Posts Tagged ‘India’


तुळशीचे लग्न (तुलसी विवाह)

कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीला चातुर्मास व्रत समाप्त होते. एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत मुख्यत्वे द्वादशीला श्रीविष्णूचा तुळशीसी विवाह साजरा करण्याची पध्दत आहे.

तुळस हि घराघरात असणारी एक पवित्र व उपयुक्त वनस्पती आहे. आपल्या हिंदू संस्कृतीने तर तिला मानवाचा दर्जा बहाल केला आहे. ती बहुगुणी व ओषधी आहे. देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस अवश्य लागते. श्रीविष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार तुळशीच्या नुसत्या दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके तुळशीला महत्व आहे.

तुळशीमध्ये कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू  शिरकाव करीत  नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे ई. तीचे महत्वाचे गुणधर्म आहेत.

अशा या सर्वगुणसंपन्न तुळशीने आपल्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनात अढळपद प्राप्त केले आहे. म्हणून घरातील सर्वांनी देवांप्रमाणेच तुळशीचे दर्शन घ्यावे.



‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसरा हा मोठा सण मानला जातो. नवरात्र संपले की दशमीला दसरा उजाडतो. आश्विन महिन्यातील शुद्ध दशमीस हा सण साजरा करतात. दसरा हा सर्व कार्यांना शुभ मानला जातो. या दिवशी नवे कार्य करण्याची प्रथा आहे. दसऱ्याला विजयादशमी असेदेखील म्हणतात.

विजयादशमीला  सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजीतापूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. या दिवशी वह्या, पुस्तके, ग्रंथ, पोथ्या, यंत्रे, शस्त्र, हत्यारे, वाद्ये, उपकरणे यांची पूजा करतात. नंतर ईशान्येला जाऊन शनी किंवा आपट्याच्या वृक्षांची पूजा करतात व त्यांची पाने तोडून (फांद्या नव्हे) आपल्या जवळच्या लोकांना वाटतात. या दिवशी जुनी भांडणे, तंटे विसरून चांगल्या विचारांचे आदानप्रदान करावे ही उदात्त भावना ही पाने वाटण्यामागे आहे. 

आपला भारत हा कृषीप्रधान देश असल्याने दसरा हा सुद्धा कृषीलोकोत्सवच आहे. पावसाळ्यात पेरणी केलेल्या शेतातील पहिले पीक याच दिवशी घरात आणावयाची प्रथा आहे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालील स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी या धान्याचे अंकुर उपटून देवीला वाहतात. ही प्रथाच आपल्या संस्कृतीवर शेतीचा किती प्रभाव आहे ह्याचेच द्योतक आहे. दसऱ्याला भाताच्या लांब्या घरोघरी प्रवेशद्वारावर तोरण म्हणून लावतात. हे देखील आपल्या कृषिप्रधान संस्कृतीचेच द्योतक आहे. 

दसरा हा विजयाचा सण आहे तो विजयोत्सव आहे. शौर्याचे पराक्रमाचे प्रतिक आहे. म्हणूनच क्षत्रिय मराठे वीर विजयादशमीच्याच मुहूर्तावर लढाईस निघत. ह्यालाच सीमोल्लंघन म्हणत व हा दिवस वाजत गाजत मोठ्या उत्साहाने साजरा करत.


हल्लीच्या युगात अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, द्वेषभावना, अज्ञान इत्यादी शत्रूंवर स्वारी करण्यासाठी  सदसद्विवेकबुद्धी, सदाचार, विज्ञान, प्रेम इत्यादी शस्त्रांना आजच्या दिवशी स्मरण करून पूजले पाहिजे व त्यांना रोजच्या रोज आचरणात आणले पाहिजे हेच खऱ्या अर्थाने दसऱ्याचे सीमोल्लंघन ठरेल.

————————————————————————————————————————————————— 

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

गणेश चतुर्थी हरतालिका

—————————————————————————————————————————————————

 


भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या तिथीला सर्व पितरांना श्राद्ध घालतात. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. असा हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला कुळाचार आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक विधींची परंपरा आहे. हा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष वा श्राद्धपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या तर्पणाचा पक्ष. तर्पण करावयाचे म्हणजे श्रद्धेने, मनोभावाने तृप्त करावयाचे.

समाजामध्ये सदविचार, सत्कर्मे वाढावी आपल्याला इतरांविषयी कळकळ वाटावी, कृतज्ञता वाटावी व त्यामुळे आपल्या हातून सत्कृत्ये घडावी यासाठी आपल्या पूर्वजांनी काही कुळाचार नेमून दिले आहेत. त्यापैकी पितरांना पिंडदान करणे हे एक. यादिवशी समाजातील दीनदुबळ्यांना अन्नदान करावे व पुण्यकर्म करावे. त्यांची क्षुधाशांती करून मने तृप्त व संतुष्ट करावीत. या दिवशी अनेक मंदिरातून, संस्थातून, घराघरातून अन्नदानाचे कार्यक्रम पार पडत असतात. भुकेल्याला  जेवू घालणे हीच खरी ईश्वरसेवा आहे ही उद्दात भावना त्यामागे आहे.

पूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांची सत्कर्मे आठविल्याने त्यातून आपल्याला स्फूर्ती, प्रेरणा मिळते. मन उत्साही होते.

अशा रितीने अन्नदानाचे महत्व सांगणारा हा पितृपक्ष आपण कृतज्ञतापूर्वक पाळला पाहिजे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

गणेश चतुर्थी हरतालिका

—————————————————————————————————————————————————


मार्केटिंग ही एक कला आहे की शास्त्र आहे?

यावर तज्ञांमध्ये बरेच मतभेद आहेत…राहतील…परंतू हल्लीच्या युगात मार्केटिंग ही फक्त एक आवश्यकता नव्हे तर गरजच झाली आहे. आपले प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचावे यासाठी प्रत्येक कंपनी सतत काहींना काही उपाय योजत असते, मार्ग शोधीत असते…वेगवेगळया माध्यमांचा यासाठी उपयोग केला जातो. सध्या इंटरनेटमुळे नवनवीन इनोवेटिव कन्सेप्ट्स राबविणे सोपे झाले आहे….खूप वेगवेगळया प्रकारे कस्टमरला आपल्या प्रोडक्टबरोबर कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. कमीत कमी वेळात तुमच्या मनाला भावेल, आवडेल, उद्दपिद करू शकेल अशा जाहिराती बनविण्यात येतात…परंतू फारच कमी कंपन्यांना/जाहिरातींना हे शिवधनुष्य पेलवते. परदेशांच्या तुलनेत आपल्याकडील जाहिराती याबाबतीत बऱ्याच उजव्या ठरल्या आहेत.

परंतू आज मी नेटवर LG Portugal च्या  Life Is Good या थीमवर आधारलेल्या जाहिरातीचा विडीओ बघितला…खरेतर ह्या व्हिडीओला आपल्या पारंपरिक जाहीरातीच्या व्याख्येत नाही बसविता येणार कारण हा व्हिडीओ चक्क साडेसात मिनिटे लांबीचा आहे. आता इतकी मोठी जाहिरात कोण पहाणार? इतका वेळ आहे कुणाला? आम्हाला तर हल्ली काही सेकंदाच्याही जाहिराती पहायचा कंटाळा येतो तेंव्हा साडेसात मिनिटे अरे बापरे….अ..श…क्य….

हेच अशक्य आव्हान काही कंपन्या सहज कसे शक्य करून दाखवितात…त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे खालील व्हिडीओ. तुम्ही हा व्हिडीओ नुसता पाहून सोडू शकणार नाही तर  तो इतरांबरोबर शेअर करावा असाही विचार तुमच्या मनात सुरु होईल…आणि काहीच क्षणात तुम्ही तो शेअरही केलेला असेल…जसा आत्ता मी येथे केला आहे.

आणि म्हणूनच आजच्या पोस्टचे हे टायटल आहे…असे काहीतरी बनवा जे लोकांना मित्रांबरोबर शेअर करावेसे वाटेल…तुमच्या ग्राहकाला फक्त तुमची वस्तू न विकता एखाद्या कसलेल्या कलाकारासारखे त्याचे मनोरंजन करणे, त्याची भावनिक गरज पूर्ण करणे व ही उचंबळून आलेली भावना (फिलींग ) त्याला इतरांबरोबर शेअर करायला भाग पाडणे हेच आजच्या युगातील यशस्वी कंपन्याचे मुख्य रहस्य आहे व असेल…

——————————————————————————————————————————————————

खालील लेख वाचण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

…….…….

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere


ऋषीपंचमी


फक्त आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या ऋषीमुनींबद्दल आकर्षण आहे. अतीव आदर आहे. अशा या श्रेष्ठ, जेष्ठ, ज्ञानी ऋषींबद्दल आपणास वाटणारा आदर, निष्ठा, भक्ती व्यक्त करणे हेच ऋषीपंचमीचे प्रयोजन आहे.

गणपतीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया रजस्वला अवस्थेत असताना अजगातेपणी केलेल्या स्पर्शाचा दोष दूर करण्याकरीता अरुंधती, कश्यपादि ऋषींना प्रसन्न करण्यासाठी सप्तर्शीचे पूजन करतात. पूजा केल्यानंतर बैलांच्या श्रमाचे कोणतेही पदार्थ खात नाहीत. कंदमुळे खातात. ऋषीमुनी अरण्यात राहतात. अरण्यात उगवणारी कंदमुळे खाऊन ते आपले पोट भरतात. त्याची आठवण म्हणून आपण एक दिवस तरी नैसर्गिकरित्या तयार झालेले अन्न खावे व हा दिन साजरा करावा असा प्रघात आहे.

आपल्या हिंदू संस्कृतीत कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वशिष्ठ ह्या ऋषीसप्तकाने म्हणजेच सप्तश्रींनी आपल्यासाठी ज्ञानाचे घडे भरून ठेवले आहेत. अशा या थोर विभूतींनी दाखविलेल्या मार्गावरून आचरण करण्याची कृतज्ञतापूर्वक प्रतिज्ञा करणे हाच ऋषीपंचमीचा उद्देश व संदेश आहे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

गणेश चतुर्थी हरतालिका

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere