल्याच्या पहिल्याच वर्षी ८ लाख डॉलर्स इतकी त्याची कमाई होती. आता सध्या त्याच्या कंपनीत त्याच्या हाताखाली ८ अ‍ॅडल्ट्स काम करतात. त्यातली एक ४३ वर्षे वय असलेली त्याची आई आहे.

आणखीन १० वर्षानंतर तो कुठे असेल हे त्याचे त्याला नक्की सांगता येत नाही…हा पण त्याचे पुढचे टारगेट आहे १०० मिलिअन बिटिश पौन्ड. त्याची वाटचाल अशीच चालू राहिली तर तो हे टारगेट खूप लवकरच पूर्ण करेल.

एकदा त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले..तुझ्या यशाचे नेमके रहस्य काय? तर तो हसून इतकेच म्हणाला “रहस्य वगैरे काही नाही फक्त खूप मेहनत, ठाम निर्धार आणि प्रचंड काहीतरी मोठे करण्याची जिद्द.” (आणि  MacHeist ची नक्कल)

तर मित्रांनो असे हे इंटरनेट नावाचे माध्यम आपल्याही हातात आहे. आपल्याही डोक्यात अशा काही कल्पना सतत चमकत असतात. पण आपण नेहमी त्याकडे दुर्लक्ष करतो..किंवा स्वतःला कमी लेखून ही असली भानगड आपल्याला झेपायाची नाही असे स्वतःच बजावतो…तर इथून पुढे विचार करा वयाच्या १४ व्या वर्षी जर ख्रिस्टीन असे साहस(?) करू शकतो तर तुम्ही आम्ही का नाही?

नक्की कुठे कमी पडतो आपण?
—————————————————————————————————————————————————————————————–

Share on Facebook Share

Google Buzz Google Buzz Yahoo Buzz

email this email this


फार फार वर्षापूर्वी..
एक छोटेशे खेडेगाव.. पसरणी त्याचे नाव

राहायचा तिथे एक छोटा मुलगा
होते आईवडील व मोठे भाऊ सहा

घरची गरिबी इतकी, पैसा नसे शिक्षणाला
त्यातून मार्ग काढत मुलगा गेला पाचवीला

पुढचे शिक्षण त्याचे झाले वाईला
जिद्द,कष्ट व हुशारी सतत त्याच्या जोडीला
झाला मॅट्रिक आणि उडाला पुण्याला
‘कमवा व शिका’चा त्याने मार्ग अवलंबला
काबाडकष्ट करत एक दिवस सिविल इंजिनिअर बनला

“नोकरीत प्रगती नाही” तो चांगलाच ओळखून होता
म्हणून स्वत:चा एक छोटा कन्सट्रक्‍शनचा व्यवसाय सुरू केला
पण नव्हता कसलाच अनुभव जोडीला
अपयशाने लगेचच त्याचा दरवाजा ठोठावला

गडी होता मोठा तयारीचा, त्याने धीर नाही सोडला
धंद्याला रामराम नाही ठोकला.
हळू हळू त्यातून बाहेर पडला.
केले पडेल ते काम मिळेल त्या किमतीला
मन लावून दिवसरात्र सतत झटतच गेला
खूप लोकांचा त्याने विश्वास संपादन केला
याच विश्वासाने यशाचा दरवाजा आपोआप उघडला
हळू हळू तो उद्योग धंद्यात स्थिरावू लागला

पण संकटांनी त्याला सदा पछाडलेला
एकापेक्षा एक संकट सदा पाठीला
तर चिकाटी, आशा व आत्मविश्वास छातीला

असे त्यांचे सदा युद्ध चाले…
कधी तो जिंके व कधी हारे
पण गडी लढायचे काही थांबवेना…
अखेर संकटांनीही हार मानली
व यशाने पायावर एकदाची लोळण घेतली

मिळता यश नाही विसरला गावाला
नेले परदेशात घरटी एकाला
अख्या गावाचा त्याने कायापालट केला

मित्रांनो असा हा आपला लढवय्या
काल आपल्याला सोडून गेला
लोकांसाठी तो फक्त एक उद्योजक बी.जी.शिर्के होता
माझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता
अमिताभपेक्षाही खूप मोठा होता

सकाळी पेपरात वाचले आपला हिरो निघून गेला
खर सांगतो पोटात मोठा खड्डा पडला
कॉलेजला बंक मारून वाचलेले उद्योगपर्व आठवले
कितीतरी दिवस त्याने होते मला झपाटले

