Posts Tagged ‘मराठी’


थेऊर आणी हिंदू या दोन विषयांनी छोट्याशा मराठी ब्लॉगविश्वावाचे गेले आठ दहा दिवस गाजविले..ह्या दोन लेखांवर प्रतिक्रियांचा नुसता धो धो पाऊस पडला व अजूनही पडतोच आहे.(यात काही काळ मीही आघाडीवर होतो.)

हे दोन्ही विषय माझ्यासाठी खरे तर नको असलेलेच विषय होते..तरी सुद्धा माझी हीच मते व्यक्त करण्यासाठी म्हणून तिथे गेलो आणी गुरफटलो..खास करून हिंदूमध्ये. कोणी एक सौरभ नावाचा तोतया तिथे (हिंदूमध्ये)माझ्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया द्यायला लागला व तेही एक पातळी सोडून मग मीही चवताळलो व सुरु झाला एक (शुद्र) राडा….असो हे सगळ होणारच, चालणारच….ते फारसे महत्वाचे नाही..

महत्वाचे जें जें वाटले तेच इथे आता तुमच्याबरोबर शेअर करतो….

मला माझ्या या अगदी छोट्याश्या (उणेपुरे १५ दिवस) मराठी ब्लॉग जीवनात   काही गोष्टी जाणवल्या, काही भावल्या, काही पटल्या, तर काही नाही आवडल्या…अशाच सर्व भावनांची, विचारांची  मिळून माझ्या डोक्यात एक मिसळ गेले दोन दिवस तयार होत होती..तिचेच विश्लेषण मी येथे तुमच्यासमोर मांडतो.

सर्वप्रथम एका सनातन सत्याचा मला येथे येऊन पुन्हा साक्षात्कार झाला..तो म्हणजे प्रत्येक माणूस वेगळा आहे..त्यामुळे त्याचा ब्लॉगही वेगळाच, त्याची मतेही वेगळीच्..काहींची तर जगावेगळी…असो..पण एक गोष्ट या छोट्याशा प्रवासात प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इथे आपल्याला एखाद्या गोष्टीतले माहीत असो वा नसो, त्या गोष्टीशी आपला संबध असो वा नसो आपण सार्वजनिक ठिकाणी मत मांडत आहोत हे ही लक्षात न घेता त्या गोष्टीवर अगदी ठामपणे मते मांडली जातात….व त्यावर प्रतिक्रियाही अगदी तितक्याच किंवा त्याहीपेक्षा ठामपणे दिल्या जातात. चला हा अमुकअमुक एक बोलतोय न मग ते बरोबरच असणार मग ते काय वाटेल ते लिहिलेले असले तरी चालेल. त्याने कितीही समज गैरसमज पसरले तरी चालतील. आपल्याला बोलायचा, मते मांडायचा हक्क आहे म्हणून आपण बोलायचे बास..एवढे एकच माहित…पण आपल्या हक्काबरोबर आपल्यावर जबाबदारीपण येते हेच बरेचजण सोयीस्कररित्या विसरतात व काहीही बरळायला लागतात.

मते मांडायला, एकमेकांशी भांडायला काहीच हरकत नाही उलट चांगलेच असे मी म्हणेन त्यातून एक जागरुकता निर्माण होते. आजुबाजुला काय चालले आहे याचे भानही येते.व विचारांची देवानघेवानही होते. नवीन दृष्टीकोन समजतात, जुने पुसले जातात. ठरविले तर खूप चांगल्या प्रकारे प्रबोधनही करता येते. काहीजण आपापल्या परीने तसा प्रयत्नही करताहेत..थोडा वेळची करमणूक यापेक्षाही इथे काहीतरी आपल्या कामाचे मिळेल  अशा अपेक्षेनेही बरेच लोक मुशाफिरी करत इथे फिरत असतात. काहीना ते मिळतेही तर काहींना नाही. पण येथे एक गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळू शकते ती म्हणजे मित्र (जिवलग मित्र असे मी म्हणत नाही) मला ह्या अगदी थोड्याश्या कालावधीतही काही चांगली,समजूतदार  माणसेही भेटली (मित्र म्हणायला अजून थोडा वेळ लागेल..पण होतील हळूहळू..)थोडीशी समजली..काहीमध्ये तर माझ्यात बदल घडवून आणण्याचीही क्षमता वाटली..जी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तसेच काही अगदीच मठ्ठ काही अगदीच निगरगट्टही भेटले पण ते कुठे नाही भेटत? कधी त्यांनी मनोरंजनही केले तर कधी त्यांचा त्रासही झाला. पण एकंदरीत खूप मजा आली व येतेय..मी हे ब्लॉग विश्व खूप आनंदाने एन्जॉय करत आहे…मला येथून खूप काही मिळत आहे जें मी वेळोवेळी परतफेड करण्याचा प्रयत्नही करेन.

काही जणांना वाटेल किंवा वाटत असेल की मी इथे नवीन असल्याने हे नव्याचे नऊ दिवस आहेत…असतील.. सध्या मला त्याचा विचार नाही करायचा. मी काही ठराविक ब्लॉगवर प्रतिक्रिया देतो.. अगदी दिल खोलके देतो..तो माझा स्वभावाच आहे..कंजूषपणे दोन शब्दात वा एका वाक्यात स्वत:ला व्यक्त करणे मला जमत नाही. द्यायचीच आहे जर प्रतिक्रिया तर विचारपूर्वक व मनापासून द्यावी. म्हणजे त्या प्रतीक्रीयेचेही चीज होते. नाहीतर काय उपयोग त्याचा त्या ब्लॉगरला व काय अर्थ त्या प्रतिक्रियेला? इथे मी इतक्या मोकळेपणाने प्रतिक्रिया दिल्या म्हणून काहीनी माझ्या मोकळ्या वेळेवरच बोट ठेवले. मी देशाचे नेतृत्व करावे इथपर्यंतही सुनाविले..असो ते सगळे मी खूप पॉझीटीव्हली घेतले…निदान माझी दखल तर घेतली जात आहे असे समजून दुर्लक्षही केले.

काहींना असाही संशय आहे की मी हे सगळे माझ्या ब्लॉग्सच्या हिट्स वाढाव्यात म्हणून करतो आहे तर त्यांचा संशय मी येथे दूर करतो. तुम्ही संशय घ्यायची गरज नाहीये इन फॅक्ट खात्रीच बाळगा माझ्या बऱ्याच बेसिक हेतूपैकी हाही एक हेतू आहे. व काय चुकीचा आहे?..मी काही अयोग्य तर करीत नाहीएना? इतरांच्या ब्लॉगवर माझी प्रामाणिक मतेच मांडतोय न…तेही अजिबात चाटेगिरी,चमचेगिरी न करता? त्याने त्या ब्लॉगरचाही फायदाच होत आहे. ह्या चर्चेसआठी कितीतरीजण फिरून फिरून ब्लॉग्वर परत येतात जर कोणी नाहीच दिल्या प्रतिक्रिया तर कोन येणार परत लेख वाचल्यानंतर? किंवा अगदीच गुळ्मुळित मिळमिळित प्रतिक्रियांसाठी का तुम्ही जाल परत तिथे?नाही ना…? असो माझा मुद्दा पटला नसला तरी हरकत नाही, कळला असेल तरी मिळवली…

इथे अजून एक गोष्ट मला नमूद करविशी वाट्ते ती म्हणजे ब्लॉग हे जरी स्वत:ला व्यक्त करायचे एक खाजगी माध्यम असले तरी त्याचे परिणाम सार्वजनिक असतात…इथे उघडपणे लिहिणारा कोणीही आपल्या सामाजिक जबाबदारीपासून आपले अंग झटकू शकत नाही. म्हणूनच त्याने पोस्ट्स लिहिताना ह्या गोष्टीचे भान राखले पाहिजे असे मला तरी वाटते..कोणाला हा आगाउपणाचा सल्ला वाटेल कदाचीत..पण माझ्या मते व अनुभवाने जर ते तुम्ही राखले नाही तर एक न एक दिवस त्या ब्लॉगरला त्याची किमत चुकवावी लागेल…कित्येक लेखकांना याचा प्रत्यक्ष जीवनात आलेला अनुभव आपण पाहिलाच असेल.

आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने खटकली ती म्हणजे बऱ्याच चांगल्या ब्लॉगवर बरेच चांगले लिखाण असताना तिथे कोणीही प्रतिक्रिया देत नाही..ठराविक लोकप्रिय ब्लॉग्सवर प्रतिक्रिया दिल्या जातात..(ज्या दिल्या जाव्यातच) याची कारणे अनंत असतील…इतका वेळ आहे कोणाकडे? पासून ते असे काही ब्लॉग्स आहेत हे ही माहीत नसन्यापर्यंत….अनेक…..पण मला असे वाटते की यावर आपल्यासारख्या प्रत्येकाने काहीतरी केले पाहिजे म्हणजे जेणेकरून इतरांना काही चांगले वाचावयास मिळेल व त्या ब्लॉगरलाही थोडा हुरूप येईल. आजच मला आलेल्या एक प्रतीक्रियेतून… चेतन गुगळे यांच्या ब्लॉगला भेट द्यायचा योग आला जास्त काही लिहीत नाही त्याबद्दल फक्त इतकेच सांगतो की विचारपूर्वक व विधायक हेतूने केलेल्या लेखनाला खुद्द महाराष्ट्र शासनाकडूनही कशी दखल घेतली जाते याचे ह्याइतके उत्तम उदाहरण मी तरी अजून पहिले नाही.

खूप लिहिण्यासारखे आहे अजून पण सध्या आवरते घेतो..तुमच्या मौल्यवान वेळेचाही प्रश्न आहे. शेवटी एकच सांगावेशे वाटते की ह्या मराठी ब्लॉग विश्वाला सध्या कशाची गरज मला जाणवली तर ती म्हणजे  एकमेकांच्या सहकार्याची, प्रोत्साहनाची, विधायक टीका टिप्पणीची आणी जबाबदारीची.

आशा करतो माझा मुद्दा व हेतू मी तुमच्यापर्यंत काही प्रमाणात का होईना पोहचवू शकलो असेन.

विशेष नोंद:  ही पोस्ट मी जरी मुख्यत: थेऊर व हिंदू हे दोन लेख व त्यावरील प्रतिक्रिया यांना समोर ठेऊन लिहिलेली असली तरी हे लेख व त्यांच्या प्रतिक्रियांचे लेखक यांच्याबद्दल माझ्या मनात पूर्णपणे आदराचीच भावना आहे. मला जे काही पटले नाही ते मी माझ्यापरीने मांडले. पर्सनली मी कोणालाही दुखाऊ इच्छित नाही. असे जर माझ्याकडून झाले असेल वा होत असेल तर जाहीररीत्या मी त्यांची माफी मागायला तयार आहे…(फक्त त्यांनी तसे माझ्या निदर्शनास आणून द्यावे.)