Posts Tagged ‘Religion and Spirituality’


त्रिपुरी पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा)

कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानात जे दीपस्तंभ (उंच दगडी दिवे) असतात ते सुद्धा पेटवितात. या दिपोत्सवालाच त्रिपुर पाजळणे असे म्हणतात.

तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. पण शेवटी असुर ते असुरच त्यांची शेपूट वाकडी ती वाकडीच म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श्रीशंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरु झाली.

कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला “मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी” असे म्हणतात.

जे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.


तुळशीचे लग्न (तुलसी विवाह)

कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीला चातुर्मास व्रत समाप्त होते. एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत मुख्यत्वे द्वादशीला श्रीविष्णूचा तुळशीसी विवाह साजरा करण्याची पध्दत आहे.

तुळस हि घराघरात असणारी एक पवित्र व उपयुक्त वनस्पती आहे. आपल्या हिंदू संस्कृतीने तर तिला मानवाचा दर्जा बहाल केला आहे. ती बहुगुणी व ओषधी आहे. देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस अवश्य लागते. श्रीविष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार तुळशीच्या नुसत्या दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके तुळशीला महत्व आहे.

तुळशीमध्ये कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू  शिरकाव करीत  नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे ई. तीचे महत्वाचे गुणधर्म आहेत.

अशा या सर्वगुणसंपन्न तुळशीने आपल्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनात अढळपद प्राप्त केले आहे. म्हणून घरातील सर्वांनी देवांप्रमाणेच तुळशीचे दर्शन घ्यावे.


पहाटेच्या आंघोळी
घरासमोर रांगोळी
नको चिंता कपाळी
खुश सगळी पोरं बाळी
आली आली हो दिवाळी

पावसाळा संपून  हिवाळा सुरु झालेला असतो. सगळीकडे सुगीचे दिवस असतात. थंडीचे साम्राज्य सुरु झालेले असते. दिवस छोटा तर रात्र मोठी…त्यामुळे थंडीबरोबर अंधाराचासुद्धा पगडा वाढणार असतो. पण निसर्गाच्या या संक्रमण अवस्थेचे भय न बाळगता अखिल हिंदू संस्कृती पणत्या, मेणबत्ती, आकाशकंदील व विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांनी तीचे स्वागत करते. नसती स्वागतच नव्हे तर दिवाळीसारखा प्रचंड मोठा सण साजरा करते.

गरीबातला गरीब तर श्रीमंतातला श्रीमंतसुद्धा हा सण साजरा करतो. इतका हा सण लाडका आहे. म्हणूनच तो सर्व सणांचा अनभिषक्त सम्राट आहे. हा दिव्यांचा म्हणजेच प्रकाशाचा सण आहे. अंधकारातून प्रकाशाकडे म्हणजेच “तमसो मा  ज्योर्तिगमयम  ” जाणारा सण आहे. दारी सडे शिंपण्याचा, रांगोळ्या काढण्याचा, पहाटे लवकर उठण्याचा, तेल उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याचा  गुळ, खोबरे, तूप, तीळ इत्यादी फराळ करण्याचा हा सण आहे. निसर्गाचा, स्वच्छतेचा, आरोग्याचा, बुद्धीचा, कलात्मकतेचा, धनाचा सण आहे. ज्याचा त्याचा हा सण आहे.

वसुबारस

आपल्याला कदाचीत माहित नसेल परंतू दिपावलीची खरी सुरवात  ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. वसू म्हणजे धन. बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी गोवत्सपूजा करतात. त्यामुळे गोवत्स द्वादशी असेदेखील म्हणतात. आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे गायमातेला फार महत्व आहे. म्हणूनच दिवाळीसारख्या मोठ्या सणाची सुरवातदेखील सवत्स गायीला पुजुन केली जाते. सवत्स म्हणजे गाय व तीचे बछडे यांना गृहिणी ओवाळतात. बाजरी व गुळ कुटून केलेल्या लाडवांचा ग्रास देतात. सदैव शांत, तृप्त व समाधानी दिसणारी, वात्सल्याने भरलेली गाय आणि आपले टपोरे काळे डोळे विस्फारून व कान टवकारून निरांजनाकडे पाहणारे तिचे गोजिरवाणे बछडे म्हणजे मायलेकरांच मंगलरूप आहे. त्यांच्या दर्शनाच्या शुभशकुनानंतर दिपावलीची सुरवात होते.