असा बी.जी. माझा आदर्श होता
सरकारने त्याला पद्मश्री म्हणून गौरविला होता

तर माझ्या (उद्योजक) मित्रांनो ही होती बी.जी.शिर्केना माझ्यातर्फे श्रद्धांजली.
कालच त्यांचे पुण्यात निधन झाले. ह्या ३ ऑगस्ट पर्यंत ते काम करीत होते. त्याचे वय फक्त ९२ वर्षे होते.
त्यांनी आयुष्यात खूप संकटाना मोठ्या धैर्याने तोंड दिले. त्याची कहाणी तुम्ही त्यांच्याच शब्दात त्यांच्या आत्मचरित्रात (उद्योगपर्व) वाचू शकता.
ते एक पुस्तक नसून एक प्रेरणास्त्रोत आहे…जो तुमच्यातील उद्योजकाला जागे करील…आधीच उद्योजक असाल तर धीर, धैर्य, संयम, साहस, चिकाटी शिकवेल. संकटांना कसे सामोरे जायचे हे शिकवेल. नुसते शिकवणार नाही तर तुमच्या हाताला धरून त्यातून बाहेरही काढेल.
त्यांच्याबद्दल खूप काही लिहण्यासारखे आहे. पण आता थांबतो…
जर कोणाला त्यांचे अल्पचरित्र जाणून घ्यायचे असेल तर इथे इथे क्लिक करा.
व आणखी खोलात उतरायचे असेल तर उद्योगपर्व निश्चित वाचा.


Share/Bookmark


मागील एका पोस्टमध्ये आपण एका भारतीय उद्योजकाची माहिती घेतली ज्याने मोठमोठ्या जागतिक कंपन्यांना तोंड देत अगदी शून्यातून एक अवाढव्य उद्योग उभा केला. व लाखोंना  रोजगार मिळवून दिला. आजही आपण अशाच आणखी एका अवलीया पण अमेरिकन उद्योजकाची माहिती करून घेणार आहोत ज्याने अगदी असाच शून्यातून एक उद्योग सुरु केला व थोड्याच कालावधीत त्याला एका जागतिक कंपनीचे स्वरूप दिले.

त्या अवलियाचे नाव आहे फील नाईट(Philip Hampson “Phil” Knight). तुमच्यामाझ्यासारखाच असलेला फील कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच त्याच्या डोक्यात एक कल्पना घोळत होती. त्या कल्पनेचे मूळ लपले होते एका अडचणीत. तो एक चांगला धावपटू असल्याने त्याला चांगल्या शूजची (बुटांची हा शब्द मला नाही आवडत) सारखी गरज लागत असे. त्यावेळेस अमेरिकन शू मार्केटमध्ये आदिदास व प्युमा या कंपन्यांची मक्तेदारी होती. पण फिलला या कंपन्यांचे शूज खूप महागही वाटायचे व त्यांचा दर्जाही धावपटूंच्या गरजेपेक्षा खूप कमी वाटायचा. त्याला हे शूज खूप जड वाटायचे…रोज ५ मैल धावल्यावर एक दिवस आपले पाय रक्तबंबाळ होतील की काय अशी भीती त्याला सारखी वाटायची. आणी ह्यच भीतीतून म्हणा किंवा अडचणीतून म्हणा त्याच्या डोक्यात आपण आपले स्वतःचे शूज बनवून विकायचे ही कल्पना निपजली.

कॉलेज संपल्यावर फीलने Stanford Graduate School of Business येथे प्रवेश घेतला. आणी येथेच त्याला त्याच्यातील उद्योजकाची सर्वप्रथम ओळख झाली. येथे विद्यार्थ्यांना टर्मच्या शेवटी एक बिजनेस प्लॅन लिहावा लागायचा. फीलने लिहिलेल्या प्लॅनचे नाव होते “ जें जापनीज कॅमेराने जर्मन कॅमेर्‍याबरोबर केले तेच जापनीज शूज जर्मन शूजबरोबर करू शकतात काय?” फीलचा आपल्या उद्योगाचा अभ्यास झाला होता.

कॉलेज संपताच फीलने ताबडतोब जपान गाठले. जपानमधील कोबेमध्ये त्याने Onitsuka Co. या कंपनीचे टायगर या ब्रँड नावाने असलेले शूज पाहिले. वाजवी किमत व उत्कृष्ट दर्जाचा आदर्श मिश्रण असलेले हे शूज बघताच फील त्यांच्या प्रेमातच पडला. त्याने लगेचच त्या कंपनीबरोबर आपले डील फायनल केले व तो अमेरिकेला परतला.

