मन म्हणजे गोंगाट, मन म्हणजे वैताग, मन म्हणजे त्रास….
मनाचे पुरवावे चोचले जितके तितका त्याचा वाढे माज…

असावे एक बटण जे करील मनास पॉज
मिळेल शांती निदान काही तास

यांच कारणे वाचला रामदास..आवडला खास
मन करा रे प्रसन्न…सर्व सिद्धीचे कारण
झालो रामदास फ्यान, केला प्लान
मनाची आता जिरवायची छान

झगडलो, धडपडलो, तडफडलो, राब राब राबलो
मन कधी मारायचे नाय हाही मंत्र प्राणपणाने जपलो

पण मनाचा आपला उरफाटाच न्याय
ठरविलेलेच साल्याने असा तसा मला सोडायचा नाय

रोज रोज साल्याची एक नवीनच ऑफर
जणू काही तो मालक तर मी नोकर
काय करावे काही कळेना
मनाचा माज जराही उतरेना?

वाचला बुद्ध केले ध्यान
महावीराचे ऐकून घातले उपवास
कृष्णमूर्तींचाही लावला क्लास
पण मनासमोर मात्र सदाच नापास

मनालाही आमचे उद्योग कळले
तेही मनातल्या मनात चांगलेच चरकले
टरकलेल्या मनाने टाकला डाव
म्हणाले मजला
आपल्या दोघांच्या भांडणात कशाला तिसऱ्याचे नुकसान
तिसरा? अबे ये तिसरा कौन?
बावरलो, बावचळलो, गोंधळलो
मनाने टाकला भन्नाट गुगली
तिसरा म्हणून शरीराचा केला शिखंडी

तुझ्या माझ्या भांडणात
शरीराची लागते फुकटची वाट
तुझे ध्यान,  तुझेच उपवास
शरीराला का फुकाचा त्रास?

मनाचे म्हणणे मला होते पटले
तरी मोठ्या हिमतीने त्याला सुनावले
मी आणि शरीर एकच आहोत
तुझ्याविरुद्ध लढण्यास समर्थ आहोत

खदाखदा मन हसले
शरीर आणि तू एकच आहेस?
मग मी काय अनौरस आहे?
वेड्या मीही तुझाच एक भाग आहे
माझ्याशिवाय तुझे अतित्वच शून्य आहे
आणि याचाच तर मजला माज आहे
माझ्यापासून सुटका अशक्य आहे
मरणही माझ्यापुढे व्यर्थ आहे
वेड्या सांगतो एक गुपित माझे
माझ्याशी लढल्याने मीच वाढे
सह वा विरुद्ध मी अजिंक्य आहे
शरणागती हा एकच तुला उपाय आहे

(इथून पुढे मी दोन एन्ड केले आहेत ज्याला जो पटेल त्याने तो गोड मानावा.)

मनाच्या शब्दांनी मी चेकाळलो
शरणागतीच्या ऑफरणे चांगलाच पिसाळलो

मी मनासाठी की मन माझ्यासाठी?
शरीर माझ्यासाठी की मी शरीरासाठी?

सेवकच झालेत मालक आज
माझीच मजला वाटली लाज

अनुभवाने आता समजले होते
मनाशी लढण्यात भयंकर तोटे
मनाला हरविणे अवघड मोठे

शेवटी एकच गोष्ट हातात होती
मनाचे चाळे नुसतेच पहाणे
खेळ त्याचे चालूच ठेवणे
आपण आपले नुसते बघणे

अवघड मोठी ही परीक्षा होती
पण मनास वेसन घालत होती

नुसते पहाता मन बावचळे
पुढचे काही त्यास न कळे
उगाच रेटी स्वत:स् बळेबळे
आणि

क्षणात होई शांत सगळे

बास एवढेच साधे सूत्र होते
नाही लढणे नको ते झगडणे
मनाकडे नुसते लक्ष ठेवणे
लक्ष ठेवता मन पळे
शांतीचा अनुभव आपोआप मिळे

तर मित्रांनो ही होती ‘मन विरुद्ध मी….सुखांतिका’ आता ‘मन विरुद्ध मी….शोकांतिका’   वाचण्यासाठी येथे क्लिक करा


मन म्हणजे गोंगाट, मन म्हणजे वैताग, मन म्हणजे त्रास….
मनाचे पुरवावे चोचले जितके तितका त्याचा वाढे माज…

असावे एक बटण जे करील मनास पॉज
मिळेल शांती निदान काही तास

यांच कारणे वाचला रामदास..आवडला खास
मन करा रे प्रसन्न…सर्व सिद्धीचे कारण
झालो रामदास फ्यान, केला प्लान
मनाची आता जिरवायची छान

झगडलो, धडपडलो, तडफडलो, राब राब राबलो
मन कधी मारायचे नाय हाही मंत्र प्राणपणाने जपलो

पण मनाचा आपला उरफाटाच न्याय
ठरविलेलेच साल्याने असा तसा मला सोडायचा नाय

रोज रोज साल्याची एक नवीनच ऑफर
जणू काही तो मालक तर मी नोकर
काय करावे काही कळेना
मनाचा माज जराही उतरेना?

वाचला बुद्ध केले ध्यान
महावीराचे ऐकून घातले उपवास
कृष्णमूर्तींचाही लावला क्लास
पण मनासमोर मात्र सदाच नापास

मनालाही आमचे उद्योग कळले
तेही मनातल्या मनात चांगलेच चरकले
टरकलेल्या मनाने टाकला डाव
म्हणाले मजला
आपल्या दोघांच्या भांडणात कशाला तिसऱ्याचे नुकसान
तिसरा? अबे ये तिसरा कौन?
बावरलो, बावचळलो, गोंधळलो
मनाने टाकला भन्नाट गुगली
तिसरा म्हणून शरीराचा केला शिखंडी

तुझ्या माझ्या भांडणात
शरीराची लागते फुकटची वाट
तुझे ध्यान,  तुझेच उपवास
शरीराला का फुकाचा त्रास?

मनाचे म्हणणे मला होते पटले
तरी मोठ्या हिमतीने त्याला सुनावले
मी आणि शरीर एकच आहोत
तुझ्याविरुद्ध लढण्यास समर्थ आहोत

खदाखदा मन हसले
शरीर आणि तू एकच आहेस?
मग मी काय अनौरस आहे?
वेड्या मीही तुझाच एक भाग आहे
माझ्याशिवाय तुझे अतित्वच शून्य आहे
आणि याचाच तर मजला माज आहे
माझ्यापासून सुटका अशक्य आहे
मरणही माझ्यापुढे व्यर्थ आहे
वेड्या सांगतो एक गुपित माझे
माझ्याशी लढल्याने मीच वाढे
सह वा विरुद्ध मी अजिंक्य आहे
शरणागती हा एकच तुला उपाय आहे

(इथून पुढे मी दोन एन्ड केले आहेत ज्याला जो पटेल त्याने तो गोड मानावा.)

मनाच्या शब्दांनी मी पार ढेपाळलो
शरणागतीस सपशेल तयार झालो
तू म्हणतोस ते बरोबर आहे
तू, मी आणि शरीर एकच आहे

भोगवस्तूनी हे जग भरलेले
दिवस आपल्याकडे थोडेच उरलेले
मिळेल ते ते भोगत जावे
स्वत:स तृप्त करीत रहावे

तेंव्हापासून पुन्हा पळतो आहे
मनाचे लाड पुरवितो आहे

कारण

जरी मन वैताग, गोंगाट, त्रास आहे
तरी मनापुढे मात्र मी अजूनही हतबलच आहे

तर मित्रांनो ही होती ‘मन विरुद्ध मी….शोकांतिका’ आता ‘मन विरुद्ध मी….सुखांतिका’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


नमस्कार मित्रांनो मागील लेखात म्हटल्याप्रमाणे येथे मी मराठी ब्लॉग, ब्लॉगर्स व  ब्लॉग माझा या  स्पर्धेविषयी माझे काही विचार मांडत आहे. काही आपल्याला पटतील तर काही नाही. पण विचारांपेक्षा वा शब्दांपेक्षाही माझा हेतू तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करतो.

स्पर्धा व परीक्षकांबद्दल

स्टार माझाच्या ब्लॉग माझा या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष. म्हणजेच या वर्षी स्टार माझाच्या परीक्षकांना, मुख्यत्वे अच्युत गोडबोलेंना साधारणपणे आधीच्या दोन स्पर्धांचा अनुभव गाठीशी होता.  त्यामुळे निश्चितच त्यांनी ब्लॉग्सची निवड करताना आधीच काही निकष तयार केले असतील, व त्याप्रमाणे विजेते व उत्तेजनार्थ निवडले असतील. गेल्या दोन वर्षांपेक्षा या वर्षी विजेत्या ब्लॉग्सची संख्या वाढली यावरूनच या स्पर्धेला किती उदंड प्रतिसाद मिळालं असेल याची कल्पना येते. या स्पर्धेसाठी जे परीक्षक नेमलेले होते ते भिन्न क्षेत्रातील यशस्वी व मुख्यत्वे अनुभवी व्यक्तीमत्वे होती. त्यांचाही या स्पर्धेकडे पाहण्याचा स्वत:चा एक दृष्टीकोन नक्कीच असेल व त्यादृष्टीनेच त्यांनी ब्लॉग्स निवडले असतील. ह्या स्पर्धेत ६ मुख्य व ३० उत्तेजनार्थ असे सर्व मिळून एकूण ३६ विजेते निवडले गेले. मी स्वत: एक स्पर्धक व उत्तेजनार्थ विजेता असूनही अजूनही हे सर्वच्या सर्व म्हणजेच फक्त ३६ ब्लॉग वाचूच काय व्यवस्थीत पाहूही शकलो नाही.  वेळेचे गणित जरी बाजूला ठेवले तरी मी एका दिवसात जास्तीत जास्त फक्त पाच ब्लॉग्स व्यवस्थीत वाचू शकतो.  यावरूनच परीक्षकांवरील अवघड जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने होते. स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी याकरिता आपला कसा व किती वेळ बाजूला काढून हे कार्य इतक्या कमी वेळात कसे पूर्ण केले हे समजून घेणे खरोखरच माहितीपूर्ण व रंजक ठरेल.

जालावर मुशाफिरी करताना परीक्षकांनी निवडलेल्या ब्लॉग्जबाबत बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया वाचावयास मिळाल्या. काहीजणांना हे निकाल अजिबात पटले नाहीत तर काहींनी यातील ठराविक ब्लॉग्सचा निषेधही व्यक्त केला तर काहींनी या स्पर्धेच्या दर्जाबाबतही शंका व्यक्त केली. असो..हे सर्व प्रत्येक स्पर्धेबाबत व परीक्षकांबाबत घडतच असते व घडत रहाणारच…ऑस्कर,ज्ञानपीठ इतकेच काय तर या वर्षी बराक ओबामांना जेव्हा शांततेचे नोबेल पारितोषक मिळाले तेंव्हा नोबेलच्याही दर्जा व हेतूबद्दल शंका घेण्यात आली होती. पण  माझ्या मते  सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यावयास हवे ते हे की या स्पर्धा, हि पारीतोषके हे सर्व आपल्यासाठी आहेत आपण यांच्यासाठी नाही. कोणतेही यश वा अपयश हे अशा स्पर्धांमधून मोजले जात असले तरी स्पर्धेचा मुख्य हेतू इतरांना प्रोत्साहित करणे हा आहे. पारितोषक मिळाल्याने किंवा अशा कोणत्याही स्पर्धेत यश मिळाल्याने केलेल्या, घेतलेल्या मेहनतीची दखल घेतली गेली एवढीच भावना विजेत्यांच्या मनात असावयास हवी असे माझे प्रांजळ मत आहे. आपण कोणापेक्षा श्रेष्ठ आहोत म्हणून हे यश मिळाले हा विचार जर मनात येत असेल तर स्पर्धेबाबताचा आपला एकून दृष्टीकोनच पुन्हा एकदा तपासून घेतला पाहिजे.

जेंव्हा प्रथमच मला या स्पर्धेविषयी समजले तेंव्हा मला स्टार माझाच्या टीमचे खरंच खूप कौतुक वाटले. खरंच खूप छान आणि प्रेरणादायी असा हा उपक्रम आहे.  इतर भाषिक ब्लॉग्समध्ये अशी स्पर्धा घेतली जाते की नाही ते माहित नाही (हिंदी व इंग्रजीत आहेत.) पण मराठी ब्लॉग्ससाठी ही एक फार मोठी उपलब्धी आहे. असे नवनवीन उपक्रम राबविण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आशा करतो अशा अनेक स्पर्धा भविष्यात घेतल्या जातील. व त्यांना प्रायोजकही मिळतील

मला हे मान्य आहे की ह्या स्पर्धेत बऱ्याचशा त्रुटी आहेत.  स्पर्धेत जिंकलेल्या ब्लॉग्सच्या दर्जाबाबत वा  संख्येबाबत काही शंका आहेत. कित्येक नावाजलेल्या मराठी ब्लॉगर्सनी या स्पर्धेत भाग घेतला नाही. असे एक ना अनेक…ऑब्जेक्शन्स आहेत. पण तरीही मनापासून सांगतो यामुळे कुठेही ह्या स्पर्धेचे महत्व कमी होत नाही. मराठीच काय कोणत्याही भाषेच्या ब्लॉग्ससाठी असे उपक्रम खूप महत्वाचे आहेत. उपयोगी आहेत…भले मग त्यात काही त्रुटी का राहीनात…

अशा स्पर्धामुळेच त्या त्या क्षेत्राचा उत्कर्ष होतो.  उदाहरणच घ्यावयाचे झाले तर १९८३ चा क्रिकेट वर्ल्डकप आपल्या देशात क्रिकेट (अति) लोकप्रिय होण्यास कारणीभूत  ठरला. तेच जगात फुटबॉलबाबतीत घडले. अहो इतकेच काय आमच्या गावातील तालमीत शरीरसौष्ठवाच्या स्पर्धा दरवर्षी होतात व त्यापाहून कित्येक तरूण मुले नियमित तालमीला जायला सुरवात करतात. अशा वेळेस स्पर्धेतील विजेते कोण आहेत यापेक्षाही या स्पर्धेमुळे किती नवीन लोकापर्यंत हे क्षेत्र/खेळ पोचले हे बघणे जास्त महत्वाचे नाही का? माझ्या अंदाजाप्रमाणे अशा दर्जेदार स्पर्धा जर नियमित होऊ लागल्या तर अनेकांना यात रस निर्माण होऊ शकतो व तेच ह्या वेळेस ब्लॉग माझा ३ या स्पर्धेबाबत झालेले आपण पहात आहोत. गेल्या दोन वर्षांपेक्षा या वर्षी प्रतिसाद खूप वाढला व येणाऱ्या वर्षात तो आणखीन वाढेल हे हि निश्चितच.

ब्लॉगिंगबद्दल थोडेसे

येणाऱ्या काळात इंटरनेट हि एक प्राथमिक गरज बनेल. ऑनलाईन येणे वा रहाणे हे आवडीनिवडीच्या पलीकडे जाऊन गरजेचे होईल. सध्या बऱ्याच प्रमाणात ते सोईचे आहे. व मनुष्यस्वभावानुसार सोईचे रुपांतर गरजेत व्हायला फारसा वेळ लागत नाही.
सध्या जगात जवळ जवळ सगळीकडेच लोकशाही आहे. व या लोकशाहीचे प्रशासन, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि पत्रकारीता हे चार मुख्य आधारस्तंभ आहेत. यातील पत्रकारिता या स्तंभाची आधुनिक तंत्रज्ञानामुळे सतत  उत्क्रांती होत आहे. हे जरी एक प्रकारचे वरदान असले तरी या क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेमुळे याची विश्वासाहर्ताही झपाट्याने कमी होत आहे. हल्लीच्या बातम्यांचा दर्जा व स्त्रोत पहाता त्यांचे मूळ लक्षात यावयास वेळ लागत नाही. अशावेळेस ब्लॉग हे खूप मोठे माध्यम आपल्या सेवेस व मदतीस हजर झालेले आहे. परदेशात नियमित वर्तमानपत्रे किंवा न्यूज च्यानेलपेक्षा ब्लॉग्सवरती विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. व ती सतत वाढतच आहे. वेगवेगळया विषयांवर वर्गीकरण करून प्रचंड माहितीची देवाणघेवाण या माध्यमातून होते. इतर माध्यमात अभावानेच आढळणारा लेखक  वाचक किंवा प्रेक्षक यांतील संवाद (कम्युनिकेशन ) येथे सर्रास अनुभवायास मिळतो. व येणाऱ्या काळाची ती गरजही आहे. करोडो रुपये खर्च करून तयार केलेल्या व तितकाच किंवा त्यापेक्षाही जास्त खर्च करून प्रकाशित वा प्रदर्शित केलेल्या जाहिरातीपेक्षाही एखाद्या जिवंत व्यक्तीने सांगितलेल्या  वा अनुभवलेल्या मतावर त्या वस्तूचे भवितव्य हल्ली ठरते. व याबतीत कमीत कमी वेळात व खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यास ब्लॉगसारखे दुसरे माध्यम नाही. सोशल साईटस् हा एक प्रकार आहे. पण त्याहीपेक्षा ब्लॉगींग हे जास्त विश्वासार्ह मानले जाते असा माझा तरी अनुभव आहे. आधुनिक काळातील ब्रह्मास्त्र असाच मी याचा उल्लेख करीन. अशा या ब्लॉगींगसारख्या ब्रह्मास्त्राचा उपयोग कित्येक  देश, कंपन्या, उद्योजक व अनेक प्रकारचे लोक नानाविविध कारणांसाठी करीत आहेत. व त्यांचे प्रमाण वाढतच आहे. बऱ्याचश्या ठळक रेषा यामुळे पुसट होत आहेत .. जग आणखी जवळ येत आहे. छोटे होत आहे.  जे सध्या ब्लॉग्स चालवीत आहेत त्यांना याचा कमीजास्त प्रमाणात अनुभव आलेलाच आहे. छोटे उदाहरण घ्या कित्येकदा आपण कोणता चित्रपट पहावयाचा वा पुस्तक वाचायचे  हे वर्तमान पत्र वा टीव्ही पाहून नव्हे तर एखादा ओळखीचा ब्लॉग वाचून ठरवितो. (त्या ब्लॉगरच्या चित्रपट/पुस्तक सामिक्षेबद्दल विश्वास असेल तरच ) हेच इतर उत्पादनांबाबतही होत आहे. हा बदल निश्चितच अपरिहार्य व स्वागतार्हही  आहे.

