झम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी


मित्रांनो जर तुम्ही झम्प्याला विचारले की ह्या ब्लॉगवरचे तुझे सर्वात फेवरिट/आवड्ते सदर कोणते तर पाव मायक्रोसेकंदाचापण विचार न करता झम्प्या एका झटक्यात उत्तर देईल. हेच हेच ते सदर. म्हणजेच “झम्प्याच्या कथेतल्या झपाटलेल्या गोष्टी” हे सदर. दोस्तांनो आपली मराठी भाषा किती अफलातून क्षीमंत आहे बघा. इथे ह्या सदराला नाव देताना मला मोठा गहन प्रश्न पडला होता तो असा की या सदराला “झम्प्याच्या गोष्टी” म्हणायचे की “झम्प्याच्या कथा”. दोन्ही शब्दांचे अर्थ म्हट्ले तर सारखे म्हट्ले तर नाही.

झाली का पंचाईत्..मग खाजवले थोडे डोके नि विचारांच्या ऑप्शनवर डबल क्लिक केले…..थॉट प्रोसेस स्टार्ट…त्याची ब्लू प्रिंट अशी….

…कथा हा अकच्युली तसा थोडा हेवी शब्द आहे. इथे खरा,बरोबर आणी आवडता शब्द आहे “गोष्टी.” गोष्ट हा एक जादुई जिवंत शब्द आहे. हा शब्द एखाद्या दोन वर्षाच्या बाळाने आपल्या करंगळीला धरून ओढावे तसे ओढत ओढत बालपणात घेवुन जातो. या शब्दात जी मजा आहे ती कथा या शब्दात अजीबात नाही. गोष्ट हा शब्द नुसता कानावर जरी पडला तरी मन आपोआप एका अनोख्या दुनियेत अलगदपणे शिरते..जिथुन त्याला अजिबात परतायचे नसते. बरोबर त्याउलट कथा या शब्दाचे आहे. ह्या शब्दात अजिबात जिवंतपणा नाही. हा एक मेलेला शिळा शब्द वाटतो. एक जाणिवपूर्वक रचलेला म्हणजेच आर्टिफिशल, कृत्रिम शब्द वाटतो. गोष्टीसारखा नैसर्गिक आणी निरागस भाव या शब्दात नाही. परंतू तरीही या मेलेल्या शब्दाला जास्त किंमत आहे. साहित्य किंवा समाज दोघेही ह्या शब्दालाच मान का देतात? हे झम्प्याला समजत नाही.

कदाचीत ‘कथा’ या शब्दासारखा सिरिअसनेस ‘गोष्टी’ ह्या शब्दात नसल्यामुळे? कदाचीत कथेत सत्याचा तर गोष्टीत कल्पनेचा आभास होत असल्याने. कारणे काहीही असो कथेत कधीही गोष्टीची गंमत येत नाही, येणार नाही.

…विचारांचा वेग वाढला..गोष्टी या शब्दाचे पारडे खाली जात होते. आणी एवढ्यात डोक्यात सर्र्कन एक विचार चमकला.

तो विचार होता… तुमचा…म्हणजेच वाचकांचा. तुम्ही इथे काय वाचू इच्छीता? इथल्या गोष्टी/कथा वाचून तुम्हाला समाधान मिळेल काय? इथल्या गोष्टी/कथांनी तुम्हाला प्रेरणा मिळतील का? इथल्या गोष्टी/कथा तुमच्या ह्रुदयाला स्पर्श करतील का? तुमच्या गालावार हास्य फुलवतील का? तुमच्या मनात खोलवर लपलेले अश्रू तुमच्याही न कळत चट्कन डोळ्यांवाटे बाहेर पडतील का? तुमच्या थिजलेल्या भावनांना भिजवून ताजे करतील का?

विचार पूर्ण…उत्तर मिळाले. निर्णय झाला.

दोन्ही शब्दांचे महत्त्व आपापल्या जागी मान्य. पण त्याहून महत्त्वाचे आहे त्यांच्याद्वारे व्यक्त वा मुक्त होणार्‍या तुमच्या मनातल्या भावना.

म्हणून कोणी कथेत रमा वा कोणी गोष्टीत डुंबा.
झम्प्या म्हणे शब्दांपेक्षा त्यामागच्या भावनांना जपा.

ही होती झम्प्याच्या कथेतली पहिली झपाटलेली गोष्ट 🙂

यावर आपले मत नोंदवा