Posts Tagged ‘बिल गेट्स’


सावधान मित्रांनो…आजपासून झम्प्याची शिकवणी सुरु..सर्वात प्रथम तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद्….ते यासाठी की तुम्ही आत्ता या क्षणाला येथे हजर आहात आणी पुढील संपूर्ण लेख वाचण्याचे कष्ट घेणार आहात.(अशी मी आशा करतो.)

धन्यवाद झाले आता अभिनंदनपण करतो! ते यासाठी की तुम्ही अजुनही तरुण आहात. तरुण यासाठी की शिकण्यास उत्सुक आहात. तुम्हाला हेनरी फोर्डचे ते जगप्रसिद्ध वाक्य तर माहीतच असेल “जो कोणी शिकायचे थांबवितो तो म्हातारा. मग त्यचे वय २० असो की ८०. ” सर्टनली तुम्ही अजून म्हातारे नाही झालात.

असो प्रस्तावना पुरे..आता मुख्य विषयाकडे वळू…

आज झम्प्या तुम्हाला जी पहिलीच गोष्ट शिकवणार आहे ती तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे व अमलात पण आणायची आहे. हा एक प्रकारचा नियमच आहे असे समजा हवे तर.हा नियम जर तुम्ही फॉलो केलात (अगदी आंधळेपणाने) तर यश तुमच्यामागे अक्षरक्षः उड्या मारत येईल. आणी हे झम्प्या तुम्हाला इथे लिहुन देत आहे. आत्तापर्यन्त एकही स्वकर्तृत्ववान (हे खूप महत्त्वाचे) यशस्वी अवलिया हा नियम डावलून यशस्वी होवु शकलेला नाही व होणार नाही मग तो सचिन तेंडुलकर असो की बील गेट्स की महाभारतातला धनुर्धारी अर्जुन.

नियम समजायला खूपच सोपा पण पाळायला भयंकर अवघड ( जर तुमच्यात चिकाटी असेल, एखादी गोष्ट वारंवार करायला तुम्ही कंटाळत नसाल तर मग खूप सोपा )

असा हा जादुभरा नियम आहे १०००० तासांचा (दहा हजार तासांचा)

कोणतीही गोष्ट सतत केली की ती आत्मसात होते हे तर तुम्हाला चांगलेच माहीत आहे. बरोबर? आणी जर का तीच गोष्ट तुम्ही दहा हजार तास केलीत तर? तर मग मात्र तुम्ही त्या गोष्टीत मास्टर होता. तज्ञ होता. झोपेतही ती गोष्ट करण्याचे कसब येते. तर हाच तो जादुई नियम आपण शिकणार आहोत्..आता तुम्ही विचाराल ह्यात शिकण्यासारखे राहीले काय अजून? नियम समजला आता वापरायचा आणि यशस्वी होयचे..नाही गडबड करु नका. इतक्या सहज जर हे समजत असते तर आतापर्यन्त सगळेच तेंडुलकर झाले असते.

हया नियमाला अजून काही उपनियमपण आहेत ते कुठे शिकलात अजून..

उपनियम पहीला- जी कोणतीही गोष्ट तुम्ही दहा हजार तास करणार आहात तीच्याबाबतीत तुम्ही पॅशनेट असावात. म्हणजे त्या गोष्टीवर तुमचे अतोनात प्रेम असावे. नाहीतर मधूनच सोडून पळायची वेळ येईल. प्रेम कसे असावे तर असे..(विश्वनाथ आनंद् = बुद्धीबळ , सचिन = क्रिकेट, बिल गेट्स् = सॉफ्ट्वेअर  प्रोग्रामिंग) कोणी तुमचे नाव जरी घेतले तरी तुम्ही जे काही करता त्याचे चित्र डोळ्यापुढे उभे राहीले पाहिजे. मग तुम्ही भले (घाणेरड्या) कविता लिहीणारे कवी का नसाल.

उपनियम दुसरा- कितीही अडचणी किंवा त्रास सहन करावा लागला तरी हाती घेतलेल्या वस्याप्रमाणे तुम्ही ती गोष्ट न चुकता दररोज केलीच पाहीजे. (चित्रपट पहा “लक्ष, हरिशचंन्द्राची फॅक्टरी”)

उपनियम तिसरा-जी कोणतीही गोष्ट तुम्ही करत आहात ती आणखी चांगल्या प्रकारे कशी करता येईल याचा झपाटून ध्यास घ्या. (महात्मा गांधी-सत्याचे प्रयोग वाचा. अरे बापरे अवघड वाटते मग अजून एक चित्रपट पहा “नटरंग” गुणा कागलकरचा ध्यास फॉलो करा… तमाशा नव्हे.)

उपनियम चौथा- त्या गोष्टीतील जाणकारांकडून मिळेल तेवढे मार्गदर्शन घ्या. जेणेकरून स्वतःच्या ज्या चुका तुमच्या लक्षात येत नाहीत त्या ती व्यक्ती दुरुस्त करेल. (उदा: अर्जुन-द्रोणाचार्य, सचिन-आचरेकर सर)

उपनियम पाचवा- चांदनी चौक टू चायना ह्या चित्रपटातील त्या चीन्याने सांगितलेली चीनी म्हण पाठ करा.. नव्हे नव्हे.. रोज सकाळी आंघोळ करताना जोरजोरात ओरडा ” मुझे तुम्हारी उस १०००० मूव्ह्से खतरा नहीं है जो तुमने एक बार प्रॅक्टीस की है. मुझे खतरा उस एक मूव्हसे है जो तुमने १०००० बार प्रॅक्टीस की है. ” इतक्या वेळा बोला की ती तुमच्या खोल आत आत मुरली पाहीजे.

दहा हजार तासांच्या मुख्य नियमाबरोबर ह्या उपनियमांची तुम्ही पारायणे केलीत की यशरुपी विठ्ठल तुम्हाला प्रसन्न झालाच समजा.

आता कठीण भाग – दहा हजार तास म्हणजे रोजचे २० तास याप्रमाणे जर तुम्ही न चुकता सराव केलात तर बरोबर दहा वर्षे लागतील. मागील ओळ पुन्हा वाचा…घाबरलात्..पण जर यशस्वी होयचे असेल.. ते पण वरिल उदाहरणांतील दिग्गजांप्रमाणे तर हे दिव्य पार पाडावेच लागेल. तरच लेजेन्ड्चा दर्जा तुम्हाला प्राप्त होईल.बिल गेट्स वयाच्या बाराव्या वर्षापासून कॉम्प्यूटरवर बसून १२ बारा तास कोडींग करायचा ज्यावेळेस अमेरिकेतही इतर लोकांसाठी कॉम्प्यूटर ही अवाक्याबाहेरची गोष्ट होती. सचिनचे उदाहरण वेगळे सांगायची गरजही नाही. विनोद कांबळी त्याच्यापेक्षा कितीतरी टॅलेंटेड असताना सचिन फक्त ह्या नियमामूळे कोसो मैल पुढे निघून गेला. हां जर तुम्हालापण कांबळीसारखे सामान्य यश हवे असेल तर मग या नियमांची काही आवश्यकता नाही. तुम्हीपण तुमच्या टॅलेंट्वर विसंबून राहू शकता. प्रचंड चिकाटी, निर्धार आणी संयम जर तुमच्यात असेल तरच हा नियम लक्षात ठेवा.

तुमच्यातील काहीजण म्हणतील वरील दिग्गजांकडे नशिब होते आमचे तसे नाही..तर त्यांना झम्प्या नम्रपणे सांगू इछितो की दहा हजाराच्या या नियमाचा नशिब आणी वय या दोन्ही गोष्टींशी कसलाही संबंध नाही. कारण असे की तुम्ही एखादी गोष्ट इतक्या वेळी केलीत की तुम्ही आपोआपच त्या गोष्टीत आपले लक तयार करता. अर्जुन आणि एकलव्य यांची अचूक धनुर्धारी त्यांच्या सततच्या सरावामुळे त्यांना साध्य झाली होती नशिबामुळे नव्हे. आणी आता राहीली गोष्ट वयाची तर त्यासाठी पुढील दोन उदाहरणे पुरेशी आहेत एक आहे the Little House series of children’s books ची लेखिका Laura Ingalls Wilder चे. जिचे पहिले पुस्तक वयाच्या ६५व्या वर्षी प्रकाशित झाले..तोपर्यंत ती वरील नियमाचीच पारायणे करित होती. दुसरे उदाहरण कदाचीत तुम्हाला माहीत असेल Colonel Sanders चे.. ज्यावेळेस आपल्याकडे लोक निवृत्त होतात त्या वयात म्हणजे साठीला Kentucky Fried Chicken franchise चा अफलातून उद्योग या अवलियाने उभा केला व त्यात तो चक्क यशस्वीही झाला. तोपर्यंत तोदेखिल संपूर्ण अयशस्वी (काहीजणांच्या भाषेत कमनशीबी) होता. पण ह्याच नियमाने त्यालापण तारला.

तर मग लक्षात आले एक सरळ साधा सोपा नियम तुमचे अवघे आयुष्य कशे नुसते व्यापूनच नव्हे तर यशस्वी करून दाखवितो.

तर मग मित्रांनो वेळ नका दवडू..करा सुरवात.. शोधा आपली पॅशन (आधीच माहीत असेल तर उत्तमच) आणी लागा सरावाला, जा झपाटून, इतके झपाटले जा की लोकांनी तुम्हाला वेडे म्हट्ले पाहिजे..आणी जेंव्हा लोक असे म्हणायला सुरवात करतील तेंव्हा समजा की साले यश आता आपल्यापसून फार दूर राहीले नाही

आता उभे रहा आणी जोरात बोंबला…” झम्प्या झपाटलेला की जय!”

म्हणजे हा धडा तुमच्या चांगलाच लक्षात राहील.

(आणी हो एक गोष्ट सांगायची राहूनच गेली…झम्प्यापण हा नियम अगदी रिलिजिअसली फॉलो करतो बर कां. उगाच नाही झम्प्याला झपाटलेला म्हणतात.)

ता.क.- हा लेख वाचून कोणाच्यात जर जास्तच किडा वळवळला असेल तर त्याने पुढील पुस्तकाने अजून झपाटून जावे.

काही दिवसांपूर्वी झम्प्यालादेखिल याच पुस्तकाने झपाटले होते.