मराठी ब्लॉगर्सबद्दल थोडेसे..

साधारण  ३ महिन्यांपूर्वी मी एक लेख लिहिला होता या लेखाच्या शेवटी मी माझे एक प्रामाणिक मत किंवा अपेक्षा व्यक्त केली होती ती पुढीलप्रमाणे “शेवटी एकच सांगावेशे वाटते की ह्या मराठी ब्लॉग विश्वाला सध्या कशाची गरज मला जाणवली तर ती म्हणजे  एकमेकांच्या सहकार्याची, प्रोत्साहनाची, विधायक टीका टिप्पणीची आणी जबाबदारीची.” आज पुन्हा एकदा याच विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघताना मला अजून काही सांगावेसे वाटते ते म्हणजे आपल्यासाठी ब्लॉग हा एक स्वान्तसुखाय असा प्रांत असला तरी त्यात प्रचंड पोटेन्शियल आहे…हे म्हणजे आपल्या हातात एक भलेमोठे जंबोजेट विमान असताना आपण त्याचा उपयोग बैलगाडीसारखा काही मीटर अंतर जाण्याकरिताच करण्यासारखे आहे. हे कदाचीत अतिशयोक्तीपूर्ण उदाहरण वाटेल पण असो मुख्य मुद्दा हा की कोणत्याही गोष्टीकडे आपल्या नेहमीच्या संकुचितवृत्तीने पहावयाचे आपण सोडले पाहिजे व जगाच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे गेले पाहिजे…इतके पुढे की इतरांसाठी (इतर भाषिक) आपण एक आदर्श ठरू. हे ही एक खूप आदर्शवादी वा पुस्तकी वाक्य वाटेल कदाचीत पण तसे ते मुळीच नाही. आपल्याला जे जे माहिती आहे, वा आपण अनुभवलेले आहे वा जी जी म्हणून आपली काही मते आहेत वा इतरही बरेच काही आपल्याजवळ इतरांबरोबर शेअर करण्यासारखे आहे ते ते जर आपण मराठीत आपल्या ब्लॉगवर देऊ शकलो तर निश्चितच त्याने एक खूप मोठे कार्य आपल्या हातून आपोआप घडेल. भले मग तो खारुताईचा का वाटा असेल. थेंबे थेंबे तळे साठे याप्रमाणे जर लाखो मराठी ब्लॉगर्सनी आपल्या जवळची माहिती मराठीत अपलोड केली तर याचा आपल्या मराठी भाषेला अतोनात लाभ होईल. येणाऱ्या पिढ्यांना मुबलक प्रमाणात मराठीत माहिती मिळेल. (सध्या याबाबतीत आनंदीआनंदच आहे) व जिचा फायदा शेवटी आपल्या भाषेलाच होईल. विरोधाभास बघा, मुंबईसारख्या मोठ्या शहरात सध्या मराठी बोलणारयांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पण याउलट ऑनलाईन मराठी भाषेचा उपयोग वाढत आहे. survival of the fittest या डार्विनच्या सिद्धांतानुसार प्रत्येक सजीव जगण्यासाठी लढत असतो तेच सूत्र जर भाषेला लावले तर बोलताना कमी होत जाणाऱ्या आपल्या मराठी भाषेला निदान ऑनलाईन अस्तित्वामुळे कुठेतरी बळ प्राप्त होईल असा (कदाचीत) भाबडा आशावाद माझ्या मनी नेहमी येतो. मी असे म्हणत नाहीये की आपण प्रत्येकाने आपल्या मराठी भाषेसाठी लढले पाहिजे, झटले पाहिजे…अजिबात नाही, इथे रोजच्या कटकटीना तोंड देताना नाकीनऊ येतात तिथे आणखी ही उठाठेव? अजिबात करू नका…एवढेच करा, ब्लॉग लिहताना? मग त्यात नवनवीन माहितीची भर घाला. नियमित घाला. भले मग तो तुमच्या घराजवळचा वाणी का असेल…वा तुम्ही केस कापता तो नाव्ही का असेल. त्याची माहिती द्या. काहीही चालेल, कसलेही चालेल…इतरांनी लिहिलेले वाचा. आवडले तर जरूर प्रतिक्रिया द्या. प्रतिक्रियेने केवढा हुरूप येतो ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही. रोज निदान एका नवीन ब्लॉगला भेट द्या. एका आवडलेल्या लेखाला प्रतिक्रिया द्या. त्या ब्लॉगबद्दल इतरांना माहिती द्या. बास एवढेच करा…व हा वसा पुढे चालू ठेवा…मग बघा आपले मराठी ब्लॉग विश्व व पर्यायाने आपली मराठी भाषा कशी बहरत जाईल….:) कदाचीत आपल्या ते लक्षातही येणार नाही पण असे होईल हे मात्र निश्चित. यातील बऱ्याचशा गोष्टी मीही करीत नाही पण आता करायचे ठरविले आहे. तुमच्याकडेही कदाचीत काही वेगळ्या कल्पना, विचार असतील तर ते इथे वा तुमच्या ब्लॉगवर मांडा. त्यांचा प्रसार करा..

