Posts Tagged ‘श्रीकृष्ण कालीयामर्दन’


खरे तर आज मी एका वेगळ्याच विषयावर लिहिणार होतो. लिहितही होतो. विषय होता आचार्य अत्रे. काल त्यांची जयंती होती…कितवी वगैरे त्याला मी फारसे महत्व देत नाही…त्याबद्दलच मी लिहीत होतो आणी इतक्यात अनिकेत समुद्रने लिहिलेली आजची पोस्ट माझ्या मेलमध्ये धडकली. त्याने निवडलेला विषय होता नागपंचमी. मला लेख आवडला. छान माहिती दिलेली आहे. पण बऱ्याचशा आणखी गोष्टी त्यात मांडल्या तर आपल्या ब्लॉग मित्रांना त्याचा छानसा उपयोगही होईल व एक प्रकारचे मार्गदर्शनही होईल असे मला वाटले. त्या लेखाखाली मी एक प्रतिक्रियाही दिली त्यासंदर्भात. पण ती खूप थोडक्यात होती..म्हणून म्हटले विषय चांगला व खूप उपयोगी आहे व यावर मी आधी एके ठिकाणी लिहिलेलेही आहे. तेच आता इथे तुमच्यासोबत शेअर करतो.

हा आणखीही एक कल्पना अनिकेतमुळे माझ्या डोक्यात आली ती म्हणजे आपणही आपल्या सणांची माहिती आपल्या परीने वाचकापर्यंत पोहचवावी…त्यासाठी मी एक नवीन categoryच  add करतो  “आपले सण समजून घ्या” या नावाने.  व येणाऱ्या सणांविषयी जी काही माहिते मिळेत ती येथे देण्याचा प्रयत्न करतो.

नागपंचमी

श्रावण महिना म्हणजे “आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” श्रावण म्हणजे सणांचा, उत्सवांचा, उत्साहाचा, आनंदाचा आणी चैतन्याचा महिना. निसर्गासारखा सर्वोत्तम पाहुणादेखील आपले सर्व हिरवेगार दागिने परिधान करून नटूनथटून सणांमध्ये सहभागी होतो. ह्या महिन्यात जे जे जिवंत आहे. चैतन्य आहे ते ते आनंदाने न्हाऊन निघते.

अशा या पवित्र महिन्याची सुरवात शुद्धपंचमीला नागपंचमी या सणाने होते. आपल्या भारतीय संस्कृतीत कृतज्ञतेला, सहिष्णुतेला प्रचंड महत्व आहे म्हणूनच श्रावण महिन्यात निसर्ग नटलेला असल्याने व सगळे जीव जंतू आनंदात असल्याने संपूर्णपणे शाकाहारी राहण्याची परंपरा आहे. कोणीही हिंसा करू नये. खाण्यापिण्यासाठीच नव्हे तर भीतीपोटी देखील आपण हिंसा करू नये. आपल्यापेक्षाही जे कमजोर आहेत अशांप्रती प्रेमाची भावना आपल्या मनात यावी म्हणून ह्या महिन्याची सुरवात चक्क नागाच्या पूजेने केली जाते.

सर्प म्हटले की आपल्याला भीती वाटते व आपण त्याला मारायला धावतो पण आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्या संस्कृतीचे एक परमेश्वर श्री शंकर यांनी सापाला चक्क गळ्यात बांधले आहे तर दुसरे श्री विष्णू यांनी शेषावरच शयन केले आहे. ह्यावरून हेच सिद्ध होते की साप हा मानवाचा मित्रच आहे.

आपला भारतदेश हा कृषीप्रधान देश आहे. उंदीर घुशीसारखे प्राणी पिकांची नासधूस सतत करीत असतात. त्यांचा नाश करून साप आपल्या शेतातील पिकाला हिरवेगार ठेवतो हे मानवावर सापाचे अनंत उपकारच नव्हे का? म्हणूनच सर्पाला क्षेत्रपाल असेदेखील म्हणतात.

नागपंचमीच्या दिवशी काही चिरू,कापू  नये, चुलीवर तवा ठेवू नये. तळू नये. उकडीमोदकासारखे पदार्थ करावेत असा रिवाज आहे. यादिवशी घरातील सर्वांनी पहाटे उठून सुगंधी तेल लावून स्नान करावे. नंतर गंध, हळद कुंकू वगैरेंनी पाच फण्याच्या नागाचे चित्र पाटावर काढावे व त्याची पूजा करावी. त्याला दूध दाखवावे.(स्त्रियांना या दिवशी आराम मिळावा, सणाचा आनंद लुटता यावा म्हणूनच योजनाबद्धरित्या याची आखणी केलेली आहे.)

हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या सणाबद्दल वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया आख्ययिका आहेत. त्यातील श्रीकृष्ण कालीयामर्दनाची गोष्ट सर्वात जास्त लोकप्रिय आहे.

पण मुख्यत्वे हा सण स्त्रियांचा आहे. या दिवशी खेड्यापाड्यातील मुली, स्त्रिया गावाबाहेरील नागांच्या देवळात वा वारुळात जाउन पूजा करतात. नंतर पिंगा, फुगड्या, झिम्मा इत्यादी खेळ खेळतात, हसतात, बागडतात. शहरातील स्त्रियांना या आनंदाचा लाभ मिळत नाही.आपले शहरातील जीवन हे एक प्रकारचे मोनोटोनस म्हणजेच यांत्रिकी पद्धतीने चालू रहाते.प्रत्येक दिवस अगदी साचेबध्तेनुसार व्यतीत केला जातो. व सण साजरे करतानादेखील मूळ हेतूपेक्षा औपचारिकतेलाच जास्त महत्व येते. सणांचा मुख्य उद्देश आपले रोजचे कंटाळवाणे जगणे विसरून  त्यादिवशी आनंदाने उत्साहाने बागडावे, निसर्गाच्या सानिध्यात जावे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. याउलट शहरात फक्त औपचारीकता म्हणून सण पाळले जातात. उदाहरणार्थ ‘नागोबाला दूध’ ओरडत टोपलीत नाग घेऊन गारुडी घरोघरी येतात आपण त्याला दूध पाजतो व सण तेथेच संपतो. अशा प्रकारे आपण आपले मन संकुचित केले आहे.(हल्ली सापाला असे फिरविण्यावर कायद्याने बंदी आहे.)

म्हणूनच आपण आपल्या भारतीय संस्कृतीतील सणांचे मुख्य उद्देश लक्षात घेऊनच सण साजरे केले पाहिजेत. व समाजाशी, निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे. आपल्याला दंश करणाऱ्या सर्पाची देखील आदराने पूजा करण्याएवढी माणूसकी बाळगणे हाच खरा नागपंचमीचा उद्देश आहे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

नारळीपौर्णिमा रक्षाबंधन

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere