Posts Tagged ‘Shiva’


खरतर कालच हा लेख पोस्ट करायचा होता पण काही कारणांमुळे राहिला. तरी आज पोस्ट करत आहे.

मातृदिन (पिठोरी अमावस्या)


ज्या संस्कृतीत गुरुची पूजा होते. प्राण्यांची पूजा होते इतकेच काय पण निर्जीव वस्तूंचीदेखील पूजा होते ती संस्कृती मातेला कशी विसरेल. अशा या मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या होय.

श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा जीला अपत्यसुख लाभत नाही, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात. हे व्रत पूजाप्रधान असून चौसष्ठ योगिनी या  त्याच्या देवता आहेत.

श्रावण अमावास्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्रमंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना करावी, त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्तीदेवतेच्या मूर्ती स्थापाव्यात. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ सुपाऱ्या मांडून योगिनींचे आवाहन करावे. या  चौसष्ठ योगिनी म्हणजे उपजीवेकेसाठी उपयुक्त चौसष्ठ कलाच आहेत. त्याचीच ही प्रतिके आहेत. त्यांचीच पूजा करावी. व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात.

अशी ही स्त्रीला पुत्रवती बनविणारी अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. श्रावण वद्य अमावास्येलाच  ‘दर्भग्रहणी अमावस्या’ म्हणतात.

आपल्या संस्कृतीत मातेला फार महत्व आहे, तिचा मोठा गौरव केला आहे. आई ही केवळ मुलांचीच नव्हे तर त्यांच्या संस्कारांचीही जननी आहे. आई ह्या दोन अक्षरी छोटयाशा शब्दात विश्वाला गवसणी घालण्याचे अतूट सामर्थ्य आहे. वात्सल्य वं त्यागाची मूर्ती म्हणजे आई होय. अशी ही आई एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही. म्हणूनच तिला ‘माऊली’ असे आदराने म्हणले जाते.

समाजात स्त्रियांचे महत्व समजण्यासाठी घरोघरी भाऊबीज, रक्षाबंधनाप्रमाणे  मातृदिन साजरा झाला पाहिजे. जी माता आपल्या मायेने, त्यागाने, ममत्वाने मुलांची, घरादाराची सेवा करते तिच्याविषयी योग्य ती जाणीव समाजाला होऊन तिच्याप्रती आदर व्यक्त झालाच पाहिजे.

जर आपण नागपंचमी थाटात साजरी करू शकतो तर आपल्याला जन्म देणाऱ्या जननीच्या त्यागाचा, सेवेचा, समर्पणाचा, ओदार्याचा मातृदिन उत्साहात साजरा करून तिच्या चरणी कोटी कोटी प्रणाम अर्पूया हाच मातृदिनाचा खरा संदेश आहे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

नागपंचमी पोळा (बेंदूर)

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere


मंगळागौर

श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रीयांचा सण. सौभाग्यवती स्त्रीयांना आपल्या भावना, संवेदना,आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर.

मंगळागौर ही एक सौभाग्यदेवता आहे. आपल्या पतीच्या रक्षणासाठी, भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्वाचे मानले जातात. या वारी पूजा केली म्हणजे जन्माचे सार्थक झाले असा समज आहे. ह्या पूजेसाठी लग्न होऊन पाचपेक्षा अधिक वर्षे झाली नाहीत अशाच सौभाग्यवतीना बोलावण्यात येते. यांना वपोरी-वसोळी म्हणतात. मंगळागौरीच्या व्रतात शंकर, गणपती व गौरीची पूजा करतात.

इस बाई इस दोडका किस,
दोडक्याची फोड लागते गोड.
आणिक तोड बाई आणिक तोड

मंगळागौर जागवताना अशा प्रकारची गाणी म्हणतात.खेळीमेळीच्या वातावरणात म्हणलेली ही गाणी  दु:ख विसरायला लावतात. म्हणतात ना, दु:ख वाटलं तर कमी होतं आणि सुख वाटलं तर ते वाढतं. पूजा करताना वाहिलेली जाई, जुई, शेवंती, मोगरा, नागचाफा, गुलाब, जास्वंद ह्या फुलांमुळे मन प्रसन्न होते. आघाडा, तुळस, कण्हेर, रूई, डाळिंब, अशोक यामुळे निसर्गाशी जवळीक साधली जाते.

पूर्वीच्या काळी फार कमी वयात लग्न होत असत त्यामुळे या कमी वयाच्या मुलींना अशा व्रताच्या निमित्ताने एकत्र  बोलावून त्यांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा हेतू असे.व त्याचबरोबर आपल्या पतीबद्दल, कुटुंबाबद्दल पूज्यभाव जागृत व्हावेत हादेखील उद्देश असे यासाठी रात्रभर जागरण ठेऊन दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून जेवून मुली आपल्या घरी जात असत अशा प्रकारे कौटुंबिक रहाटगाडग्यातून एक दिवस रजा मिळत असे व उत्साहही वाढत असे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

नागपंचमी नारळीपौर्णिमा

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere