Posts Tagged ‘पोळा’


पोळा (बेंदूर)


आपल्या कृषीप्रधान भारत देशात बैलांना फार महत्व आहे. पोळा हा बैलांचा सण आहे. श्रावण अमावास्येला पोळा साजरा केला जातो. बैल म्हणजे श्रम म्हणजेच कष्ट. अशा कष्ट करणाऱ्याची पूजा म्हणजेच जो दुसऱ्यासाठी  श्रम घेतो अशा श्रमदेवतेची पूजा करण्याचा हा दिवस होय. या दिवशी फक्त बैलांचीच नव्हे तर शेतीसाठी लागणाऱ्या नांगर, विळी, कोयता, खोर इत्यादी साधनांचीदेखील पूजा केली जाते. सजीवाबरोबर निर्जीवामध्येदेखील ईश्वर बघण्याची, त्याची पूजा करण्याची आपल्या संस्कृतीची परंपरा आगळीच म्हणावी लागेल.

‘शेतकऱ्याचा बैल आणि गरिबाची बायको आजारी पडू नये’ अशी एक ग्रामीण म्हण आहे. यावरूनच शेतकऱ्यासाठी बैल किती महत्वाचा व अनिवार्य आहे हे समजेल. बैलाचे शेतकऱ्यावरती अनंत उपकार असतात व हे तो आयुष्यभर फेडू शकत नाही म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा अत्यंत आत्मियतेने साजरा केला जातो.

पोळ्याच्या दिवशी बैलांना न्हाऊ घालतात. पंचारती ओवाळतात. पुरणपोळ्यांचा नैवद्य दाखवितात. शिंगाना हिंगूळ वं बेगड लावतात. गळ्यात सुंदर माळा वं पायात घुंगरूदेखील बांधतात. संपूर्ण शरीरावर सुंदर नक्षीकाम करतात. पाठीवर रंगीबेरंगी झुल टाकतात. एखाद्या नव्या नवरीच्यावर त्याचा शृंगार करतात. आपले हे अनोखे रूप बघून बैलदेखील उत्साहाने खुलतात. एवढे सगळे करून झाल्यावर त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढतात. आपला बैल हा प्रत्येक शेतकऱ्याचा अभिमान असतो. आपल्या सख्या भावाप्रमाणे बैलावर प्रेम केले जाते.

गावाच्या वेशीवर मारुतीचे मंदीर असते. मारुती हे बुद्धी वं चपळतेचे दैवत असल्याने हे दोन्ही गुण आपल्या बैलात यावेत, त्यांना कोणाचीही दुष्ट बाधा होवू नये म्हणून बैलांना देवळात नेण्याची प्रथा आहे.

आपल्या उपकारकर्त्याला इतक्या पूज्य भावाने, कृतज्ञतेने, उत्साहाने मिरवायची, गावात फिरवायची प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. ह्या दिवसाची बैलाबरोबर शेतकरीही आनंदाने वाट बघत असतो.

श्रमाला मोल नाही. श्रमकरी हा देवासमान असतो हाच संदेश आपल्याला पोळा या सणातून मिळतो म्हणून आपण श्रमाला कधीही कमी लेखू नये. केलेले श्रम हे कधीही वाया जात नाहीत हे सतत लक्षात ठेवावे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

मातृदिन (पिठोरी अमावस्या) रक्षाबंधन

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere