मन विरुद्ध मी….शोकांतिका

Posted: डिसेंबर 3, 2010 in झम्प्या झपाटलेला
टॅगस्, , , , , , ,

मन म्हणजे गोंगाट, मन म्हणजे वैताग, मन म्हणजे त्रास….
मनाचे पुरवावे चोचले जितके तितका त्याचा वाढे माज…

असावे एक बटण जे करील मनास पॉज
मिळेल शांती निदान काही तास

यांच कारणे वाचला रामदास..आवडला खास
मन करा रे प्रसन्न…सर्व सिद्धीचे कारण
झालो रामदास फ्यान, केला प्लान
मनाची आता जिरवायची छान

झगडलो, धडपडलो, तडफडलो, राब राब राबलो
मन कधी मारायचे नाय हाही मंत्र प्राणपणाने जपलो

पण मनाचा आपला उरफाटाच न्याय
ठरविलेलेच साल्याने असा तसा मला सोडायचा नाय

रोज रोज साल्याची एक नवीनच ऑफर
जणू काही तो मालक तर मी नोकर
काय करावे काही कळेना
मनाचा माज जराही उतरेना?

वाचला बुद्ध केले ध्यान
महावीराचे ऐकून घातले उपवास
कृष्णमूर्तींचाही लावला क्लास
पण मनासमोर मात्र सदाच नापास

मनालाही आमचे उद्योग कळले
तेही मनातल्या मनात चांगलेच चरकले
टरकलेल्या मनाने टाकला डाव
म्हणाले मजला
आपल्या दोघांच्या भांडणात कशाला तिसऱ्याचे नुकसान
तिसरा? अबे ये तिसरा कौन?
बावरलो, बावचळलो, गोंधळलो
मनाने टाकला भन्नाट गुगली
तिसरा म्हणून शरीराचा केला शिखंडी

तुझ्या माझ्या भांडणात
शरीराची लागते फुकटची वाट
तुझे ध्यान,  तुझेच उपवास
शरीराला का फुकाचा त्रास?

मनाचे म्हणणे मला होते पटले
तरी मोठ्या हिमतीने त्याला सुनावले
मी आणि शरीर एकच आहोत
तुझ्याविरुद्ध लढण्यास समर्थ आहोत

खदाखदा मन हसले
शरीर आणि तू एकच आहेस?
मग मी काय अनौरस आहे?
वेड्या मीही तुझाच एक भाग आहे
माझ्याशिवाय तुझे अतित्वच शून्य आहे
आणि याचाच तर मजला माज आहे
माझ्यापासून सुटका अशक्य आहे
मरणही माझ्यापुढे व्यर्थ आहे
वेड्या सांगतो एक गुपित माझे
माझ्याशी लढल्याने मीच वाढे
सह वा विरुद्ध मी अजिंक्य आहे
शरणागती हा एकच तुला उपाय आहे

(इथून पुढे मी दोन एन्ड केले आहेत ज्याला जो पटेल त्याने तो गोड मानावा.)

मनाच्या शब्दांनी मी पार ढेपाळलो
शरणागतीस सपशेल तयार झालो
तू म्हणतोस ते बरोबर आहे
तू, मी आणि शरीर एकच आहे

भोगवस्तूनी हे जग भरलेले
दिवस आपल्याकडे थोडेच उरलेले
मिळेल ते ते भोगत जावे
स्वत:स तृप्त करीत रहावे

तेंव्हापासून पुन्हा पळतो आहे
मनाचे लाड पुरवितो आहे

कारण

जरी मन वैताग, गोंगाट, त्रास आहे
तरी मनापुढे मात्र मी अजूनही हतबलच आहे

तर मित्रांनो ही होती ‘मन विरुद्ध मी….शोकांतिका’ आता ‘मन विरुद्ध मी….सुखांतिका’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रतिक्रिया
  1. kiran म्हणतो आहे:

    same to same paristithi mazya manachi pan aahe

यावर आपले मत नोंदवा