Posts Tagged ‘ब्लॉग माझा’


 

ब्लॉग माझा-३  स्पर्धेचा निकाल काल जाहीर झाला. सर्व विजेत्यांचे मनापसून अभिनंदन! विजेत्यांच्या यादीत झम्प्या झपाटलेलाचे नाव बघून आनंद झाला. अवघ्या चार महिन्यापूर्वी सुरु झालेला व उणेपुरे फक्त ३७ लेख प्रकाशित झालेल्या या ब्लॉगची दखल स्टार माझा सारख्या दर्जेदार व प्रतिष्ठित व्यासपीठाद्वारे घेतली जावी यातच फार काही आले.

स्पर्धेतील यशाबद्दल थोडेसे….

फारच कमी कालावधीत व फारसे लेख न लिहिताही  हे यश या ब्लॉगला मिळाले. कोणाला वाटेल हे यश अनपेक्षित होते किंवा फार लवकरच म्हणजे स्वत:ला सिद्ध करण्यापूर्वीच ते मिळाले. तर नाही. हे यश मला अपेक्षितच होते. किंबहुना मला विश्वास (काहीजणांसाठी फाजील) होता की कमीत कमी उत्तेजनार्थ म्हणून तरी या ब्लॉगची नोंद घेतली जाणार. एवढेच यश मी अपेक्षिले होते व ते मिळाले त्यामुळे आत्मविश्वास वाढला बरोबर जबाबदारीही. जरी लेख कमी असले तरी त्यांचा दर्जा कुठेही कमी असणार नाही याबद्दल मी सतत काळजी घेतली होती व त्या अनुषंगाने तेवढी मेहनतही तितक्याच प्रेमाने मी केली होती. काही लेख लिहिण्यासाठी तर मी अक्षरशः दिवसच्या दिवस व रात्रीही एका जागेवर बसून काढल्या. त्याच कुठेतरी आज चीज झाल्यासारख वाटलं.

माझ्या दृष्टीने हे यश माझ्या लिखाणाचे  नाही तर ते आहे ह्या ब्लॉगवर घेतल्या गेलेल्या विविध विषयांचे.  मनात आले म्हणून किंवा मनात येईल ते लिहिण्यासाठी हा ब्लॉग मी सुरु केला नाही, हा ब्लॉग एक विशिष्ट लक्ष, उद्देश,हेतू  समोर ठेऊन जाणीवपूर्वक सुरु केलेला आहे.(सध्यातरी अशारीतीचे फारच कमी ब्लॉग मराठीत आहेत) ह्यात मला माझे स्वत:चे खाजगी वा वैयक्तिक असे काहीही द्यायचे नव्हते. व मी ते दिलेले नाही. माझे खरे नावहि ब्लॉगवर द्यायचे मी जाणीवपूर्वक टाळले. त्यामुळे बऱ्याचजणांना माझ्या हेतूविषयी व अगदी माझ्याविषयीहि शंका, संशय व्यक्त करावयास जागा मिळाली. पण त्याबद्दल फारशी फिकीर मी दाखविली नाही. माझा हेतू अतिशय स्पष्ट व उपयुक्त होता. जो मी येथे दिलेलाच आहे. तरीसुद्धा आज पुन्हा एकदा एका वेगळ्या दृष्टीकोनातून मी या ब्लॉगचा व स्वत:चा (येथे पहिल्यांदाच) उहापोह करतो.

या ब्लॉगबद्दल थोडेसे…

मला लहानपणापासून थोरामोठ्यांची आत्मचरित्रे वाचायला फार आवडायचे, अजूनही आवडते…जे आपण बघितले नाही, शिकले नाही, अनुभवले नाही, उपभोगले नाही असे सर्व काही या चरित्रातून मला काही प्रमाणात शिकायला, अनुभवायला, उपभोगायला  मिळायचे. त्यामुळे मी लहानपणापासूनच स्वत:ला इतर मित्र-मैत्रिणींपेक्षा भाग्यवान समजायचो ( thanks to reading)  त्यांना माहित नाही अशा बऱ्याच गोष्टी मला माहित असायच्या, त्यांच्या बऱ्याचशा अडचणीवर माझ्याकडे काहीतरी उत्तर असायचे, ज्याने माझा आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यास फार मदत व्हायची. माझ्या या चरित्र वाचण्याच्या सवयीने माझ्यात फार चांगला बदल घडवून आणला. त्यामुळेच आपल्या ब्लॉगवर अशा प्रेरणादायी लोकांची माहिती देऊन वाचकांनाहि काही प्रमाणात आपल्यासारखाच अनुभव द्यावा या हेतूने मी झम्प्याचे उद्योग व उद्योजग हा प्रवर्ग सुरु केला.

आपल्या हिंदू संस्कृतीत सणांना फार महत्व आहे. समाजाच्या व व्यक्तीच्या मानसिक व शाररिक आरोग्याच्या दृष्टीने सण साजरे करणे हि एक अतिशय सुंदर संकल्पना आहे. सणांच्या बाबतीत इतर संस्कुतीपेक्षा हिंदू संस्कुती फार श्रीमंत आहे पण दुर्दैवाने फारच कमीजणांना सणांचे मुख्य उद्देश वा हेतू माहित आहेत व ते माहित करून घेण्याच्या फंदातही पडताना फारसे कोणी दिसत नाही…नेहमीसारखे आंधळेपणाने वा यांत्रिकपणे सण साजरे केले जातात. कमीत कमी या ब्लॉगच्या वाचकांनातरी त्याबद्दलची माहिती व्हावी म्हणून आपले सण समजून घ्या हा प्रवर्ग सुरु करण्यात आला.

हल्ली बरेच मराठी नेटीजन ब्लॉगींग करतात व जे करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आपला ब्लॉग असावा अशी सुप्त इच्छा असते असे गृहीत धरून ब्लॉग आणी ब्लॉगर्स हा प्रवर्ग सुरु करण्यात आला. यात ब्लॉग व त्यासंदर्भातील माहिती देण्याचा माझ्यापरीने मी प्रयत्न करतो. इतरही काही प्रवर्ग आहेत जसे इंटरनेटझम्प्या झपाटलेलाफोटोशॉप सर्वांसाठीशिकलेच पाहिजे असे काही!,संगणक असे वेगवेगळे विषय व त्याबद्दल मला असलेली थोडीफार माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो.

हा ब्लॉग सुरु करण्याआधी मी  ऑर्कुट, मिसळपाव वा तत्सम कोणत्याही कम्युनिटीवर सक्रीय नव्हतो व आताही नाहीये. त्यामुळे मी येथे एकदमच नवखा होतो  पण यामुळे कधी बुजल्यासारखे  झाले नाही. या मराठी ब्लॉगविश्वाने मला काही नविन मित्र दिले. अनुभव दिले.  फक्त आपल्या ब्लॉगच्या जोरावर आपण आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो असा नुसता विश्वासच नाही तर प्रत्यक्ष अनुभवही दिला.  मलाच स्वत:ची एक नवीन ओळख झाली. हे माझ्यासाठी एक प्रकारचे फार मोठे यश होते.