धनत्रयोदशी
अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. हा चिरंतर सत्याचा म्हणजेच मृत्युचा दिवस आहे. जन्म तेथे मृत्यु आलाच अशा मृत्युदेवतेला म्हणजेच यमराजाला प्रसन्न करण्यासाठी, त्याचे स्वागत करण्यासाठी दीपदान करतात. दिवा हा दीर्घायुष्याचे, प्राणाचे, चैतन्याचे प्रतिक आहे. दिव्याने ओक्षवण करतात म्हणजेच दीर्घायुष्य इच्छितात. जन्म मृत्युची निर्मिती परमेश्वराची त्यामुळे आवश्यक नव्हे उपकारकच म्हणून मृत्युचे म्हणजेच यमाचे महत्व पटविणारा त्याला आपला मित्र बनविणारा हा दिवस आहे. आपला मृत्यु हा योग्यवेळी व समाधानाने व्हावा ही यमपूजा व दीर्घायुष्य लाभावे ही यमाजवळ प्रार्थना.

योगायोग बघा ज्या धनाची, वैभवाची, सोने नाण्याची पूजा धनत्रयोदशीला केली जाते त्याच दिवशी आयुर्वेदाचा पिता धन्वंतरी जन्माला यावा. वैभवाचा खरा लाभ उठवण्यासाठी निरोगी शरीराची व मनाची आवश्यकता असते त्याशिवाय ते कुचकामी ठरते. म्हणून आजच्या दिवशी धन्वंतरीचे स्मरण करून त्याचा वाढदिवस साजरा करावा. धनाची व यमाची पूजा करणारा हा दिवस मृत्युला मित्र बनविणारा तर निरोगी शरीराचा संकल्प करणारा हा दिवस.

नरक चतुर्दशी
अभ्यंग स्नानाची गडबड व फटाक्यांची धडधड यातच नरकचतुर्दशीची मंगल प्रभात उगविते.  श्रीकृष्णाच्या काळात आसाममध्ये नरकासुर नावाचा राजा होता त्याने आपल्या नावाप्रमाणे राज्याचा नरक केला होता. तो भारतातून सुंदर सुंदर कुमारिकांना पळवून आणीत असे आणि आपल्या कैदेत ठेवीत असे. त्यांचा वाममार्गासाठी उपयोग करून त्यांना आयुष्यातून उठवत असे. त्याच्या राक्षसी वृत्तीमुळे कोणी विरोध करीत नसे. या अशा कुमारिकांच्या सग्या सोयऱ्यानी केलेल्या याचनेमुळे श्रीकृष्ण त्यांच्या मदतीला धावला. घनघोर युद्धात त्याने नरकासुराचा निपात केला. त्याच्या बंदिखान्यातून १६१०० कुमारिकांना त्याने मुक्त केले. नरकासुराने मरता मरता सदबुद्धी जागृत होऊन समाजासाठी वर मागितला जे कोणी आजच्या तिथीला सुर्योदयापूर्वी स्नान करेल त्याला नरकवास मिळू नये. त्याचे स्मरण म्हणून अभ्यंगस्नान ही प्रथा रुढ  झाली.
मुक्त केलेल्या तरुणींना स्वगृही नेण्यासाठी त्यांचे स्वकीय पुढे येईनात. श्रीकृष्ण त्यामुळे चकित झाला. सर्वाना समजावण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतू नीतिमत्तेच्या दांभिकतेला बळी पडलेल्या समाजातील  कर्त्या पुरुषांनी त्या तरुणींचा त्याग केला. अशा स्त्रियांना असेच असाह्य सोडणे म्हणजे परत स्वैराचाराच्या, कलंकतेच्या नरकात सोडण्यासारखेच होते म्हणून शेवटी श्रीकृष्णाने त्यांचा पती होण्याचे ठरविले पतीचा अर्थ पालक असं देखील होतो. तो त्यांचा अवनी म्हणजेच अन्न, वस्त्र आणि निवारा यांची सोय करणारा झाला. त्याने त्यांना उद्योगाला लावले. त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

निर्दोष मुलींना बहिष्कृत केले हे पुरुषप्रधान संस्कृतीचेच उदाहरण आहे. समोर अन्याय दिसत असताना डोळे, कान, तोंड बंद ठेऊन बसने कितपत योग्य आहे? म्हणून हा पुरुष मानसिकतेच्या परिवर्तनाचा दिवस आहे. अनिष्ट रुढी परंपरातून  अबला स्त्रीला मुक्त करून तीचे सबलतेत रुपांतर करण्याचा ह्या दिवसाचा संदेश आहे.

लक्ष्मीपूजन
आश्विन वद्य अमावास्येला लक्ष्मी व कुबेराचे पूजन केले जाते. हिंदू संस्कृतीत लक्ष्मीला फार महत्व आहे. धनामुळेच समाजाचा राष्ट्राचा उत्कर्ष होतो. धन हे नेहमी घाम गाळून कष्टाने मिळते जे धन दुसऱ्याला फसवून, लबाडी करून येते ती लक्ष्मी नव्हे तर अलक्ष्मी आहे. अविद्या, अज्ञान आहे. ज्या लक्ष्मीला धर्माचे अधिष्ठान सरस्वतीची सोबत आणि चारित्र्याची सांगत नाही अशी लक्ष्मी हे एक संकट आहे. त्याचा अंत दुखात:च  होतो.