जपानवरून शूजचा पहिला लॉट यायला जवळजवळ एक वर्षाचा काळ लागला. तोपर्यंत पठ्याने चक्क वर्षभर अकाऊंटंट म्हणून नोकरी केली. जशी शूजच्या पहिल्या लॉटची डिलीव्हरी हातात आली  त्याने पहिले काम केले ते म्हणजे आपला प्रशिक्षक बील बोवरमनला (Bill Bowerman) दोन जोड पाठवून दिले. ह्या अपेक्षेने की बीलमुळे आपल्या शूजची थोडी जाहिरात व थोडी विक्रीपण होईल. फीलची अपेक्षा बीलने नुसती पूर्णच  नाही केली तर त्याला चक्क भागीदारीची ऑफरही दिली. बदल्यात शुजसाठी चांगले डिझाईन्स बनवून द्यायचेही कबूल केले. ही सुरवात होती ब्लू रिबन स्पोर्ट्सची.

सुरवातीच्या काळात दोघे आपल्या गाडीतून मैदानांवर जायचे व गाडीचा उपयोग चक्क दुकानासारखा करून शूज विकायचे…शुजच्या विक्रीसाठी अशा अनेक अफलातून कल्पनांचा जन्म फीलच्या डोक्यातून होयचा.थोड्याच दिवसात त्यांच्या शूजची मागणी वाढली. मग त्यांनी टायगर ब्रॅंडबरोबर असलेला आपला करार संपविला व आपले स्वत:चे नाईकी लाईन शूज चे उत्पादन सुरु केले. नाईकी हे नाव त्यांनी ग्रीक विजयाची देवता नाईकीवरून घेतले. थोड्याच दिवसात ब्लू रीबन्सचे नामांतरपण नाईकी असेच झाले.

वेगवेगळया इनोवेटीव कल्पना वापरून फील आपल्या कंपनीची जाहिरात करत होता. पण त्याच्या डोक्यात सतत विचार चालू होते की आपण स्वत:च आपले प्रोडक्ट पुश करण्यापेक्षा जर यशस्वी धावपटू वा खेळाडूंकडून ते पुश केले तर त्याचा जास्त फायदा होईल. आणी इतक्यात त्यांचे नशीब फळफळले. बील बोवरमनला अमेरिकेच्या नॅशनल ऑलिम्पिक टीमचा कोच बनविण्यात आले..त्यामुळे झाले काय की जवळजवळ सगळी टीम नाईकीचे शूज घालून मैदानावर उतरू लागली.

ज्याचा फायदा उठवत फीलने एक एक खेळाडूला नाईकीचे शूज घालायला म्हणजेच करारबद्ध करायला सुरवात केली. जेंव्हा त्याने जॉन मॅकेंन्रोला पहिल्यांदा करारबद्ध केले तेंव्हा त्यांचा सेल दहा हजारावरून एकदम १० लाखांपर्यंत पोचला. असेच आणखी बरेच सेलिब्रिटी खेळाडू त्याने करारबद्ध केले ज्यांची नुसती नावे वाचली तरी आपल्याला फीलच्या उडीचा अंदाज येईल. मायकल जॉर्डन, टायगर वूड्स, आंद्रे आगासी. असे एक न अनेक दिग्गज त्याने नाईकीच्या झेंड्याखाली आणले.  जेंव्हा त्याने बास्केटबॉल किंग मायकल (ज्याला अमेरिका मॅजिक जॉन्सन म्हणून ओळखायची) जॉन्सनला करारबद्ध केले तेंव्हा नाईकीचा खप १०० मिलिअन डॉलर्सच्या पुढे गेला. व त्यानंतर आणखी काही कालावधीत तो चक्क १ बिलिअन डॉलर्सच्याही पार गेला. नाईकी आता फक्त शूज बनविणारी कंपनी राहिली नव्हती तिचे रुपांतर आता स्पोर्ट्सवेअर अ‍ॅसेसरिज बनविणाऱ्या एका मोठ्या कंपनीत झाले होते. शूज जायंट आदिदासला ग्लोबलली मागे टाकून नाईकी नंबर एक वर विराजमान झाली. व जगाने पुन्हा एकदा आजमावले एक सामान्य माणूस आपल्या सामान्य कल्पनेच्या व असामान्य मेहनत आणी प्रतिभेच्या जोरावर केवढे मोठे कर्तृत्व गाजवू शकतो.