माझ्याबद्दल थोडेसे

ब्लॉगींगच्या  सुरवातीच्या काळात (म्हणजे चक्क फक्त तीन/चार महिन्यापूर्वी)आपण एका वेगळ्याच अदभूत जगात वावरतो आहोत असे नेहमी वाटायचे, आपल्यासाख्या अनेकांपर्यंत पोहचायचे हे एक सर्वोत्तम माध्यम आहे यांची जाणीव होत होती. (फेसबुकपेक्षाही जास्त पोटेन्शियल आपल्या स्वत:च्या ब्लॉगमध्ये आहे हे मी येथेच अनुभवले.) पण हळूहळू माझी कन्सिस्टंन्सी कमी होत गेली.  ऑगस्ट २०१० मध्ये २२ लेख लिहिणारा मी गेल्या ३ महिन्यात फक्त १२च  लेख लिहू शकलो. तेंव्हा जाणवले ब्लॉग हे एक शिवधनुष्य आहे ते सतत पेलून धरणे वाटते तितके सोपे नाही.  तेंव्हा इतर नियमित ब्लॉग लिहिणाऱ्या ब्लॉगर्सबद्दल आदर व स्वत:बद्दल राग आपोआप वाढू लागला. कन्सिस्टंन्सी हा माझा नेहमीच मोठा वीकपोईंट ठरला आहे. किंबहुना इतर सर्व गुण उढळून टाकण्याचे सामर्थ्य माझ्या या वीक पोईंट मध्ये आहे.  या एका गोष्टीमुळे मी आयुष्यात खूप काही हरवून बसलो. अनुभवाने श्रीमंत झालो पण इतर अनेक बाबतीत गरीबच राहिलो. नेहमी वा सतत काहीतरी नवीन करीत वा शोधत राहण्याच्या या वृत्तीने मी अनेक क्षेत्रात पाउल टाकले, यश मिळविले बरोबरीने अपयशहि  पचविले व त्याचत्याचपणाला कंटाळून ते क्षेत्र सोडून पुन्हा नाविन्याची कास धरली.  यामुळे मी एक चांगला प्रोग्रामर होतो पण नोकरीचा पिंड नसल्याने चांगली नोकरी (इतरांच्या दृष्टीनें)सोडून  पेप्सीचा सांताक्रुझ एरियाचा डीस्ट्रीब्यूटर झालो…पण थोड्याच दिवसात लक्षात आले आपण एक आंतरराष्ट्रीय कंपनीचे हमाल झालो आहोत..त्यामुळे तिथेही लाथ मारून (इतर=मूर्खपणा) एकदम प्रकाशक झालो. (हि एक यशस्वी शोकांतिका आहे…याबद्दल खूप काही लिहू शकतो पण आत्ता व इथे नाही) आता हे हि व्यवस्थीत चालू असताना  नवीनच खूळ डोक्यात शिरल्याने सध्या त्यामध्ये झपाटल्यासारखा घुसलो आहे…त्यामुळेच इकडे थोडे दुर्लक्ष झाले..मध्येच सणाच्या निमित्ताने ब्लॉगवर येतो पण आता पुन्हा एकदा नियमितपणे लिहायचा विचार आहे.

अनुभवलेल्या अनेक क्षेत्रांपैकी तीनच क्षेत्रांचा उल्लेख मी येथे केलेला आहे.  टाईप करण्याचा वा स्वत:चा उदोउदो करण्याचा फारसा अट्टाहास वा आवड नसल्याने इतर अनेक रंजक अनुभव  व माहिती मी येथे देत नाहिये  तसाही ह्या ब्लॉगचा व माझा त्यात इंटरेस्ट नाही. जर कधी आपली प्रत्यक्ष भेट झाली तर मात्र मी यावर निवांत गप्पा मारू शकेन पण लिखाणाद्वारे वा या ब्लॉगद्वारे सध्यातरी नाही…असो असे अनेक नाना प्रकारचे (कमीत कमी दहा ) उद्योग करून आता पुन्हा मी एका नवीन उद्योगात पाय रोवत आहे. या वेगवेगळया उद्योगांच्या साहसांमुळे मला नेहमी नवीन माणसे (यशस्वी व अयशस्वी दोन्ही) भेटत गेली. ज्यांनी मला खूप काही दिले, शिकविले. व नवनवीन अचाट (माझ्यासाठी) साहसे करण्यास प्रेरित केले.

अजूनपर्यंत  मी माझे खरे नाव या ब्लॉगवर जाहीर केले नव्हते, तसे अनेकजणांना ते माहित आहे पण ज्यांना माहित नाही त्यांसाठी… माझे संपूर्ण नाव रणजीत शांताराम फरांदे आहे. मी रहावयास प्रभादेवी, मुंबई येथे आहे. संपर्कासाठी ranjite@hotmail.com व zampya.com@gmail.com हे माझे ईमेल्स आहेत. फेसबुकवर मी http://www.facebook.com/ranjite ह्या लिंकने उपलब्ध होतो तर http://www.facebook.com/likeitishareit हे माझे फेसबुक पेज आहे. व http://ilikeitishareit.blogspot.com/ हा माझा दुसरा इंग्रजी ब्लॉग आहे. सध्या तरी माझ्याबद्दलची इतकी माहिती पुरे.

मराठी ब्लॉग, ब्लॉगर्स व  ब्लॉग माझा या  स्पर्धेविषयी माझी प्रामाणिक व परखड मते…… या ब्लॉगवरील पुढील लेखात लवकरच मांडणार आहे…तोपर्यंत स्टे ट्यून….

Advertisements