मनुष्याला जर प्रमाणापेक्षा जास्त धन मिळत गेले तर त्याच्यातील गर्व अहंकार वाढतो. तो इतरांचा तिरस्कार करतो. म्हणूनच लक्ष्मी  पूजनाच्या दिवशी कुबेराचे स्मरण ठेवतात. कुबेर हा इंद्राचा खजिनदार. एवढी संपत्ती ताब्यात असूनही निर्लोभी आहे. शंकराच्या भक्तीमुळे परम वैराग्यशील आहे. निरपेक्ष, संयमी व स्थितप्रज्ञ आहे. म्हणून या मंगल दिवशी लक्ष्मीपूजनाबरोबरच कुबेराचेदेखील स्मरण ठेवले जाते.

बलिप्रतिपदा
लक्ष्मीपूजनानंतर येतो पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहुर्त म्हणून हा महत्वाचा दिवस आहे. या दिवसापासून शुभकार्याची सुरवात करण्याची प्रथा आहे. विक्रम सवंत   व महावीर सवंत यांचा नववर्षारंभ यांच दिवसापासून होतो. बळीराजाचा हा स्मरणदिन आहे. बळी हा शेतकऱ्याचा राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक देवांच्या आधी बळी राजाचे नाव घेत त्यामुळे देव संतप्त झाले व त्यांनी विष्णूला साकडे घातले. विष्णूने वामनावतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेला ‘काय हवे ते माग’ बळी बोलला. फक्त त्रिपादभूमी हवी मला वामन उत्तरला. सर्व काय ते बळी उमजला. परंतू शब्द दिला तो त्याने पाळला ‘दिली भूमी’ म्हणून गरजला. वामनाने एका पावलात स्वर्ग, दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली. तिसरे पाउल कुठे ठेऊ असे विचारताच बळीने आपले मस्तक पुढे केले. विष्णूने त्याला पाताळात गाडले. पण एक वर दिला. तो वर समाजाच्या हिताचा होता. जो कोणी बळीप्रतिप्रदेला दीपदान करेल त्याला यमयातना होणार नाहीत. त्याच्या घरी लक्ष्मीचा वास सदा राहील. लक्ष्मीला आपल्या पतीचे कौतुक वाटले म्हणून तीने पतीचे विष्णूचे ओक्षण केले त्याला ओवाळले.  ओवाळणी म्हणून विष्णूने हिरे माणके इत्यादी अलंकार घातले. यामुळेच आजही बलिप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळतात व पती पत्नीला भेटवस्तू देतात.
श्रीकृष्णाने आजच्या दिवशीच गोवर्धन पूजेची सुरवात केली. निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची हि सुरवात होती त्यानिमित्त पाडव्याला कृष्ण, गोपिका, गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची पुजा होई. या प्रथेपासून निघालेले किल्ले म्हणजे गड, सैनिक, शिवाजी महाराज यांचे मोठ्या कल्पकतेने देखावे उभारण्याची प्रथा महराष्ट्रात रूढ झाली. यातूनच मुलांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला वाव मिळू लागला.

भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी करतात. यमाने आपली बहिण यमुनेच्या घरी जाऊन वस्त्रे अलंकार इ. भेटी देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात.
या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी येतो. बहिण त्याच्या आवडीचे पक्वान्न बनविते. प्रेमाने भरविते त्यानंतर दोघांच्या मनसोक्त गप्पा झडतात. जुन्या रेशमी आठवणींना उजाळा मिळतो. संध्याकाळ पणत्या, रांगोळी, आकाशकंदीलाच्या  प्रकाशात  न्हाऊन  येते. बहिण सजते सवरते. ओक्षवनाची तयारी करते. भावाला प्रेमाचा टीळा लावते. व हसतमुखाने ओवाळते. भाऊ बहिणीकडे अगदी कौतुकाने पहात असतो. भावाच्या स्वास्थ्याची,समृद्धीची बहिण अगदी निस्वार्थीपणे मनोमन कामना करते. इतका लोभसवाणा, भावाबहिणींच्या मंगल प्रेमाचा दिवस म्हणजे खरोखरच भारतीय संस्कृतीतील सोनेरी पानच म्हणावयास हवे.

भाऊ नसल्यास, चांदोबास ओवाळण्याची पध्दत आहे. चंद्राला साऱ्या भगिनींचा भाऊ मानल्यामुळे तो साऱ्या बालगोपाळांचा लाडका चंदामामा झालेला आहे. आपल्या सणांच्या कल्पना किती विशाल आहेत हेच या उदाहरणावरून दिसून येते

—————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

गणेश चतुर्थी हरतालिका

—————————————————————————————————————————————————



‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसरा हा मोठा सण मानला जातो. नवरात्र संपले की दशमीला दसरा उजाडतो. आश्विन महिन्यातील शुद्ध दशमीस हा सण साजरा करतात. दसरा हा सर्व कार्यांना शुभ मानला जातो. या दिवशी नवे कार्य करण्याची प्रथा आहे. दसऱ्याला विजयादशमी असेदेखील म्हणतात.

विजयादशमीला  सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजीतापूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. या दिवशी वह्या, पुस्तके, ग्रंथ, पोथ्या, यंत्रे, शस्त्र, हत्यारे, वाद्ये, उपकरणे यांची पूजा करतात. नंतर ईशान्येला जाऊन शनी किंवा आपट्याच्या वृक्षांची पूजा करतात व त्यांची पाने तोडून (फांद्या नव्हे) आपल्या जवळच्या लोकांना वाटतात. या दिवशी जुनी भांडणे, तंटे विसरून चांगल्या विचारांचे आदानप्रदान करावे ही उदात्त भावना ही पाने वाटण्यामागे आहे. 

आपला भारत हा कृषीप्रधान देश असल्याने दसरा हा सुद्धा कृषीलोकोत्सवच आहे. पावसाळ्यात पेरणी केलेल्या शेतातील पहिले पीक याच दिवशी घरात आणावयाची प्रथा आहे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालील स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी या धान्याचे अंकुर उपटून देवीला वाहतात. ही प्रथाच आपल्या संस्कृतीवर शेतीचा किती प्रभाव आहे ह्याचेच द्योतक आहे. दसऱ्याला भाताच्या लांब्या घरोघरी प्रवेशद्वारावर तोरण म्हणून लावतात. हे देखील आपल्या कृषिप्रधान संस्कृतीचेच द्योतक आहे. 

दसरा हा विजयाचा सण आहे तो विजयोत्सव आहे. शौर्याचे पराक्रमाचे प्रतिक आहे. म्हणूनच क्षत्रिय मराठे वीर विजयादशमीच्याच मुहूर्तावर लढाईस निघत. ह्यालाच सीमोल्लंघन म्हणत व हा दिवस वाजत गाजत मोठ्या उत्साहाने साजरा करत.


हल्लीच्या युगात अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, द्वेषभावना, अज्ञान इत्यादी शत्रूंवर स्वारी करण्यासाठी  सदसद्विवेकबुद्धी, सदाचार, विज्ञान, प्रेम इत्यादी शस्त्रांना आजच्या दिवशी स्मरण करून पूजले पाहिजे व त्यांना रोजच्या रोज आचरणात आणले पाहिजे हेच खऱ्या अर्थाने दसऱ्याचे सीमोल्लंघन ठरेल.

————————————————————————————————————————————————— 

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

गणेश चतुर्थी हरतालिका

—————————————————————————————————————————————————

 


भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या तिथीला सर्व पितरांना श्राद्ध घालतात. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. असा हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला कुळाचार आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक विधींची परंपरा आहे. हा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष वा श्राद्धपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या तर्पणाचा पक्ष. तर्पण करावयाचे म्हणजे श्रद्धेने, मनोभावाने तृप्त करावयाचे.

समाजामध्ये सदविचार, सत्कर्मे वाढावी आपल्याला इतरांविषयी कळकळ वाटावी, कृतज्ञता वाटावी व त्यामुळे आपल्या हातून सत्कृत्ये घडावी यासाठी आपल्या पूर्वजांनी काही कुळाचार नेमून दिले आहेत. त्यापैकी पितरांना पिंडदान करणे हे एक. यादिवशी समाजातील दीनदुबळ्यांना अन्नदान करावे व पुण्यकर्म करावे. त्यांची क्षुधाशांती करून मने तृप्त व संतुष्ट करावीत. या दिवशी अनेक मंदिरातून, संस्थातून, घराघरातून अन्नदानाचे कार्यक्रम पार पडत असतात. भुकेल्याला  जेवू घालणे हीच खरी ईश्वरसेवा आहे ही उद्दात भावना त्यामागे आहे.

पूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांची सत्कर्मे आठविल्याने त्यातून आपल्याला स्फूर्ती, प्रेरणा मिळते. मन उत्साही होते.

अशा रितीने अन्नदानाचे महत्व सांगणारा हा पितृपक्ष आपण कृतज्ञतापूर्वक पाळला पाहिजे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

गणेश चतुर्थी हरतालिका

—————————————————————————————————————————————————