Posts Tagged ‘इंजिनीअर’


फार फार वर्षापूर्वी..
एक छोटेशे खेडेगाव.. पसरणी त्याचे नाव

राहायचा तिथे एक छोटा मुलगा
होते आईवडील व मोठे भाऊ सहा

घरची गरिबी इतकी, पैसा नसे शिक्षणाला
त्यातून मार्ग काढत मुलगा गेला पाचवीला

पुढचे शिक्षण त्याचे झाले वाईला
जिद्द,कष्ट व हुशारी सतत त्याच्या जोडीला
झाला मॅट्रिक आणि उडाला पुण्याला
‘कमवा व शिका’चा त्याने मार्ग अवलंबला
काबाडकष्ट करत एक दिवस सिविल इंजिनिअर बनला

“नोकरीत प्रगती नाही” तो चांगलाच ओळखून होता
म्हणून स्वत:चा एक छोटा कन्सट्रक्‍शनचा व्यवसाय सुरू केला
पण नव्हता कसलाच अनुभव जोडीला
अपयशाने लगेचच त्याचा दरवाजा ठोठावला

गडी होता मोठा तयारीचा, त्याने धीर नाही सोडला
धंद्याला रामराम नाही ठोकला.
हळू हळू त्यातून बाहेर पडला.
केले पडेल ते काम मिळेल त्या किमतीला
मन लावून दिवसरात्र सतत झटतच गेला
खूप लोकांचा त्याने विश्वास संपादन केला
याच विश्वासाने यशाचा दरवाजा आपोआप उघडला
हळू हळू तो उद्योग धंद्यात स्थिरावू लागला

पण संकटांनी त्याला सदा पछाडलेला
एकापेक्षा एक संकट सदा पाठीला
तर चिकाटी, आशा व आत्मविश्वास छातीला

असे त्यांचे सदा युद्ध चाले…
कधी तो जिंके व कधी हारे
पण गडी लढायचे काही थांबवेना…
अखेर संकटांनीही हार मानली
व यशाने पायावर एकदाची लोळण घेतली

मिळता यश नाही विसरला गावाला
नेले परदेशात घरटी एकाला
अख्या गावाचा त्याने कायापालट केला

मित्रांनो असा हा आपला लढवय्या
काल आपल्याला सोडून गेला
लोकांसाठी तो फक्त एक उद्योजक बी.जी.शिर्के होता
माझ्यासाठी मात्र तो एक हिरो होता
अमिताभपेक्षाही खूप मोठा होता

सकाळी पेपरात वाचले आपला हिरो निघून गेला
खर सांगतो पोटात मोठा खड्डा पडला
कॉलेजला बंक मारून वाचलेले उद्योगपर्व आठवले
कितीतरी दिवस त्याने होते मला झपाटले

असा बी.जी. माझा आदर्श होता
सरकारने त्याला पद्मश्री म्हणून गौरविला होता

तर माझ्या (उद्योजक) मित्रांनो ही होती बी.जी.शिर्केना माझ्यातर्फे श्रद्धांजली.
कालच त्यांचे पुण्यात निधन झाले. ह्या ३ ऑगस्ट पर्यंत ते काम करीत होते. त्याचे वय फक्त ९२ वर्षे होते.
त्यांनी आयुष्यात खूप संकटाना मोठ्या धैर्याने तोंड दिले. त्याची कहाणी तुम्ही त्यांच्याच शब्दात त्यांच्या आत्मचरित्रात (उद्योगपर्व) वाचू शकता.
ते एक पुस्तक नसून एक प्रेरणास्त्रोत आहे…जो तुमच्यातील उद्योजकाला जागे करील…आधीच उद्योजक असाल तर धीर, धैर्य, संयम, साहस, चिकाटी शिकवेल. संकटांना कसे सामोरे जायचे हे शिकवेल. नुसते शिकवणार नाही तर तुमच्या हाताला धरून त्यातून बाहेरही काढेल.
त्यांच्याबद्दल खूप काही लिहण्यासारखे आहे. पण आता थांबतो…
जर कोणाला त्यांचे अल्पचरित्र जाणून घ्यायचे असेल तर इथे इथे क्लिक करा.
व आणखी खोलात उतरायचे असेल तर उद्योगपर्व निश्चित वाचा.


Share/Bookmark