Posts Tagged ‘इंटरनेट’


इंटरनेटचे लहान मुलांवर दुष्परिणाम ह्यावर एक फार मोठा ग्रंथ सहज तयार होईल. या विषयावर अनेक तास चर्चाही करता येईल. पण या जगात अशीही काही लहान मुले आहेत ज्यांनी या माध्यमाचा एक व्यवसाय म्हणून विधायक उपयोग केला आणि आता ते भावी पिढीचे एक नवीनच प्रकारचे आदर्श बनले आहेत.

वयाच्या सोळाव्या वर्षी तुम्ही काय करत होता? किंवा तुम्हाला जर असे विचारले तुम्ही वयाच्या सोळाव्या वर्षी किती कमवत होता? तर एकतर तुम्ही उत्तर द्याल वयाच्या सोळाव्या वर्षी आम्ही शिकत होतो किंवा जर काही कमवत होतो तर ती रक्कम नक्कीच सांगण्याइतकी विशेष नाही.(काही सन्माननीय अपवादही असतील इथे) तर आज मी तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहे ज्याने वयाच्या १६ व्या वर्षी स्वतःच्या कमाइने १ बिलिअन डॉलर्स कमविले आहेत…..व अजूनही तो कमवतोच आहे.

त्या मुलाचे नाव आहे ख्रिस्टीन ओवेन्स.(Christian Owens) तो एक ब्रिटीश नागरिक आहे. त्याचा आदर्श आहे अ‍ॅपल कंपनीचा CVO स्टीव्ह जॉब्स. त्याच्याच विचारांची अक्षरशः नक्कल करून तो हे करत आहे. who dares wins  म्हणजे जो साहस करेल तोच जिंकेल. या स्टीव्हच्या विचारावर त्याला पूर्ण विश्वास आहे. ख्रिस्टीन ७ वर्षाचा असताना त्याला त्याचा पहिला कॉम्पुटर मिळाला. त्यानंतर तीनच वर्षानी त्याला मॅक (अ‍ॅपलचा कॉम्पुटर) मिळाला. ज्यावर त्याने वेब डीजायनिंग शिकायला सुरवात केली आणि त्यानंतर बरोबर चार वर्षांनी म्हणजे वयाच्या १४ व्या वर्षी त्याने त्याची पहिली कंपनी सुरु केली. तिचे नाव ठेवले Mac Bundle Box. ही एक साधी वेबसाईट होती. जिच्यावर तो अ‍ॅपलची अ‍ॅप्लीकेशन्स कमी किमतीत विकत असे. ह्या वेबसाईट्ची कल्पना पण त्याने दुसऱ्या एका अशीच सर्विस देणाऱ्या MacHeist या वेबसाईटवरून सहीसही उचलली होती. कन्सेप्ट तशी खूप साधी होती. घाऊक रेटमध्ये अ‍ॅप्लीकेशन्स विकत घ्यायची व डिस्काउंट रेटमध्ये ठराविक वेळेत विकायची. उदाहरणार्थ तो काही अ‍ॅप्लीकेशन्सचे एकत्र बंडल बनवायचा. त्यांची बाजारातील एकत्रीत किमत जर ४०० डॉलर्स होत असेल तर तो ते बंडल चक्क  ५० डॉलर्सला विकायचा. म्हणजे एक दशांश किमतीत. वर शिवाय जर ग्रुपने खरेदी केली तर आणखी एक अ‍ॅप्लीकेशन्स बोनस म्हनून द्यायचा… ह्या अशा स्कीममूळे झाले काय की त्याची तोंडी जाहिरात खूप झाली…ग्रुपच्या ग्रुप खरेदीसाठी यायला लागले. त्याचा खप लाखोंने वाढला. वेबसाईट सुरु झाल्यापासूनच्या पहिल्या दोन महिन्यातच त्याच्या खात्यावर एक लाख डॉलर्स जमा झाले.

तरी सुद्धा हा पठ्या काही समाधानी नव्हता. त्याची भूक मोठी होती. त्याला हे असे अ‍ॅप्लीकेशन्स विकण्यात एवढा रस राहिला नव्हता. त्याने आता मोठी झेप घ्यायचे ठरविले. व त्या झेपेला नाव दिले Branchr. हीसुद्धा एक नक्कलच होती. गुगलच्या या जमान्यात पे पर क्लिकचा फंडा त्याने वापरला. महिन्याला १७५० वेबसाईटवर ३०० मिलिअन जाहिराती झळकायला लागल्या. वेबसाईट सुरु केल्याच्या पहिल्याच वर्षी ८ लाख डॉलर्स इतकी त्याची कमाई होती. आता सध्या त्याच्या कंपनीत त्याच्या हाताखाली ८ अ‍ॅडल्ट्स काम करतात. त्यातली एक ४३ वर्षे वय असलेली त्याची आई आहे.

आणखीन १० वर्षानंतर तो कुठे असेल हे त्याचे त्याला नक्की सांगता येत नाही…हा पण त्याचे पुढचे टारगेट आहे १०० मिलिअन बिटिश पौन्ड. त्याची वाटचाल अशीच चालू राहिली तर तो हे टारगेट खूप लवकरच पूर्ण करेल.

एकदा त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले..तुझ्या यशाचे नेमके रहस्य काय? तर तो हसून इतकेच म्हणाला “रहस्य वगैरे काही नाही फक्त खूप मेहनत, ठाम निर्धार आणि प्रचंड काहीतरी मोठे करण्याची जिद्द.” (आणि  MacHeist ची नक्कल)

तर मित्रांनो असे हे इंटरनेट नावाचे माध्यम आपल्याही हातात आहे. आपल्याही डोक्यात अशा काही कल्पना सतत चमकत असतात. पण आपण नेहमी त्याकडे दुर्लक्ष करतो..किंवा स्वतःला कमी लेखून ही असली भानगड आपल्याला झेपायाची नाही असे स्वतःच बजावतो…तर इथून पुढे विचार करा वयाच्या १४ व्या वर्षी जर ख्रिस्टीन असे साहस(?) करू शकतो तर तुम्ही आम्ही का नाही?

नक्की कुठे कमी पडतो आपण?
—————————————————————————————————————————————————————————————–

Share on Facebook Share

Google Buzz Google Buzz Yahoo Buzz

email this email this


काल इंटरनेटवरचा बराचसा वेळ बऱ्याचजणांचे खो वाचण्यात गेला. टाईमपाससाठी छान कल्पना आहे…काल महेंद्रकाकाकडून श्रीकृष्ण सामंतानी स्वत:हून खो घेतला. हे त्यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षीचे इनिशेटीव व उत्साह पाहून मीही प्रेरित झालो व आता त्याच्याकडून स्वत:च खो घेऊन आता ही खोखोगीरी खेळत आहे.

आज १५ ऑगस्ट भारताचा ६३ वा स्वातंत्र्य दिन..त्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आपल्या सर्वांना आहेतच. आजचा दिवस तसा आनंदाचा दिवस. स्वातंत्र्यदिन हा देखील एक सणच आहे..व सणाच्या दिवशी हसून, खेळून, बागडून, आनंदी राहायचे असते. त्यासाठीच आज कोणतेही गंभीर लिखाण न करता व उपदेशाचे डोस न पाजता मी आपल्या देशाच्या प्रतिज्ञेला (आहे का लक्षात असा काही प्रकार असतो ते?) समोर ठेऊन काही पकाऊ कविता/विडंबने केली आहेत. तरी तुमच्याकडे फुकट घालवायला थोडा वेळ असल्यास तुम्ही ती सहन करावीत. ती तुम्हाला नक्कीच आवडणार नाहीत. आणि जर न आवडण्याच्याही वर तुम्हाला त्रास झाला तर खाली असलेल्या बऱ्याचश्या मोकळ्या जागेत तुम्ही तुमच्या शिव्यांचा पाऊस मनसोक्तपणे पाडू शकता.

आधी मी आपली म्हणजे भारत  देशाची ओरिजनल प्रतिज्ञा देतो…( इथे बरेचजण सोयीस्कररीत्या विसरले असतील म्हणून ) व त्याखाली माझी विडंबने सादर करतो…

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधारया माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

विडंबन पहिले

इंटरनेट माझा देश आहे।
सारे इंटरनेटवासीय माझे बांधव आहेत।
माझ्या इंटरनेटदेशावर माझे प्रेम आहे।
माझ्या इंटरनेटातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या वेबसाईट्सचा मला अभिमान आहे।
त्या वेबसाईट्सचा मेंबर होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या फेसबुक, ऑर्कुट
आणि ट्विटर फॉलोअर्सचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझे इंटरनेट आणि इंटरनेटवासीय
यांच्याशी कनेक्टेड राहण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे फॅन्स आणि स्क्रॅप्स
यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

।।झम्प्या झपाटलेला।।

वैधानिक इशारा:  खालील भाग वाचताना मळमळणे,  गुदमरणे, चीडचीड,मनस्ताप होणे यांसारख्या भावना उद्द्पीत होऊ शकतात. तरी होणाऱ्या त्रासास झम्प्या जबाबदार असणार नाही.

विडंबन दुसरे

फेसबुक, ऑर्कुट व ट्विटर असे अनेक माझे देश आहेत.।
येथील सारे नागरिक माझे सो कॉल्ड मित्रमैत्रिणी आहेत.।
माझे माझ्या देशांवर नको इतके प्रेम आहे.।
माझ्या देशातल्या वेळखाऊ, पकाऊ
आणि नालायक परंपरांचा मला अभिमान आहे.।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी दिवस रात्र झटत राहीन.।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवो न ठेवो
येथील प्रत्येकाची मान नक्की कापीन.।
वेळ आल्यास प्रत्येकाची पाठही खाजवून देईन.।
माझे देश आणी माझे देशमित्रमैत्रिणी
यांच्याशी सदा नि कदा खोटे बोलण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.।
माझे  कल्याण आणि
माझी समृद्धी ह्यांतच त्यांचे
सौख्य सामावले आहे।

।।झम्प्या झपाटलेला।।

विडंबन तिसरे

करित होतो आणि येऊ घतलेल्या संकटाची एकदम जाणीव झाल्यामुळे थबकलो व थांबलो

त्यामुळे पुढील विडंबने पुन्हा केंव्हातरी…


तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजेच तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे. आजकाल इंटरनेट ही एक गरज झाली आहे. हल्ली जवळजवळ प्रत्येक ठीकाणी इंटरनेटचा वापर केला जातो. बँक्स्,शॉपिंग, शिक्षण, उद्योगधंदे, संगीत अशा नानाविवीध ठीकाणी इंटरनेट अत्यावश्यक झालेले आपण बघतो, वापरतो. पण आपल्यापैकी फारच कमी जणांना इंटरनेटबद्दल माहीती असेल. इंटरनेट हा नक्की काय प्रकार आहे व तो केंव्हा, कोणी व कसा सुरु केला. हे जर तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात (फक्त आठ मिनीटात) जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक अफलातून शैक्षणिक विडीओ झम्प्या येथे शेअर करित आहे. त्याचा जरूर लाभ घ्यावा.

झम्प्याचा फंडा : ह्या विडीओची जर तुम्ही पारायणे केलीत तर उद्या अचानक इंटरनेट्बद्दल काही बोलायची वेळ आली तर नक्कीच इंम्प्रेशन पाडाल.