वयाच्या १६ व्या वर्षी मिलिओनेअर बनलेल्या मुलाची गोष्ट


इंटरनेटचे लहान मुलांवर दुष्परिणाम ह्यावर एक फार मोठा ग्रंथ सहज तयार होईल. या विषयावर अनेक तास चर्चाही करता येईल. पण या जगात अशीही काही लहान मुले आहेत ज्यांनी या माध्यमाचा एक व्यवसाय म्हणून विधायक उपयोग केला आणि आता ते भावी पिढीचे एक नवीनच प्रकारचे आदर्श बनले आहेत.

वयाच्या सोळाव्या वर्षी तुम्ही काय करत होता? किंवा तुम्हाला जर असे विचारले तुम्ही वयाच्या सोळाव्या वर्षी किती कमवत होता? तर एकतर तुम्ही उत्तर द्याल वयाच्या सोळाव्या वर्षी आम्ही शिकत होतो किंवा जर काही कमवत होतो तर ती रक्कम नक्कीच सांगण्याइतकी विशेष नाही.(काही सन्माननीय अपवादही असतील इथे) तर आज मी तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहे ज्याने वयाच्या १६ व्या वर्षी स्वतःच्या कमाइने १ बिलिअन डॉलर्स कमविले आहेत…..व अजूनही तो कमवतोच आहे.

त्या मुलाचे नाव आहे ख्रिस्टीन ओवेन्स.(Christian Owens) तो एक ब्रिटीश नागरिक आहे. त्याचा आदर्श आहे अ‍ॅपल कंपनीचा CVO स्टीव्ह जॉब्स. त्याच्याच विचारांची अक्षरशः नक्कल करून तो हे करत आहे. who dares wins  म्हणजे जो साहस करेल तोच जिंकेल. या स्टीव्हच्या विचारावर त्याला पूर्ण विश्वास आहे. ख्रिस्टीन ७ वर्षाचा असताना त्याला त्याचा पहिला कॉम्पुटर मिळाला. त्यानंतर तीनच वर्षानी त्याला मॅक (अ‍ॅपलचा कॉम्पुटर) मिळाला. ज्यावर त्याने वेब डीजायनिंग शिकायला सुरवात केली आणि त्यानंतर बरोबर चार वर्षांनी म्हणजे वयाच्या १४ व्या वर्षी त्याने त्याची पहिली कंपनी सुरु केली. तिचे नाव ठेवले Mac Bundle Box. ही एक साधी वेबसाईट होती. जिच्यावर तो अ‍ॅपलची अ‍ॅप्लीकेशन्स कमी किमतीत विकत असे. ह्या वेबसाईट्ची कल्पना पण त्याने दुसऱ्या एका अशीच सर्विस देणाऱ्या MacHeist या वेबसाईटवरून सहीसही उचलली होती. कन्सेप्ट तशी खूप साधी होती. घाऊक रेटमध्ये अ‍ॅप्लीकेशन्स विकत घ्यायची व डिस्काउंट रेटमध्ये ठराविक वेळेत विकायची. उदाहरणार्थ तो काही अ‍ॅप्लीकेशन्सचे एकत्र बंडल बनवायचा. त्यांची बाजारातील एकत्रीत किमत जर ४०० डॉलर्स होत असेल तर तो ते बंडल चक्क  ५० डॉलर्सला विकायचा. म्हणजे एक दशांश किमतीत. वर शिवाय जर ग्रुपने खरेदी केली तर आणखी एक अ‍ॅप्लीकेशन्स बोनस म्हनून द्यायचा… ह्या अशा स्कीममूळे झाले काय की त्याची तोंडी जाहिरात खूप झाली…ग्रुपच्या ग्रुप खरेदीसाठी यायला लागले. त्याचा खप लाखोंने वाढला. वेबसाईट सुरु झाल्यापासूनच्या पहिल्या दोन महिन्यातच त्याच्या खात्यावर एक लाख डॉलर्स जमा झाले.

तरी सुद्धा हा पठ्या काही समाधानी नव्हता. त्याची भूक मोठी होती. त्याला हे असे अ‍ॅप्लीकेशन्स विकण्यात एवढा रस राहिला नव्हता. त्याने आता मोठी झेप घ्यायचे ठरविले. व त्या झेपेला नाव दिले Branchr. हीसुद्धा एक नक्कलच होती. गुगलच्या या जमान्यात पे पर क्लिकचा फंडा त्याने वापरला. महिन्याला १७५० वेबसाईटवर ३०० मिलिअन जाहिराती झळकायला लागल्या. वेबसाईट सुरु केल्याच्या पहिल्याच वर्षी ८ लाख डॉलर्स इतकी त्याची कमाई होती. आता सध्या त्याच्या कंपनीत त्याच्या हाताखाली ८ अ‍ॅडल्ट्स काम करतात. त्यातली एक ४३ वर्षे वय असलेली त्याची आई आहे.

आणखीन १० वर्षानंतर तो कुठे असेल हे त्याचे त्याला नक्की सांगता येत नाही…हा पण त्याचे पुढचे टारगेट आहे १०० मिलिअन बिटिश पौन्ड. त्याची वाटचाल अशीच चालू राहिली तर तो हे टारगेट खूप लवकरच पूर्ण करेल.

एकदा त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले..तुझ्या यशाचे नेमके रहस्य काय? तर तो हसून इतकेच म्हणाला “रहस्य वगैरे काही नाही फक्त खूप मेहनत, ठाम निर्धार आणि प्रचंड काहीतरी मोठे करण्याची जिद्द.” (आणि  MacHeist ची नक्कल)

तर मित्रांनो असे हे इंटरनेट नावाचे माध्यम आपल्याही हातात आहे. आपल्याही डोक्यात अशा काही कल्पना सतत चमकत असतात. पण आपण नेहमी त्याकडे दुर्लक्ष करतो..किंवा स्वतःला कमी लेखून ही असली भानगड आपल्याला झेपायाची नाही असे स्वतःच बजावतो…तर इथून पुढे विचार करा वयाच्या १४ व्या वर्षी जर ख्रिस्टीन असे साहस(?) करू शकतो तर तुम्ही आम्ही का नाही?

नक्की कुठे कमी पडतो आपण?

यावर आपले मत नोंदवा