थोडक्यात

मित्रांनो लिहिण्याच्या नादात बरेचसे विचार विस्कळीतपणे मांडले गेले आहेत. कदाचीत काही ठिकाणी क्रमही वा मुद्दाही चुकला असेल. पण एक मात्र खूप मनापासून सांगतो… आज सहज म्हणून जे काही आपण ब्लॉगवर टाकत आहोत, लिहीत आहोत  तेच पुढे जाऊन कोणाला न कोणाला तरी  खूप उपयोगी पडणार आहे. प्रोत्साहित करणार आहे. म्हणून काहीही लिहा पण काळजीपूर्वक लिहा. चुकीचे काही लिहू नका. जर कोणी चूक निदर्शनास आणली तर आभार मानून दुरुस्त करा. इतरांना प्रोत्साहन द्या. चांगल्याचे मनापासून कौतुक करा..न आवडलेल्याकडे दुर्लक्ष करा. वाद जरूर घाला पण भांडणात शिरू नका. कोणाचा हिरमोड करू नका. व सर्वात शेवटी लिहिते रहा…


त्रिपुरी पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा)

कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानात जे दीपस्तंभ (उंच दगडी दिवे) असतात ते सुद्धा पेटवितात. या दिपोत्सवालाच त्रिपुर पाजळणे असे म्हणतात.

तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. पण शेवटी असुर ते असुरच त्यांची शेपूट वाकडी ती वाकडीच म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श्रीशंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरु झाली.

कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला “मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी” असे म्हणतात.

जे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.


तुळशीचे लग्न (तुलसी विवाह)

कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीला चातुर्मास व्रत समाप्त होते. एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत मुख्यत्वे द्वादशीला श्रीविष्णूचा तुळशीसी विवाह साजरा करण्याची पध्दत आहे.

तुळस हि घराघरात असणारी एक पवित्र व उपयुक्त वनस्पती आहे. आपल्या हिंदू संस्कृतीने तर तिला मानवाचा दर्जा बहाल केला आहे. ती बहुगुणी व ओषधी आहे. देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस अवश्य लागते. श्रीविष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार तुळशीच्या नुसत्या दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके तुळशीला महत्व आहे.

तुळशीमध्ये कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू  शिरकाव करीत  नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे ई. तीचे महत्वाचे गुणधर्म आहेत.

अशा या सर्वगुणसंपन्न तुळशीने आपल्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनात अढळपद प्राप्त केले आहे. म्हणून घरातील सर्वांनी देवांप्रमाणेच तुळशीचे दर्शन घ्यावे.