यश नाईकीच्या पायांवर लोळण घेत असतानाच मागच्या दरवाजाने अपयशपण रिबॉकच्या रुपाने आत शिरू पाहत होते.  जरी टेक्निकली नाईकी शूजला तोड नव्हती तरी एका आघाडीवर ते मार खात होते ते म्हणजे त्याचे रुपडे. ज्यांचा परफॉरमन्सपेक्षा अ‍ॅपिअरंसवर जास्त विश्वास होता त्यांनी नाईकीपेक्षा फॅशनेबल,स्टायलीश रिबॉक ट्रेंडीला जवळ केले. पण लवकरच नाईकीने त्यांच्या तोडीस तोड नाईकी एअर बाजारात आणून पुन्हा नंबर एकचे स्थान पटकावले.

१९९३ मध्ये एकही खेळ खेळत नसलेला व कोणत्याही टीमचा मनेजर नसलेल्या फील नाईटला त्यावर्षीचा खेळातला सगळ्यात जास्त पावरफुल माणूस”( most powerful man in sports)म्हणून निवडण्यात आले. असा हा करिश्मॅटिक अवलिया फील नाईट. ज्याने अब्जावधी डॉलर्स फक्त कमविलेच नाहीत तर दानही केले. २००६ मध्ये जिथून प्रथम त्याने उद्योजगतेचे धडे गिरविले  त्या Stanford Graduate School of Business ला २००६ मध्ये १०५ मिलिअन डॉलर्स दान केले. जें तोपर्यंत कोणीही कुठल्याही बिजीनेस स्कूलला एवढयां मोठ्या प्रमाणात दान केले नव्हते. तर २००८ मध्ये त्याने Oregon Health & Science University ला १०० मिलिअन डॉलर्स दान दिले त्याची परतफेड म्हणून तिचे नामांतर OHSU Knight Cancer Institute असे करण्यात आले.

मित्रांनो तुम्ही नाईकीचे शूज कधीतरी घातले असतील? नसेल तरी हरकत नाही पण तुम्ही नाईकी यां कंपनीचे नाव तर नक्कीच एकले असेल. त्याच कंपनीच्या संस्थापकाची ही प्रेरणादायी गोष्ट.

ज्याने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले की जर तुम्ही आपल्या कल्पनांना फक्त कल्पना न समजता ती एक मोठ्या उद्योगाची सुरवात आहे असे समजाल तर तुम्ही काही चुकीचे नाही समजत आहात. so

Share on Facebook

Share

Yahoo Buzz Yahoo Buzz

Google Buzz Google Buzz

Add this anywhere Add this anywhere


andrew-carnegie

कोणी कितीही आणी कसेही नाकारले तरीही, भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची जी ओळख आहे त्यात भारतातील वेगवेगळया प्रांतातून येथे स्थलांतरित झालेल्या परप्रांतीयांचा मोठा वाटा आहे. पण हल्ली परप्रांतीय हा शब्दच नव्हे तर परप्रांतीय माणूससुद्धा खूपच कुप्रसिद्ध झाला आहे.व दुर्दैवाने हे चित्र फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर ऑस्ट्रेलियापासून इंग्लंड पर्यंत सर्व जगात पाहायला मिळत आहे.  असे का आहे? व हे चित्र बदलू शकते का? कसे? हा एक वेगळा व मोठा विषय आहे. आपल्याला इथे त्याबद्दल काहीही चर्चा करायची नाहीये. आपल्याला इथे फक्त एका अशा परप्रांतीयाची गोष्ट थोडक्यात माहिती करून घ्यायची आहे की तो ज्या मातृभूमीतून स्थलांतरित झाला ती तर त्याला कायमचे विसरली पण ज्या कर्मभूमीने त्याला आसरा दिला ती त्याला कधीच विसरू शकली नाही. विसरू शकणार नाही. व त्याचे पांगही कधी फेडू शकणार नाही..

