Posts Tagged ‘एका परप्रांतीयाची झपाटलेली गोष्ट!’


andrew-carnegie

कोणी कितीही आणी कसेही नाकारले तरीही, भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची जी ओळख आहे त्यात भारतातील वेगवेगळया प्रांतातून येथे स्थलांतरित झालेल्या परप्रांतीयांचा मोठा वाटा आहे. पण हल्ली परप्रांतीय हा शब्दच नव्हे तर परप्रांतीय माणूससुद्धा खूपच कुप्रसिद्ध झाला आहे.व दुर्दैवाने हे चित्र फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर ऑस्ट्रेलियापासून इंग्लंड पर्यंत सर्व जगात पाहायला मिळत आहे.  असे का आहे? व हे चित्र बदलू शकते का? कसे? हा एक वेगळा व मोठा विषय आहे. आपल्याला इथे त्याबद्दल काहीही चर्चा करायची नाहीये. आपल्याला इथे फक्त एका अशा परप्रांतीयाची गोष्ट थोडक्यात माहिती करून घ्यायची आहे की तो ज्या मातृभूमीतून स्थलांतरित झाला ती तर त्याला कायमचे विसरली पण ज्या कर्मभूमीने त्याला आसरा दिला ती त्याला कधीच विसरू शकली नाही. विसरू शकणार नाही. व त्याचे पांगही कधी फेडू शकणार नाही..

आता जास्त कोड्यात घालत नाही. त्या परप्रांतीयाचे नाव आहे अ‍ॅन्ड्रू कार्नेगी आणी ती कर्मभूमी आहे अमेरिका. तीच जगातली सर्वात श्रीमंत अमेरिका जी कधीही ह्या अवलियाचे पांग carnegieफेडू शकणार नाही. इतके करून ठेवले आहे ह्याने तिच्यासाठी..अगदी मरेपर्यंत तो देतच राहिला…$350,000,000(एकही शून्य वाढवला नाहीये. शब्दात साडेतीनशे मिलियन डॉलर्स) इतकी  रक्कम त्याने दान केली. कशासाठी तर अमेरिकेत २५०० ग्रंथालये बांधण्यासाठी. त्याने पॅलेस ऑफ व्हील्स बांधले जें आता वर्ल्ड कोर्ट म्हणून ओळखले जाते. त्याने कित्येक महाविद्यालये,चर्चस बांधन्याकरिता तर कित्येकांना शिकण्यासाठी, उद्योगांकरिता  अमाप मदत केली. तो स्वत:ला स्वत: कमाविलेल्या पैशाचा/संपत्तीचा फक्त विश्वस्त समजायचा. व आपले काम हा पैसा लोकांच्या उपयोगाकरिता कसा वापरता येईल हे बघणे एवढेच आहे असे म्हणायचा.

असा हा अवलिया लहानपणी अतिशय गरीबीमुळे स्कॉटलंडवरून अमेरिकेला स्थलांतरीत झाला. अनेक छोटी मोठी कामे करता करता अमेरिकेतील एका सरकारी रेलरोडमध्ये कामाला लागला. तो काळ पहिले सिव्हील वॉर संपायला आलेले असतानाचा होता. आणी इथेच त्याच्यातील नेहमी जागृत असलेल्या उद्योजगाने संधी हेरली. त्याने भविष्यातील स्टीलची होणारी गरज ओळखून स्टील फॅ़क्टरी टाकली..व पुढील सहा महिन्यातच आपले उत्पन्न महिना ५०००० डॉलर्सच्या घरात पोचविले..आणी सुरवात झाली जगातील पहिल्या बिलीयोनेर कंपनीची..याचे संपूर्ण श्रेय जाते अ‍ॅन्ड्रू कार्नेगी या एका माणसाच्या द्रष्टेपणाला.आत्मविश्वासाला. काही करायचेच आहे तर मग छोटे का म्हणून करा काहीतरी मोठे,अवाढव्यच करा या त्याच्या विचाराला.

अ‍ॅन्ड्रू कार्नेगी हा नुसताच एक उद्योजग वा व्यापारी नव्हता तो एक अफलातून झपाटलेला अवलिया होता. जर तुम्हाला नेपोलिअन हिलचे “थिंक अ‍ॅन्ड ग्रो रिच”  हे पुस्तक माहित असेल तर तुम्हाला हे पण माहित असेल की ह्या पुस्तकाने जगातील हजारो लाखो लोकांना श्रीमंतीचा राजमार्ग दाखविला. व यामागची संपूर्ण कल्पना,प्रेरणा अ‍ॅन्ड्रू कार्नेगी या अवलियाचीच होती. त्याने इतक्या फॅ़क्टऱ्या उभ्या केल्या पण त्याला माशिनरीमध्ये थोडाही इंटरेस्ट नव्हता. त्याला आवड होती तर ती माणसांची. त्याचा सगळा इंटरेस्ट माणसांमध्ये होता…तो माणसांमध्येच रमायचा त्यांचा अभ्यास करायचा त्यांना हेरायचा व ह्या गुणामुळेच तो त्या काळातील अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. कामगारांना धंद्यात/फायद्यात मालकी द्यायला त्यानेच सुरवात केली..कित्येक चांगल्या गोष्टी अ‍ॅन्ड्रू कार्नेगीने सुरु केल्या..त्यातीलच एक म्हणजे जगाने उचलून धरलेली “लीग ऑफ नेशन्स” ही सुद्धा त्याचीच कल्पना.

असा हा झपाटलेला अवलिया १८३५ ला स्कॉटलंडला जन्मला १८४८ पासून अमेरिकेत राहिला व १९१९ ला जगातून सटकला…पण जाताना आपल्या मागे असे काही सोडून गेला की ज्याची परतफेड कधीही कोणालाही करता येणार नाही.

तर मित्रांनो असा हा परप्रांतीय अ‍ॅन्ड्रू कार्नेगी, स्वत: अमेरिकन नसलेला पण एखादा पक्का अमेरिकन अमेरिकेसाठी जे करू शकणार नाही त्याच्या कितीतरी पटीने करून निघूनही गेला. आणी अशाच अनेक लहान मोठ्या परप्रांतीय अ‍ॅन्ड्रू कार्नेगीना आसरा दिल्यामुळेच मुळची रेड इंडियन्सची असलेली अमेरिका आज जगावर राज्य करते आहे…

पण आपण ह्यातून कधी काही बोध घेणार की नाही?

अ‍ॅन्ड्रू कार्नेगी या अवलीयाबद्दल अजूनही काही जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करा.