आता जास्त कोड्यात घालत नाही. त्या परप्रांतीयाचे नाव आहे अ‍ॅन्ड्रू कार्नेगी आणी ती कर्मभूमी आहे अमेरिका. तीच जगातली सर्वात श्रीमंत अमेरिका जी कधीही ह्या अवलियाचे पांग carnegieफेडू शकणार नाही. इतके करून ठेवले आहे ह्याने तिच्यासाठी..अगदी मरेपर्यंत तो देतच राहिला…$350,000,000(एकही शून्य वाढवला नाहीये. शब्दात साडेतीनशे मिलियन डॉलर्स) इतकी  रक्कम त्याने दान केली. कशासाठी तर अमेरिकेत २५०० ग्रंथालये बांधण्यासाठी. त्याने पॅलेस ऑफ व्हील्स बांधले जें आता वर्ल्ड कोर्ट म्हणून ओळखले जाते. त्याने कित्येक महाविद्यालये,चर्चस बांधन्याकरिता तर कित्येकांना शिकण्यासाठी, उद्योगांकरिता  अमाप मदत केली. तो स्वत:ला स्वत: कमाविलेल्या पैशाचा/संपत्तीचा फक्त विश्वस्त समजायचा. व आपले काम हा पैसा लोकांच्या उपयोगाकरिता कसा वापरता येईल हे बघणे एवढेच आहे असे म्हणायचा.

असा हा अवलिया लहानपणी अतिशय गरीबीमुळे स्कॉटलंडवरून अमेरिकेला स्थलांतरीत झाला. अनेक छोटी मोठी कामे करता करता अमेरिकेतील एका सरकारी रेलरोडमध्ये कामाला लागला. तो काळ पहिले सिव्हील वॉर संपायला आलेले असतानाचा होता. आणी इथेच त्याच्यातील नेहमी जागृत असलेल्या उद्योजगाने संधी हेरली. त्याने भविष्यातील स्टीलची होणारी गरज ओळखून स्टील फॅ़क्टरी टाकली..व पुढील सहा महिन्यातच आपले उत्पन्न महिना ५०००० डॉलर्सच्या घरात पोचविले..आणी सुरवात झाली जगातील पहिल्या बिलीयोनेर कंपनीची..याचे संपूर्ण श्रेय जाते अ‍ॅन्ड्रू कार्नेगी या एका माणसाच्या द्रष्टेपणाला.आत्मविश्वासाला. काही करायचेच आहे तर मग छोटे का म्हणून करा काहीतरी मोठे,अवाढव्यच करा या त्याच्या विचाराला.

अ‍ॅन्ड्रू कार्नेगी हा नुसताच एक उद्योजग वा व्यापारी नव्हता तो एक अफलातून झपाटलेला अवलिया होता. जर तुम्हाला नेपोलिअन हिलचे “थिंक अ‍ॅन्ड ग्रो रिच”  हे पुस्तक माहित असेल तर तुम्हाला हे पण माहित असेल की ह्या पुस्तकाने जगातील हजारो लाखो लोकांना श्रीमंतीचा राजमार्ग दाखविला. व यामागची संपूर्ण कल्पना,प्रेरणा अ‍ॅन्ड्रू कार्नेगी या अवलियाचीच होती. त्याने इतक्या फॅ़क्टऱ्या उभ्या केल्या पण त्याला माशिनरीमध्ये थोडाही इंटरेस्ट नव्हता. त्याला आवड होती तर ती माणसांची. त्याचा सगळा इंटरेस्ट माणसांमध्ये होता…तो माणसांमध्येच रमायचा त्यांचा अभ्यास करायचा त्यांना हेरायचा व ह्या गुणामुळेच तो त्या काळातील अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. कामगारांना धंद्यात/फायद्यात मालकी द्यायला त्यानेच सुरवात केली..कित्येक चांगल्या गोष्टी अ‍ॅन्ड्रू कार्नेगीने सुरु केल्या..त्यातीलच एक म्हणजे जगाने उचलून धरलेली “लीग ऑफ नेशन्स” ही सुद्धा त्याचीच कल्पना.

असा हा झपाटलेला अवलिया १८३५ ला स्कॉटलंडला जन्मला १८४८ पासून अमेरिकेत राहिला व १९१९ ला जगातून सटकला…पण जाताना आपल्या मागे असे काही सोडून गेला की ज्याची परतफेड कधीही कोणालाही करता येणार नाही.

तर मित्रांनो असा हा परप्रांतीय अ‍ॅन्ड्रू कार्नेगी, स्वत: अमेरिकन नसलेला पण एखादा पक्का अमेरिकन अमेरिकेसाठी जे करू शकणार नाही त्याच्या कितीतरी पटीने करून निघूनही गेला. आणी अशाच अनेक लहान मोठ्या परप्रांतीय अ‍ॅन्ड्रू कार्नेगीना आसरा दिल्यामुळेच मुळची रेड इंडियन्सची असलेली अमेरिका आज जगावर राज्य करते आहे…

पण आपण ह्यातून कधी काही बोध घेणार की नाही?

अ‍ॅन्ड्रू कार्नेगी या अवलीयाबद्दल अजूनही काही जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करा.